आकार, कलेतील : सौंदर्यानुभूती निर्माण करणारी असाधारण रचना म्हणजे कलेतील आकार (फॉर्म) होय. सामान्यत: कलेतील आकाराची संकल्पना ही सुसंघटना, लय, साम्य, विरोध, समतोल यांसारख्या सौंदर्यतत्त्वांवर अधिष्ठित आहे. काहींच्या मते, कलेतील सौंदर्याकार कलाविषयीभूत गोष्टीच्या लौकिक आकाराहून भिन्न असतो. कलावंताला त्या गोष्टीचा जो शुध्द सौंदर्याकार अभिप्रेत असतो, तो सौंदर्यभावनेने प्रेरित झालेला असतो. असा शुध्द सौंदर्याकार रसिकमनावर सौंदर्यंभावनेचाच परिणाम घडवून आणतो. सौंदयाकार म्हणजे शैली, असेही एक मत प्रचलित आहे.
कलेतील सौंदर्याकार इंद्रियगम्य असतो. तो डोळ्यांनी पाहता येतो. कानांनी श्रवण करता येतो किंवा स्पर्शाने समजू शकतो. चित्र, शिल्प, वास्तू यांसारख्या रूपण कलांच्या सौंदर्याकारात काल व अवकाश यांना कायमचे नियत स्वरूप लाभलेले असते. संगीत, नृत्य, नाट्य, यांसारख्या प्रयोगीय कलांच्या सौंदर्याकारात त्यांचे स्वरूप चलत व गतिमान असते.
चित्रकलेतील सौंदर्याकार लांबीरुंदीच्या दोनच मितीत बध्द असूनही अवकाशाच्या तिसऱ्या मितीचा सूचक असतो. संगीतातील स्वरांचा सौंदर्याकार काळाशी लयींनी बांधलेला असतो. शिल्पकलेतील व वास्तुकलेतील सौंदर्याकार निसर्गाच्या वास्तव, आदर्श वा अप्रतिरूप प्रतिकृतीचा द्योतक असतो.
ललित साहित्यातील सौंदर्याकार मुख्यत: बुध्दीग्राह्य असतो. याचे कारण बहुधा, शब्दांचे अमूर्त माध्यम सांस्कृतिक संस्कारांनी अनेकार्थक बनलेले असते. साहित्यिकाच्या अंत:प्रतिमेचा परिणामही त्यातून व्यक्त वा सूचित होतो.
कलेतील आकाराच्या संदर्भात समीक्षाविषयक दोन भिन्न दृष्टीकोन आढळतात. आकारवादी समीक्षेत कलाकृतीचे सौंदर्य आकाराधिष्ठित आहे, असा दावा करण्यात येतो. एखाद्या कलाकृतीत सर्वसाधारणपणे आशय असला, तरी तो असलाच पाहिजे, असा आकारवादी समीक्षेचा आग्रह नसतो. एखाद्या अप्रतिरूप चित्राकृतीत सेंद्रिय एकता, साम्य, विरोध, समतोल, लय इत्यादींचे आकारिक सौंदर्य असेल, तर ती चित्राकृती चित्राकृती आहे व सौंदर्यपूर्णही आहे. तिचा सर्वसाधारण आशय नैतिक किंवा सामाजिक विचारांशी निगडित असतोच किंवा असलाच पाहिजे, असे नाही. क्लाइव्ह बेलसारख्या समीक्षकांची भूमिका आकारवादी मानली जाते व पुष्कळदा ती जीवनाच्या इतर अंगापासून कलेची फारकत करते. दुसरा आशयवादी दृष्टीकोन कलाकृतीतील सर्वसाधारण आशयाला महत्व देतो. एखाद्या कलाकृतीचा आकार सौंदर्यात्मक वा कलात्मक असणे म्हणजे तिने आपल्या आशयाशी अनुरूप असा आकार धारण करणे होय. म्हणूनच कलेतील आकाराच्या विचारात आशयाचा विचारही आवश्यक असतो, अशी आशयवादी समीक्षेची भूमिका आहे. हे दोन्ही दृष्टीकोन कलासमीक्षेतील मूल्यमापनासंबंधी विरोधी दावे मांडतात तथापि कलेतील सौंदर्याकाराबद्दल त्यांच्या भूमिका भिन्न असल्या तरी दोहोंतही सत्यांश आहे.
पहा : कलासमीक्षा साहित्यसमीक्षा सौंदर्यशास्त्र.
जाधव, रा. ग.