आझमगढ : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे ठाणे. लोकसंख्या ४०,९८२ (१९७१). हे ईशान्य रेल्वेच्या शाहगंज–बल्लिया फाट्यावर, शाहगंजपासून ५७ किमी. व वाराणसीच्या उत्तरेस सडकेने सु. १०० किमी. असून, शहराला तोन्स नदीचा जवळजवळ वेढाच पडलेला आहे. हे शहर इस्लाम धर्म स्वीकारलेल्या गौतम राजपुतांपैकी आझमखानाने १६६५ मध्ये बसवले . त्याने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष व अठराव्या शतकातील एक मंदिर एवढेच जुने अवशेष येथे आहेत. शहराला पुराचा धोका नेहमी असल्याने १८७१ व १८९४ च्या महापुरांनंतर १८९६–९८ मध्ये संरक्षक तट बांधण्यात आला. खांडसरी साखरेचे कारखाने व कापड विणणे हे या शहरातले व्यवसाय आहेत.
ओक, शा. नि.