आकाशवाणी : (ऑल इंडिया रेडिओ). रेडिओ-कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा. भारतात नभोवाणीचा विकास गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांतच झालेला आहे. १९२६ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ ह्या एका खाजगी कंपनीने भारत सरकारशी एक करार करून मुंबई व कलकत्ता येथे अनुक्रमे २३ जुलै व २६ ऑगस्ट १९२७ रोजी दोन रेडिओ-केंद्रे सुरू केली. या केंद्रांची कार्यक्रम ४८ किमी. च्या परिसरातच ऐकू येण्याची व्यवस्था होती. या सुमारास देशात १,००० रेडिओ-परवाने होते. १९२७ च्याही अगोदर भारतात नभोवाणीचा प्रसार खाजगी हौशी क्लबांद्वारा झालेला होता. १९२४ मध्ये मद्रास येथे पहिला रेडिओ-क्लब स्थापन झाला. हौशी रेडिओ-क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, व डेहराडून येथे चालविले जात होते. सरकारने भावी काळात स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रांचे हे रेडिओ-क्लब अग्रदूत ठरले. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद ह्या पाच ठिकाणीही नभोवाणी-कार्य चालू होते. म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले. परदेशी वृत्तपट व इंग्रजीमधून प्रसारित होणाऱ्या वार्तापटांच्या वेळी मात्र ‘ऑल इंडिया रेडिओ’ (ए आय् आर्) असे संबोधण्यात येऊ लागले. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी १ मार्च १९३० मध्ये बुडाली व भारत सरकारने लगोलग नभोवाणी-कार्य स्वत:कडे घेतले. १९३६ मध्ये लायोनल फील्डन ह्यांनी नभोवाणी-प्रमुख ह्या नात्याने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. स्वातंत्र्योत्तर काळातच आकाशवाणीचा खऱ्या अर्थाने विकास होत गेला.

उद्दिष्टे : देशी विदेशी बातम्यांचे संकलन करून बातमीपत्रे प्रक्षेपित करणे, देशाचा योजनाबद्ध सर्वांगीण विकास कसा होईल ह्याबद्दलचे विचार व माहिती जनतेला पुरविणे, त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या सांस्कृतिक विकासाकडेही मनोरंजक कार्यक्रम आखून लक्ष पुरविणे, ही आकाशवाणीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मनोरंजन व माहितीकरिता नभोनाट्ये, संगीताचे बहुविध कार्यक्रम, भाषणे, संभाषणे, चर्चा वगैरे सादर केल्या जातात. विद्यार्थी, महिला, मुले व ग्रामीण जनता ह्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित करण्यात येतात. देशातील सर्व पक्षांशी व राज्य-सरकारांशी विचार विनिमय करून केंद्र सरकारने आकाशवाणीवरील भाषणांविषयी एक नऊ-कलमी संहिता तयार केली आहे.

आकाशवाणीची एप्रिल १९७३ अखेर ६९ प्रसारकेंद्रे असून त्यांचे पाच विभाग करण्यात आले आहेत. याशिवाय बडोदे, दरभंगा, म्हैसूर, विशाखापटनम् व शांतिनिकेतन या शहरांत साहाय्यक प्रसारकेंद्रे कार्य करीत आहेत. मध्यमतरंगांवरूरन प्रसारित केले जाणारे आकाशवाणीचे कार्यक्रम देशातील सु. ३२ कोटी लोक ऐकू शकतात. लघु-तरंगांवरही कार्यक्रम ऐकता येण्याची सोय उपलब्ध आहे. तथापि भारताच्या सु. ५६ टक्के प्रदेशात व सु. ७३ टक्के लोकसंख्येलाच मध्यमतरंगांवरील कार्यक्रम ऐकू येतात. देशात एकूण एक कोटीवर रेडिओ आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने प्रत्येक पाच व्यक्तींमागे किंवा विकसनशील देशांत वीस व्यक्तींमागे एक रेडिओ असावा, असे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात हे उद्दिष्ट साध्य करणे हे किती अवघड कार्य आहे, याची त्यावरून कल्पना येईल.

रेडिओ-संच घरी वापरण्याकरिता प्रतिवर्षी १५ रु. परवाना-फी भरावी लागते. हॉटेले, दवाखाने वगैरे ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ-संचाची परवाना-फी अधिक असते. रेडिओ आणि दूरचित्रवाणी-संचांची परवाना-फी नजीकच्या डाकघरात भरता येते. परवाना-फी प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या अवधीपर्यंत लागू असते. त्यानंतर फी भरण्याकरिता पुढील वर्षाच्या ३१ जानेवारीपर्यंत एक महिन्याची सवलत दिली जाते. या सवलतीनंतर प्रत्येक महिन्याला १ रु. दंड परवानाधारकास आकारण्यात येतो. परवाना-पुस्तक एखाद्या दुर्घटनेत नष्ट झाले अथवा हरवले, अशी परवानाप्रदान अधिकाऱ्याची खात्री पटल्यास २ रु. देऊन नवे परवाना-पुस्तक परवाना-धारकास देण्यात येते. रेडिओ-परवाना न बाळगता रेडिओ वापरणाऱ्या इसमास १०० रुपयांपर्यंत दंड केला जाण्याची कायद्यात तरतूद आहे. रेडिओ-संचांच्या परवाना-फीचे स्वरूप तसेच १९७२ अखेर रेडिओ-संचांच्या वापराचे वर्गीकरण खाली दिलेल्या अनुक्रमे तक्ता क्रमांक १ व २ वरून स्पष्ट होईल.

