पैते : मणिपूर राज्यातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पूर्व मणिपूर जिल्ह्यातील पर्वतश्रेणींतून आढळते. १९७१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या २४,७५५ होती. आसाममधील लुशाई जमातीची ती एक पोटजमात वा कुळी असून प्रारंभी त्यांची वस्ती लुशाई पर्वतराजीतील स्थानिक संस्थानिकांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या खेड्यात होती पण तेथे राहणे त्यांना बळजबरीने भाग पाडलेले होते. त्यांपैकी अनेक पैते लोक मणिपूरला गेले. त्यांची काही खास सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. पैते वा पैथे हे नाव पूर्वीच्या आदिवासी टोळीच्या प्रमुखाचे असावे, असे एक मत आहे. यांची पैथे ही बोलीभाषा इतर लुशाईंना कळत नाही.
या जमातीत मंगोलियन वंशाची काही वैशिष्ट्ये आढळतात. पिवळसर वर्ण, ठेंगू व काटक शरीरयष्टी यांकरिता ते प्रसिद्ध आहेत. पैते झूमपद्धतीची शेती व शिकार करतात तांदूळ, मका, बार्ली, घेवडा, वाटाणा ही पिके काढतात. ते जंगलातील बांबूपासून हरतऱ्हेच्या टोपल्या विणणे व कापड तयार करणे हे व्यवसायही करतात. कापड व टोपल्या विशेषतः स्त्रिया विणतात.
पैते हे अंतर्विवाही असून त्यांच्यात वधूमूल्याची पद्धत आहे. मुले-मुली वयात आल्यानंतर विवाह होतो. लुशाईहून त्यांची विवाहपद्धत भिन्न आहे. उपवर तरुण वाग्दत्त वधूला आपल्या घरी न ठेवता फक्त तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो. जर तीन वर्षांच्या आत तिला मूल झाले नाही, तर ते विभक्त होतात. जमातीचा प्रमुख चुलत बहिणीशी लग्न करतो.
पैते पुरुष एक कुडता व कमरेला साधे वस्त्र गुंडाळतो. मात्र स्त्रिया कमरेस परकरासारखे वस्त्र गुंडाळतात. अविवाहित मुली हे वस्त्र मागच्या बाजूला खोचतात. स्त्री-पुरुष दोघेही केस राखतात. पुरुष ते मागे बांधतात. स्त्रिया तीन वेण्या घालतात दोन कानाच्या बाजूला व एक मागे.
पैतेत पितृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित असून, संपत्तीचा वारसाहक्क धाकट्या मुलाकडे जातो. मोठ्या मुलांना फक्त काही हिस्सा मिळतो.
या जमातीत मृताच्या पार्थिव देहाला एक प्रकारची चरबी चोळतात. त्यामुळे मृताची कातडी टणक होते व प्रेत सडत नाही. मग त्याला उंची पोषाख घालून पिसांचा टोप घालतात. नंतर त्याभोवती नाच-गायन करतात. सर्वजण दारू पितात आणि प्रेतालाही दारू पाजतात. दिवसा प्रेत घरात ठेवतात व रात्री घराबाहेर लाकडी सोप्यावर ठेवतात. बरेच दिवस हा कार्यक्रम चालतो. ज्याच्या ऐपतीप्रमाणे हे मर्तिकांचे विधी होतात. अखेर प्रेत पुरतात किंवा जाळतात.