अनंतमूळ : (उपरसाळ, अनंतवेल हि. हिंदी सालस क. मगरबू इं. इंडियन (कंट्री) सार्सापरिला, लॅ. हेमिडेस्मस इंडिक्स, कुल—ॲस्क्लेपीएडेसी). ⇨रुई  व मांदार यांच्या कुलातील ही वनस्पती झुडुपासारखी किंवा जमिनीसरपट वाढणारी असून भारतात उत्तर प्रदेश कोकण, दख्खन, पश्चिम घाट इ. प्रदेशांत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळते. शिवाय श्रीलंकेत, पाकिस्तान व उष्ण कटिबंधात इतरत्रही रानटी अवस्थेत आढळते. ही वेलीसारखीही चढते. खोड बारिक असून पेरी जाड असतात. पानांची मांडणी समोरासमोर असून काही पाने साधी निमुळती व अरुंद तर काही रुंद असतात. पुष्कळ वेळा पानांवर लहान-मोठे पांढरे ठिपके असतात. पाने वरील बाजूस गडद हिरवी व खालील बाजूस पांढरट असून त्यावर लव असते. देठ लहान असून पानांच्या बगलेत फुलांचे कुंठित फुलोरे [→ पुष्पबंध] असतात. फुले लहान असून (सु. ०·५ ते ०·६ सेंमी. व्यासाची) बाहेरून हिरवी व आतून जांभळी असतात. पेटिकाफळे [→ फळ] सु. १० ते १५ सेंमी.लांब व सु. ०·६ सेंमी. रुंद गोल, गुळगुळीत, शेंड्याकडे टोकदार, सरळ किंवा किंचित वाकडी असतात बिया काळसर असतात. इतर सामान्य लक्षणे⇨ॲस्क्लेपीएडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

खऱ्या सार्सापरिलाखेरीज त्याच गुणधर्माचे दुसरे उत्तम औषध म्हणजे या भारतीय वनस्पतीची मुळे. ही गोड, शोथशामक (दाह कमी करणारी), रक्तशुद्धिकारक, मूत्रल, पौष्टिक व स्वेदक (घाम आणणारी) असतात. त्यांचा उपयोग अग्निमांद्य, ताप, कातडीचे रोग, पांढरा विटाळ, मुरलेला कफ इत्यादींसाठी करतात. या मुळांपासून केलेली खळ सूज आलेले भाग, गळवे किंवा संधिवात यांसाठी वापरतात.

हर्डीकर, कमला श्री.