तक्ता क्र. १  :रेडिओ-संचांच्या परवाना-फीचे स्वरूप

परवाना-प्रकार

प्रतिवर्षीय फी (रुपयांत)

१.

घरगुती रेडिओ

१५·००

२.

वाणिज्यविषयक रेडिओ-परवाना

 

नागरी भागासाठी

५०·००

ग्रामीण भागासाठी

३०·००

कमी किंमतीच्या रेडिओ-संचासाठी

१५·००

३.

स्वस्त रेडिओ

७·५०

४.

स्वत:च्या मालकीचा रेडिओ (बिन-व्यापारी)

१५·००

 

स्वत:च्या मालकीचा रेडिओ (व्यापारी)

४०·००

५.

प्रात्यक्षिक रेडिओ

१५·००

६.

शाळांसाठी रेडिओ

३·००

७.

पर्यटक परवाना

७·५०

८.

एकापेक्षा अधिक रेडिओ-संच (घरगुती)

३·००

९.

एकापेक्षा अधिक रेडिओ-संच (वाणिज्यविषयक)

१०·००


तक्ताक्र.२:३१ डिसेंबर १९७२ अखेर भारतातील रेडिओ-संचांच्या वापराचे वर्गीकरण

१.

घरगुती

९८,३४,८९८

 

सवलतीचा :

 

२.

स्वस्त

२७,१६,४४३

३.

समूह

८६,७३९

४.

शाळा

१८,२८३

५.

इस्पितळ

२,७५५

६.

नागरी

१,०४,१४२

 

व्यावसायिक

 

७.

ग्रामीण

२८,४९३

८.

कमी  किंमतीचे

१७,५७२

९.

प्रात्यक्षिक

५,५०२

 

मालकी

 

१०.

व्यापारी (Dealer)

३६,२६४

११.

बिनव्यापारी (Non-Dealer)

३,४४४

 

एकूण रेडिओ-संच :

१,२८,९४,५३५

रचना : भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी-खात्याच्या अखत्याराखाली आकाशवाणी व दूरचित्रवाणी या दोहोंचे कार्य चालते. आकाशवाणीचे महानिदेशक खात्याच्या मंत्र्यांनी सुचविलेल्या योजना कार्यवाहीत आणतात. आकाशवाणीचे कार्यविभाग व तंत्रविभाग असे दोन भाग पडतात. प्रक्षेपणाची सर्व तांत्रिक बाजू आकाशवाणीचा प्रमुख अभियंता सांभाळतो. आकाशवाणीची केंद्रे सर्व प्रमुख शहरी असून कार्यक्रम विशिष्ट भागात ऐकू येण्यासाठी उपकेंद्रे उभारलेली आहेत. रेडिओ-केंद्राचे प्रमुख, केंद्राधिकारी असून ते कार्यक्रम व देखरेखीची बाजू पाहतात केंद्राचा अभियंता व त्याचे साहाय्यक अधिकारी केंद्राची तांत्रिक बाजू सांभाळतात. बहुतेक सर्व कार्यक्रम अगोदरच फीतमुद्रित केलेले असल्याने कार्यक्रमांचा तपशील तीनचार महिन्याआधीच ठरविता येतो. प्रत्येक राज्यातील इतर केंद्रे राज्यातील मुख्य केंद्राच्या मदतीने चालतात. एक मध्यवर्ती कार्यक्रम-साहाय्यक समिती महानिदेशकाला वेळोवेळी सल्ला देते. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्राची स्थानिक सल्लागार-समिती असते. वेळोवेळी समितिसदस्यांनी केलेल्या सूचना महानिदेशकाकडे पाठविल्या जातात आणि केंद्र त्यानंतर त्या सूचना अंमलात आणण्याचे प्रयत्न करते. आकाशवाणीचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे असून त्यात प्रसार-भवन व आकाशवाणी-भवन ह्या दोहोंचा समावेश होतो.

आकाशवाणीच्या प्रत्येक केंद्रात संगीत-विभाग, नभो-नाट्यविभाग यांसारखे विभाग असतात. कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार कलावंतांची योजना केली जाते. शालेय कार्यक्रम, स्त्रियांसाठी कार्यक्रम, बालगोपालांसाठी कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम, भाषण-विभाग वगैरे निरनिराळे विभाग असून विभागश: कलावंतांची वर्गवारी केलेली असते. प्रत्येक विभागाचे संचलन निर्माता (प्रोड्यूसर) करीत असतो. स्त्रियांच्या कार्यक्रमांसाठी स्त्री-निर्माता असून त्या विभागात एक किंवा दोन स्त्री-कलावंत मदतीसाठी नेमलेले असतात.

