पै, गोविंद : (२३ मार्च १८८३– ६ सप्टेंबर १९६३). आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक. जन्म कर्नाटकातील द. कॅनरा जिल्ह्यातील मंजेश्वर गावी. शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसाहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता.
गोविंद पै यांची पहिली कविता ‘सुहासिनी’ ही १९०० मध्ये प्रकाशित झाली. परंपरागत द्वितीय प्रासाचा (चरणातील दुसरे अक्षर तेच येणे) उपयोग न करता रचना करणारे गोविंद पै हे पहिले कवी होत. भावगीतांव्यतिरिक्त येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील गोल्गोथा (१९३१) व गौतम बुद्धाच्या जीवनावरील वैशाखि (१९४९) ही दोन खंडकाव्येही त्यांनी लिहिली. त्यांची निवडक भावगीते गिळिविंडु (१९३०) या संग्रहात आहेत. हेब्बेरळू (१९४६) व चित्रमानु (१९४९) ही त्यांची दोन नाटके. यांपैकी पहिले नाटक एकलव्याच्या कथेवरील आहे व दूसरे १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातील एका हुतात्याच्या जीवनावर आधारलेले आहे. काही जपानी ‘नो’ नाट्यांचाही त्यांनी कन्नड अनुवाद केलेला आहे.
गोविंद पै यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते. त्यांत कर्नाटक आणि तुळुनाडू यांचे इतिहास, प्राचीन भारत-ग्रीस संबंध, इतिहासकालीन राजांची, गौतम बुद्ध, महावीर यांसारख्या धर्मप्रवर्तकांची आणि प्राचीन कन्नड लेखक-कवींची कालनिश्चिती इ. विषयांचा समावेश होतो. धारवाड येथील ‘कन्नड संशोधन संस्थे’त दिलेली त्यांची खास व्याख्याने मुरु उपन्यासगळु (१९४०) या नावाने संगृहीत करण्यात आलेली आहेत.
सर्जनशील साहित्य व ऐतिहासिक संशोधन या दोन्हीही क्षेत्रांत गोविंद पै यांना सारखीच गती होती. देशभक्ती व सर्वधर्मीय सुसंवाद साधण्याची दृष्टी ह्या त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रेरणा होत. याहीपेक्षा ते मानवतावादी होते, हे अधिक महत्त्वाचे होय. ते स्वभावाने प्रसिद्धिपराङ्मुख होते. ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेली दिसतात. त्यांची भाषाशैली सहजसुबोध नाही तथापि त्यांचा वैचारिक आशय उच्च कोटीतील असल्याने त्याला एक प्रकारचे शाश्वत मूल्य प्राप्त झालेले आहे.
मद्रास राज्यशासनातर्फे त्यांना १९४८ मध्ये ‘राष्ट्रकवि’ हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला. १९५० मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मंगलोर येथे त्यांचे निधन झाले.
बेंद्रे, वा. द.