अज्ञेयवाद : तत्त्वज्ञानातील एक विचारप्रणाली. अज्ञेयवाद हा आंशिक ⇨संशयवाद  होय. संशयवादाची भूमिका अतिरेकी नास्तिवाची असते. मानवाला कोणत्याच प्रकारचे सर्वमान्य, विश्वसनीय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, अशी संशयवादाची शिकवण असते. परंतु अज्ञेयवाद इतक्या अतिरेकी थराला जात नाही. मानवाच्या बुद्धीला प्रत्यक्षानुभवातील इंद्रियगोचर गोष्टींचे, निसर्गसृष्टीचे ज्ञान होऊ शकते पण अनुभवातील सद्वस्तू आणि चिरंतन, निरपेक्ष सत्य ही मात्र ज्ञात होऊ शकत नाहीत या गोष्टी सर्वथा ‘अज्ञेय’च राहतात, अशी अज्ञेयवादाची शिकवण आहे. एकूण, अज्ञेयवाद स्वीकारणे म्हणजे मानवी ज्ञानाला सीमा आहेत आणि ज्ञानार्जनशक्ती मर्यादित आहे, ही भूमिका स्वीकारणे.

अज्ञेयवादास ‘ॲग्नॉस्टिसिझम’ हे इंग्रजी पद टी. एच्. हक्सली (१८२५–९५) या इंग्रज विचारवंताने गेल्या शतकाच्या उत्तरार्धात वापरून लोकप्रिय केले. १८६९ साली स्थापन झालेल्या ‘मेटॅफिजिकल सोसायटी’ नामक एका चर्चामंडळाचे सभासद, आपण अमुक अमुक पंथाचे अथवा वादाचे अनुयायी असल्याचे ठासून सांगत आणि ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व इ. अंतिम, गूढ प्रश्नांविषयीची निश्चित मते आत्मविश्वासपूर्वक मांडीत. परंतु ज्या गोष्टी सिद्ध करण्याजोगा पुरेसा विश्वसनीय पुरावा मिळू शकत नाही, अशा गोष्टींविषयी इतकी ठाम मते मांडणे हक्सली याला रुचत नसे. या अंतिम गोष्टी  ‘अज्ञेय’ आहेत, त्यांच्याविषयीचा पुरावा उपलब्ध होऊ शकत नाही, अशी आपली भिन्न भूमिका दर्शविण्यासाठी हक्सली याने ॲग्नॉस्टिसिझम (अज्ञेयवाद) हे नवे पद तयार केले.

भौतिक शास्त्रांची वाढ होत आहे मानवी ज्ञान वृद्धिंगत होत आहे पण अजून अखिल विश्वव्यापक जडवाद आणि चैतन्यवाद हे दोन्ही परस्परविरोधी सिद्धांत आवश्यक पुराव्याच्या अभावी असिद्धच राहतात. त्याचसोबत हेही खरे, की प्रत्यक्षानुभवातील घटनांच्या शास्त्रीय परिशीलनासाठी जडवादाची भाषा ही चैतन्यवादाच्या भाषेपेक्षा अधिक उपयुक्त ठरते, असे हक्सलीचे म्हणणे होते.

हक्सली याची अज्ञेयवादी विचारसरणी डेव्हिड ह्यूम (१७११–७६), इमॅन्यएल कांट (१७२४–१८०४), ऑग्सूस्त काँत (१७९८–१८५७), सर विल्यम हॅमिल्टन (१७८८–१८५६), एच्. एल्.मॅन्सल (१८२०–७१), हर्बट स्पेन्सर (१८२०–१९०३) या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांच्या आणि गौतम बुद्धाच्या शिकवणीशीही पुष्कळ अंशी जुळणारी आहे. हक्सलीच्या मताचे इतरांच्या मतांशी असलेले साम्य विशद न करता वरील तत्त्ववेत्त्यांच्या मीमांसेमधला अज्ञेयवादी किंवा अज्ञेयवादाच्या जवळ येणारा भाग पुढे दिला आहे :