आकाशवाणीवरील कर्मचाऱ्यांचे सरकारी नोकर व बिनसरकारी नोकर असे दोन ढोबळ विभाग आहेत. सरकारी नोकर कायम स्वरूपाचे असतात त्यांचा करार ते सेवानिवृत्त होईपर्यंत म्हणजे ५५ ते ५८ वयोमर्यादेपर्यंत असतो. त्यानंतर त्यांना निवृत्तिवेतन मिळते. ह्याशिवाय कमी कालमर्यादेचे करार असलेल्या कर्मचाऱ्यांचीही आकाशवाणी आवश्यकतेनुसार नियुक्ती करते. हे करार पंधरवड्यापासून एका वर्षापर्यंतचे असतात.

आकाशवाणी नित्य नवेनवे उपक्रम हाती घेत असते. कार्यक्रमातील नावीन्य हा तर प्रत्येक केंद्राचा प्रधान हेतू असतो. नवीन लेखक, नवीन कलावंत मिळविण्याकरिता अखिल भारतीय स्वरूपाच्या संगीत-स्पर्धा, श्रुतिका-स्पर्धा वेळोवेळी आयोजित केल्या जातात. बालकलावंतही अशाच स्पर्धांतून निवडले जातात.

दिल्ली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या चार शहरी आकाशवाणीचे शक्तिशाली प्रक्षेपक आहेत. ते लघुतरंगांवर कार्य करतात ते ५० ते १०० किवॉ. शक्तीचे असून काही ठिकाणी १५० किवॉ. ते प्रक्षेपकही बसविण्यात आले आहेत. एक हजार किवॉ.चे प्रक्षेपक दोन असून त्यांपैकी एक कलकत्त्याजवळ व दुसरा राजकोटजवळ आहे. मध्यम तरंगांवर ध्वनिक्षेपण करणारे प्रक्षेपक ५ ते २० किवॉ. शक्तीचे आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात मध्यम तरंगांचे किमान एक तरी मुख्य केंद्र असून आकाशवाणीने सोयीनुसार एक, दोन किंवा तीन उपकेंद्रे निर्माण केली आहेत. उदा., महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे व नागपूर येथे अनुक्रमे ५०, २० व २० किवॉ. चे प्रक्षेपक आहेत. पुणे केंद्राचे कार्यक्रम सांगली व परभणी येथील उपकेंद्रांवरून सहक्षेपित केले जातात.

कार्य : आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या एकूण कार्यक्रमांपैकी संगीत-कार्यक्रमांचा (भारतीय संगीत) ४३·० टक्के वाटा असून उर्वरित कार्यक्रमांमध्ये बातमीपत्रे, वार्तापट, भाषणे, चर्चा, मुलाखती, नाटके, प्रधान कार्यक्रम इत्यादींचा विविध विषयस्पर्शी समावेश असतो. आकाशवाणीतर्फे प्रसारित केल्या गेलेल्या अंतर्गत व विदेश-सेवा-कार्यक्रमांची रचना व त्यांसाठी देण्यात आलेला कालावधी यांची तक्ता क्र. ३ व तक्ता क्र. ४ यांवरून स्पष्ट कल्पना येईल.


तक्ता क्र. ३:अंतर्गत सेवाकार्यक्रम (१९७२)

कार्यक्रमाचा प्रकार

कालावधी

सु. टक्केवारी

तास

मिनिटे

प्रादेशिक सेवा 

     
 

भारतीय संगीत 

     
 

शास्त्रीय (गायन)

२१,३३२

४५

८·२

 

शास्त्रीय (वाद्यसंगीत)

२०,५६७

५९

७·८

 

लोकसंगीत (गायन)

७,४९८

३२

२·९

 

लोकसंगीत (वाद्य)

२३७

०१

०·१

 

सुगम संगीत (गायन)

२६,२२१

४३·५

१०·०

 

सुगम संगीत (वाद्य)

२,७८१

०१

१·१

 

भक्तिसंगीत

१३,०२१

०४

५·०

 

चित्रपट संगीत

१४,२११

१४

५·४

 

पश्चिमी संगीत 

६,५०९

४५·५

२·५

 

भाषणे, चर्चा इ.

१८,०७२

६·९

 

नाटके, विशेष कार्यक्रम, रूपके इ.

१०,५७१

१९

४·०

 

बातमीपत्रे

५९,५२४

५८

२२·७

विशेष ध्वनिक्षेपित कार्यक्रम 

     
 

धार्मिक

४७६

१५

०·२

 

मुलांकरिता

३,६४५

०७·५

१·४

 

स्त्रियांकरिता

३,७४८

४०

१·४

 

ग्रामीण

१६,१८३

५१

६·२

 

औद्योगिक कामगारांकरिता

३,६९२

५६

१·४

 

सैन्याकरिता

४,९७३

३९

१·९

 

जनजातिक्षेत्र

४,७०३

३८

१·८

 

शैक्षणिक

६,३२४

४२

२·४

 

प्रसिद्धी

४,६१७

१६

१·८

 

इतर

१२,७९८

५६·५

४·९

   

एकूण:

२,६१,७१४

२३·०

१००·००

 

विविध भारती

 

१,३३,२९१

०६

—-

 

समग्र बेरीज

 

३,९५,००५

२९

—–

  

तक्ता क्र. ४:विदेश सेवा कार्यक्रम (१९७०)

कार्यक्रमाचा प्रकार

कालावधी

सु. टक्केवारी

तास

मिनिटे

संगीत 

     
 

भारतीय

८,८३४

३५

५२·०६

 

पश्चिम आशियाई

३३४

२५

१·९०

 

आफ्रिकी

४८

३०

०·२८

 

पूर्व आशियाई

५४५

२०

३·२१

भाषित (Spoken word)

     
 

बातमीपत्रे

२,५५५

१५

१५·०५

 

भाषणे, चर्चा इ.

२,२९५

२५

१३·५०

 

विशेष कार्यक्रम, रूपके, नाटके इ.

४७०

२०

२·७६

 

प्रसिद्धी

६५०

२५

३·८३

 

इतर

१,२३७

१५

७·३१

   

समग्र बेरीज:

१६,९७०

१०

१००·००


(१) स्त्रियांसाठी कार्यक्रम : हे कार्यक्रम इंग्रजीतून (काही ठराविक केंद्रांवरून) व भारतीय भाषांतून दर आठवड्यास दोन वेळा व काही केंद्रांवरून तीन वेळा प्रसारित केले जातात. प्रत्येक कार्यक्रमाचा कालावधी ३० ते ४५ मिनिटांचा असतो. त्यांमध्ये भाषणे, परिसंवाद, गोष्टी व गाणी ह्यांचा समावेश असतो. मुलांसंबंधीची काळजी कशी घ्यावी, कुटुंबनियोजन, आरोग्यविषयक बाबी, घरकारभार, पोषण वगैरे बव्हंशी स्त्रियांच्या आवडीचेच अनेक उपक्रम यांत असतात. मुंबई केंद्रावरून मंगळवारी व शुक्रवारी ‘वनितामंडळ’ या नावाने दुपारी १२ ते १२·४० आणि पुणे केंद्रावरून रविवार, बुधवार व शनिवार या दिवशी ‘गृहिणी’ या नावाने दुपारी १ ते १·४० असे ४० मिनिटांचे महिलांना आवडतील असे कार्यक्रम प्रसारित केले जातात. हे कार्यक्रम ऐकणाऱ्या महिलांचे गट तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाते. ३० जून १९६९ अखेर महिलांचे अशा प्रकारचे ४,७६० क्लब होते. भूतानी, तिबेटी, सिक्किमी, नेपाळी वगैरे विदेशी भाषांमधूनही स्त्रियांसाठी कार्यक्रम प्रसारित होतात. (२) ग्रामीण कार्यक्रम :ग्रामीण जनतेला रेडिओ-संच पुरविण्याचे काम राज्यसरकारांचे असते. ग्रामीण जनता ही मुख्यत: कृषिव्यवसायी असल्याने ह्या कार्यक्रमांतून शेती, शिक्षण, आरोग्य वगैरेंसंबंधीची माहिती व ग्रामीण जनतेला रुचतील असे विविध उपक्रम संवाद, चर्चा, नाटके इत्यादींद्वारा सादर केले जातात. आकाशवाणीची ४१ प्रसारकेंद्रे प्रतिदिनी अर्धा तास ते तीन तास इतक्या कालावधीचा ग्रामीण कार्यक्रम सादर करतात. आतापर्यंत सु. दोन लक्ष रेडिओ-संच ग्रामीण विभागात त्या त्या गावाच्या ग्रामपंचायतीला दिले गेले आहेत. १७ नोब्हेंबर १९५९ पासून ‘रेडिओ ग्रामीण चर्चामंडळे योजना’ (रेडिओ रूरल फोरम स्कीम) कार्यान्वित झाली. या योजनेनुसार शेतकरीसमूह व कृषितज्ञ यांमध्ये संपर्क साधला जाऊन शेतकऱ्यांच्या शंका-समस्यांचे निरसन केले जाते. ही चर्चामंडळे राज्याचे शेतीखाते व शेतकरी ह्यांमधील दुवा बनली आहेत. १९७१ च्या मध्यापर्यंत देशात २५,८०० ग्रामीण चर्चामंडळे कार्य करीत होती. शेतकऱ्यांना शैक्षणिक व इतर तांत्रिक माहिती देण्यासाठी २७ शहरांतून ‘शेत व गृह विभाग’ (फार्म अँड होम युनिट्स) उभारण्यात आलेले असून चौथ्या योजनेत आणखी १९ विभाग उभारावयाचे होते. हे विभाग तज्ञ व माहीतगार व्यक्तींकडून चालविण्यात येतात. त्यांच्या द्वारा दररोज ३० मिनिटांचा प्रमुख कार्यक्रम संध्याकाळी व पाच ते दहा मिनिटांची विशेष विज्ञप्ती सकाळी व दुपारी प्रसारित केली जाते. (३) राष्ट्रीय संगीत कार्यक्रम :१९५२ पासून सुरू करण्यात आले असून दर शनिवारी हे सादर करण्यात येतात. ते नव्वद मिनिटांचे असतात. हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. उत्तर हिंदुस्थानी व कर्नाटक संगीताचे कार्यक्रम आलटूनपालटून आठवड्यास प्रसारित केले जातात. (४) भाषणे :राष्ट्रीय पातळीवरून महत्त्वाच्या विषयांवर नामवंत व्यक्तींची भाषणे दर रविवारी व बुधवारी १९५३ पासून सुरू करण्यात आलेली आहेत. (५) राष्ट्रीय प्रकल्प :जनतेला पंचवार्षिक योजनांबाबत सतत जागरूक ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा देशातील एखाद्या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाबद्दल माहिती देणारा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांद्वारा प्रसारित केला जातो. पंचवार्षिक योजनांमुळे देशात झालेल्या व होत असलेल्या प्रगतीचे सम्यक दर्शन आकाशवाणी ‘विशेष श्रोतृसभा कार्यक्रम’ आयोजित करून देत असते. १९७०-७१ मध्ये अशा प्रकारचे ६,८४५ कार्यक्रम सादर करण्यात आले. (६) विविध भारती :३ ऑक्टोबर १९५७ पासून कार्यान्वित झालेला हा सुश्राव्य कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरला आहे. त्यात चित्रपट-संगीत, लोकसंगीत, छोट्या श्रुतिका, प्रहसने यांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. सध्या तो दररोज बारा तासांहून अधिक काळ विविधभारतीच्या २९ केंद्रांवरून मध्यमतरंगांवर व लघुतरंगांवर प्रसारित होतो. (७) वार्ता-सेवा-विभाग :आकाशवाणी दररोज २३५ बातमीपत्रे (अंतर्गत १७८ व विदेशीय ५७) प्रसारित करते. अंतर्गत बातमीपत्रांमध्ये दररोज ८३ बातमीपत्रे दिल्ली केंद्रावरून इंग्रजी, हिंदी व इतर १६ भारतीय भाषांमधून प्रसारित केली जातात व ती विविध केंद्रांवरून त्या त्या भाषेतून व बोलभाषेद्वारा (९५ बातमीपत्रे १८ भाषा व ३४ बोलभाषा) सहक्षेपित होतात. इंग्रजी भाषेतून ११ बातमीपत्रे हिंदी २० आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मलयाळम्, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू व उर्दू प्रत्येकी ३ काश्मिरी, डोग्री व सिंधी प्रत्येकी २ आणी गुरखाली व नेफा-आसामी भाषांतून प्रत्येकी एक वेळ अशी बातमीपत्रे असतात. जुलै १९७४ पासून प्रतिदिनी सकाळी ९·०० ते ९·०५ असे पाच मिनिटांचे बातमीपत्र संस्कृत भाषेतून २४ केंद्रांवरून प्रसारित करण्यात येऊ लागले आहे. अंतर्गत व विदेशसेवा-बातमीपत्रांसाठी अनुक्रमे अठरा भाषा व चौतीस बोलभाषा आणि चोवीस भाषा वापरतात. वार्तासेवा-विभागाने तयार केलेले दहा मिनिटांचे वार्तापट (रेडिओन्यूजरील समाचार-दर्शन) दिल्ली केंद्रावरून इंग्रजी व हिंदी भाषांतून दर आठवड्यास एक दिवसाआड सबंध देशभर प्रसारित केले जातात. १९ नोव्हेंबर १९७२ पासून प्रतिदिनी ९५ मिनिटांची क्रीडावार्ता मुंबई, कलकत्ता, मद्रास व दिल्ली केंद्रांवरून प्रसारित करण्यात येऊ लागली आहे. आठवड्यातून एकदा, देशातील निरनिराळ्या भागांत चालू असलेल्या खेळांचे समालोचनही करण्यात येते. संसदेचे अधिवेशन चालू असताना वार्ता-सेवा-विभाग दररोज इंग्रजी व हिंदी भाषांतून एकाच वेळी दहा मिनिटांचे संसदीय कामकाजांचे समालोचन करतो. काही राज्यांच्या विधानसभांतील कामकाजाचे वर्णनही त्या त्या प्रादेशिक भाषेतून व प्रसारकेंद्रावरून अलीकडे प्रसारित होऊ लागले आहे. राज्यांच्या राजधान्यांतून प्रतिदीनी एकूण पंधरा मिनिटांचे प्रादेशिक बातमीपत्र, इंग्रजी वगळून, त्या त्या राज्याच्या भाषेतून प्रसारित केले जाते. त्याचप्रमाणे, छोट्या वृत्तपत्रांच्या सोयीसाठी प्रतिदिनी अर्धा तास इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून संथगति-बातमीपत्रे प्रक्षेपित केली जातात. वार्ता-सेवा-विभागाने भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून आपले ५९ पूर्ण-कालिक व ९० अंश-कालिक बातमीदार ठेवले आहेत तसेच पश्चिम आशिया व आग्नेय आशिया येथेही वार्ता-सेवा-विभागाचे बातमीदार आहेत. याशिवाय, दिल्ली व सिमला येथे उभारण्यात आलेल्या ‘अनुश्रवण-सेवा-केंद्रा’ मार्फत (मॉनिटरिंग सर्व्हिस सेंटर) जगातील २१ रेडिओकेंद्रांचे कार्यक्रम ११ भाषांतून प्रसारित केले जातात. (८) विदेश-सेवा-विभाग : भारताची प्रतिमा परदेशात अधिक चांगल्या तऱ्हेने प्रतीत होण्यासाठी तसेच परदेशातील भारतीयांकरिता हा विभाग १ ऑक्टोबर १९३९ पासून कार्यान्वित झाला. दररोज २४ भाषांमधून सु. ५३ तास चालणाऱ्या या कार्यक्रमात संगीत, परिसंवाद ह्यांबरोबर भारतीय संस्कृती, राजकारण, धोरण, कलाविषयक कार्यक्रम इत्यादींचा विशेष अंतर्भाव असतो. विदेश-प्रक्षेपणाची कार्यक्रम-प्रसिद्धी इंडिया कॉलिंग  या इंग्रजी मासिकाद्वारा आणि दहा परदेशी भाषांमधील त्रैमासिकांद्वारा केली जाते. प्रत्येकी १,००० किवॉ. शक्तीचे दोन मध्यमतरंग-प्रक्षेपक आकाशवाणीने विदेशसेवेसाठी मागविलेले आहेत. (९) विज्ञापन-कार्यक्रम :१ नोव्हेंबर १९६७ मध्ये आकाशवाणीच्या मुंबई, पुणे व नागपूर या तीन केंद्रांवरून (विविध भारतीच्या  कार्यक्रमांमधून) व्यापारी जाहिराती प्रसारित करण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नंतर आणखी चार केंद्रांवरून विज्ञापन-कार्यक्रम सुरू करण्यात आले. सध्या ही सेवा फक्त कमी शक्तीच्या प्रक्षेपकावरून प्रसारित होते. आकाशवाणीच्या सल्लागार-मंडळाने केलेल्या सूचनांनुसार विज्ञापन-कार्यक्रम, मद्रास, कलकत्ता, दिल्ली, तिरुची व अहमदाबाद या केंद्रांवर चालू करण्यात आलेले आहेत. सध्या विज्ञापन-कार्यक्रम १८ केंद्रांवरून प्रसारित होतात. आकाशवाणीला विज्ञापन-कार्यक्रमांद्वारा आरंभापासून ३१ मार्च, १९७२ अखेरपर्यंत १०,४९,९०,७९० रु. समग्र उत्पन्न मिळाले. (१०) युवावाणी :तरुण रक्ताला कार्यक्रमातून वाव देण्याच्या धोरणाला अनुसरुन खास युवक-युवतींसाठी म्हणून आकाशवाणीने ‘युवावाणी’ नावाचा एक आगळाच कार्यक्रम २१ जुलै १९६९ पासून सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक महाविद्यालये, विद्यापीठे ह्यांच्याबरोबर कायम संपर्क साधतात तरुण पिढीला काय पाहिजे याचा विचार करण्यासाठी पुढारी, कलावंत, प्राध्यापक, युवक-युवतींचे प्रतिनिधी यांना पाचारण करून अनेक उद्बोधक विषयांवर चर्चा घडवून आणतात. युवावाणीचे तरुण पिढीने स्वागत केले असून भारतातील बहुतेक प्रमुख केद्रांमधून या कार्यक्रमास स्थान मिळाले आहे. (११) भाषा-पाठ : अनेक केंद्रांवरून निरनिराळ्या भाषांचे शैक्षणिक पाठ देण्यात येतात व त्यांयोगे निरनिराळ्या भाषा शिकण्यास आकाशवाणीद्वारा हातभार लावला जातो. संस्कृत भाषेचे ५२ पाठ प्रसारित केले जातात. हिंदी भाषा न बोलणाऱ्या बिगर-हिंदी प्रदेशातील लोकांकरिता आकाशवाणीच्या केंद्रांवरून हिंदीभाषेचे पाठ प्रसृत होतात. १९७०-७१ या वर्षात हैदराबाद, बंगलोर व पंजाबमधील लोकांकरिता असे हिंदी भाषेचे पाठ शिकविण्यात आले. त्याच वर्षी पुढील केंद्रावरून कंसांतील भाषांचे पाठ प्रसारित करण्यात आले : भोपाळ (मलयाळम्), जयपूर (कन्नड), लखनौ व दिल्ली (तमिळ), पाटणा (तेलुगू) आणि रांची (पंजाबी). अलाहाबाद व दिल्ली केंद्रांवरून १९७१ साली अनुक्रमे उडिया वा असमिया आणि बंगाली या भाषांचे पाठ देण्याची योजना होती. (१२) कुटंबनियोजन-कार्यक्रम :कुटुंबनियोजनाचा संदेश देशभर अधिक परिणामकारक रीत्या पसरविण्यासाठी २२ विशेष विभाग २२ प्रसार-केंद्रांमध्ये स्थापण्यात आले आहेत. आणखी १४ प्रसार-केंद्रांतून असे विभाग उभारण्याचे कार्य चालू आहे. विज्ञापन-कार्यक्रमाद्वारेही कुटुंबनियोजनाचा संदेश प्रसारित केला जातो.(१३) शैक्षणिक कार्यक्रम : शाळांकरिता २० ते ४० मिनिटे कालावधीचे शैक्षणिक कार्यक्रम आकाशवाणीच्या २७ प्रसारकेंद्रांमधून आठवड्यातून दोन ते पाच दिवस सादर केले जातात. (१४) मुलांसाठी कार्यक्रम :आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून २० ते ५० मिनिटांच्या कालावधीचे मुलांसाठी कार्यक्रम (उदा., पुणे केंद्रावरून ‘बालोद्यान’ मुंबईवरून ‘गंमतजंमत’) त्या त्या राज्यातील भाषेतून सामान्यत: आठवड्यातून दोन वेळा व काही केंद्रांवरून तीन वेळा सादर करण्यात येतात. काही केंद्रे हे कार्यक्रम स्थानिक बोलभाषेतूनही प्रसारित करतात. ह्याशिवाय बंगलोर, मुंबई व मद्रास केंद्रे दर आठवड्यास इंग्रजी भाषेतून ३० मिनिटांचा कार्यक्रम प्रसृत करतात. पुष्कळ केंद्रे ग्रामीण कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून मुलांसाठी कार्यक्रम आखतात. मुलांचे कार्यक्रम ब्रह्मी, तिबेटी, नेपाळी इ. विदेशी भाषांतूनही प्रसारित केले जातात. ह्या कार्यक्रमांत भाषणे, चर्चा, संवाद, नाटके, रूपके, संगीत, कथा, गाणी, विडंबनात्मक काव्य-लेख इत्यादींचा समावेश असतो. मुलांचे कार्यक्रम ऐकणाऱ्या मुलांचे गट-समूह स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले जाते. जून १९६९-अखेरीस देशात असे ८,०८० गटसमूह होते. (१५) औद्योगिक कामगारांसाठी कार्यक्रम :हे कार्यक्रम आकाशवाणीच्या २३ केंद्रांवरून सादर करण्यात येतात. त्यायोगे कामगारांस माहिती व मनोरंजन तर लाभतेच, पण त्याशिवाय कामगारांना उद्योगांच्या समस्या व त्यांसंबंधीचे कायदेकानू ह्यांचीही ओळख होते. गौहाती व कुर्सेआँग या केंद्रांवरून चहाच्या मळ्यांत काम करणारे कामगार व त्यांचे कुटुंबीय ह्यांच्याकरिता विविधि कार्यक्रम प्रसारित होतात. १९७० च्या अखेरीस देशात ५५० औद्योगिक ‘कामगार श्रोतृ-मंडळे’ कार्य करीत होती. ग्रामीण भागातील उद्योगप्रवर्तक आणि शिक्षित तरूण यांना उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांना लघु-उद्योग क्षेत्राकडे आकृष्ट करण्यासाठी, लघु-उद्योगांविषयी विशेष कार्यक्रम कालिकत, जलंदर, पाटणा व विजयवाडा केंद्रांवरून सुरू करण्यात आले आहेत. (१६) भारतीय सेनेसाठी कार्यक्रम : भारतीय जवानांकरिता आकाशवाणीच्या १२ प्रसारकेंद्रांवरून दररोज विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. त्यांत लोकप्रिय संगीत, करमणूक व मनोरंजनाचे विषय, सर्वसाधारण आणि जवानांना रुचतील अशा वार्ता इत्यादींचा समावेश असतो. ह्याशिवाय विविधभारती-सेवांतर्गत ‘जयमाला’ ह्या नावाने तीन विशेष कार्यक्रम दररोज प्रसारित होतात. दर शनिवारी चित्रपटजगातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती- दिग्दर्शक, गायक, अभिनेता, निर्माता, संगीत-दिग्दर्शक वगैरे – ‘जयमाला’ कार्यक्रम सादर करते. सैन्याच्या तुकड्या ज्या ज्या ठिकाणी असतील, त्या त्या ठिकाणी काही वेळा जवानांकरिता विशेष संगीत-सभा आयोजित केल्या जातात. जवानांना आपल्या कुटुंबियांकरिता आकाशवाणीच्या ह्या विभागाकडून निरोप पाठविण्याची सुविधा आहे. (१७) जमातींसाठी कार्यक्रम : भारतातील विविध जमातींचे संगीत आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आकाशवाणी ९१ जमातींच्या बोलभाषांतून १७ प्रसारकेंद्रांवरून आपल्या कार्यक्रमांचे प्रसारण करीत असते. (१८) प्रतिलिपिसेवाविभाग : आकाशवाणीच्या या विभागाने आपल्या ‘ध्वनिपुरालेखग्रंथालया’त (लायब्ररी ऑफ साउंड आर्काइव्ह्‌ज) प्रख्यात व्यक्तींच्या मुलाखती, देशाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या घटना व प्रसंग ह्यांच्या फीतमुद्रिका, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या भाषणमुद्रिका ह्यांचा १७,५०० च्यावर संग्रह केलेला आहे. हिंदुस्थानी व कर्नाटक संगीताच्या प्रख्यात गायकांच्या ध्वनिमुद्रिका त्याचप्रमाणे महत्त्वाची रूपके इत्यादींचाही या ग्रंथालयात समावेश आहे.

  

कार्यक्रम-प्रसिद्धी : आकाशवाणीच्या कार्यक्रम-प्रसिद्धीकरिता आकाशवाणी (इंग्रजी व हिंदी) व आवाझ (उर्दू) नवी दिल्लीहून बेतर जगत (बंगाली) व आकाशी (असमिया) कलकत्त्याहून वाणोली (तमिळ) व वाणी (तेलुगू) मद्रासहून आणि नभोवाणी (गुजराती) अहमदाबादहून अशी आठ नियतकालिके आठ भाषांतून प्रसिद्ध करण्यात येतात. इंग्रजीतून प्रसिद्ध होणारे नियतकालिक हे साप्ताहिक व इतर सर्व पाक्षिके आहेत. एप्रिल १९७१ मध्ये आकाशवाणीने आकाशवाणी शब्दकोश प्रसिद्ध केला आहे. 


माहिती व नभोवाणी-मंत्रालयाच्या अखत्यारात ‘भारतीय जनसंचारण संस्था’ (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स’) नावाची एक स्वायत्त संस्था १९६५ मध्ये स्थापण्यात आली. भारतात अशा धर्तीची ही एकमेव संस्था आहे. ही संस्था संपर्कमाध्यमाचे शिक्षण देते. हा विशेष शिक्षणक्रम पंधरा महिन्यांचा असून तो केंद्रीय माहिती-सेवा व राज्यांच्या जनसंपर्क-खात्यातील अधिकाऱ्यांसाठी आहे. कोलंबो-योजनेखालील काही देशांतील उमेदवारांकरिता जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. ही संस्था स्थापण्याच्या कामी भारत सरकारला यूनेस्को व एशिया फौंडेशनकडून आर्थिक साह्य मिळाले. 

माहिती आणि नभोवाणी-खात्याच्या विकासाच्या संबंधात ए. के. चंदा ह्यांच्या अध्यक्षतेखाली १९६४मध्ये एक समिती स्थापण्यात आली. समितीचा अहवाल १९६६मध्ये प्रसिद्ध झाला. आकाशवाणी-दूरचित्रवाणी-माध्यमांचा योग्य वापर करुन निरक्षरता थोड्या काळात नाहीशी करता येईल, असा समितीला विश्वास आहे. तसेच आकाशवाणी स्वायत्त संस्था करण्याबाबतही समितीने मतप्रदर्शन केले आहे. तथापि आकाशवाणीचे स्वायत्त निगमामध्ये रुपांतर करण्याचा, तसेच दूरचित्रवाणीसाठी निराळा निगम स्थापन करण्याचा सध्या तरी इरादा नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. 

भारताच्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांत आकाशवाणी-दूरचित्रवाणी ह्या माध्यमांना फार गौण स्थान मिळाले. चौथ्या योजनेत माहिती व नभोवाणी-खात्याने आकाशवाणीच्या विकासाकरिता ४० कोटी रुपयांची योजना आखली आहे. तीमध्ये २६ नवी आकाशवाणी केंद्रे, २१ योजनाविषयक व १७ कृषिविषयक प्रसारण-विभाग (ब्रॉडकास्टिंग सेल) उभारले जावयाचे होते. मध्यम-लहरींवरुन प्रसारित होणारा कार्यक्रम तसेच विज्ञापन-प्रसारण-कार्यक्रम यांचा विस्तार आणि विदेश-सेवा-विभागाची वाढ, असे चौथ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. या योजनेअखेर सु. ८० टक्के लोकसंख्येस मध्यम-लहरींवरून प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकता येतील, अशी अपेक्षा आहे. 

 आकाशवाणीच्या सर्व प्रक्षेपकांची एकूण शक्ती आणि आकाशवाणी उपलब्ध करीत असलेल्या सेवांचे वैविध्य व विस्तार ह्या गोष्टी लक्षात घेतल्यास, सबंध जगामध्ये आकाशवाणीचा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन व रशिया या देशांतील रेडिओ कार्यक्रम प्रक्षेपणयंत्रणांच्या खालोखाल चौथा क्रमांक लागतो. ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या आकाशवाणीने लोकसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा एक मोठा संग्रह तयार केला असून साहित्यसमारोह, राष्ट्रीय कविसभा, संगीतसंमेलन, गौरवग्रंथमाला इ. अनेक कार्यक्रमांद्वारा ती भारतीय जनतेला विभिन्न प्रादेशिक संस्कृतींचा परिचय करून देत आहे.

पहा : दूरचित्रवाणी रेडिओप्रेषण. 

फाटक, अ. श्री. गद्रे, वि. रा.