ह्यूमच्या मते, मानवी ज्ञान इंद्रियानुभवांतून निर्माण होते. इंद्रियसंवेदनांच्या पुंजांची बुद्धिगम्य संगती लागावी म्हणून आपण द्रव्य, ज्ञाता, कार्यकारणभाव आदी संकल्पनांचा उपयोग करतो. परंतु या संकल्पनांना वस्तुस्वरूपात काही आधार नसतो. अनुभवाच्या ओघात सरावाच्या पोटी, ‘अमुक अमुक वेदनांच्या सोबत आणि मागून अमुक अमुक अन्य वेदने येतात’ अशा अपेक्षा आपोआप मनात जागृत होतात आणि या अपेक्षांच्या अनुरोधानेच आपण विविध वेदनांच्या पुंजक्यांना ‘नावे’ देतो, त्यांचे वर्गीकरण करतो, त्यांचे परस्परसंबंध ठरवून टाकतो. हे सारे करताना आपण स्व-रचित द्रव्य, जड वस्तू, आत्मा, ज्ञाता आदी संकल्पना वापरीत असतो. साहजिकच या संकल्पनांना केवळ मानसशास्त्रीय अर्थ असतो तत्त्वमीमांसात्मक मूल्य नसते. त्या केवळ व्यक्तिगत मानसिक प्रक्रिया सुचवितात, वस्तुनिष्ठ सत्य दर्शवीत नाहीत आणि म्हणून जड द्रव्य, आत्मा, परमात्मा आदींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे युक्तिवाद मांडण्यात येतात, ते सारे पोकळ असतात, असे ⇨डेव्हिड ह्यूमने दाखवून दिले. एकंदरीत, आत्मा, परमात्मा आदी ज्या गोष्टी हक्सलीने ‘अज्ञेय’ मानल्या, त्या गोष्टींना ह्यूमच्या मते वस्तुनिष्ठ सत्यत्वच नसते.

ह्यूमच्या संशयवादास उत्तर देण्याच्या प्रयत्नात ⇨इमॅन्युएल कांटने आपल्या जुन्या विवेकवादाचा त्याग केला आणि एका नव्या नैतिक आशयगर्म अज्ञेयवादाचा अंगीकार केला. त्याच्या मते, ज्ञानेंद्रियांद्वारा लाभणाऱ्या वेदनांच्या सामग्रीला, आपली ज्ञानशक्ती स्वतःमध्ये अनुस्यूत असलेले वेदनाकार आणि पदार्थ-प्रकार यांच्या साहाय्याने आकलनीय घाट देते. आपला सगळा अनुभव वेदनाकार आणि पदार्थ-प्रकार मिळून बनलेल्या ह्या चौकटीत संभवतो. वस्तू अनुभवविषय होताना त्यापूर्वी तिच्या स्वरूपाचे ह्या चौकटीत बसू शकेल अशा रीतीने रूपांतर होत असल्यामुळे वस्तूंची खरी मूळ स्वरूपे आपणास अज्ञेयच राहतात. ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व आणि संकल्पस्वातंत्र्य ही तत्त्वेदेखील नैतिक जीवनास आवश्यक असली, तरी प्रत्यक्षानुभवात अथवा तर्कबुद्धीने ती सिद्ध करता येत नाहीत. ती ‘अज्ञेय’च राहतात पण अज्ञेय असल्यामुळे ती असत्य आहेत असे ज्ञानही आपल्याला नसते व म्हणून नीतिप्रवण मनाला त्यांवर श्रद्धा ठेवता येते, असे कांटचे म्हणणे आहे. कांटची अंतिम तत्त्वांबाबतची अज्ञेयवादी भूमिका हक्सलीच्या मतांना पुष्टी देणारी होती.

ऑग्यूस्त काँतच्या मते धर्म, अध्यात्म आणि भौतिक शास्त्रे या मानवी ज्ञानप्रगतीच्या तीन पायऱ्या आहेत. म्हणजेच, धार्मिक समजुती आणि तत्त्वमीमांसात्मक कल्पना ही मानवी संस्कृतीच्या प्राथमिक व दुय्यम अवस्थांतील विचाररूपे असून भ्रममूलक आणि म्हणून त्याज्य आहेत. भौतिक शास्त्रांद्वारे मिळणारी इंद्रियगोचर गोष्टींविषयीची माहिती हेच सर्वश्रेष्ठ सत्यस्पर्शी यथार्थ ज्ञान होय [ →काँत, ऑग्यूस्त].

हॅमिल्टनने कांटच्या शिकवणीचा आश्रय घेतला. मानवाला फक्त सान्त, सापेक्ष आणि साधार वस्तूंचेचे ज्ञान होऊ शकते अनंत, निरपेक्ष, अमृत, निरुपाधिक, अंतिम तत्त्वांचे ज्ञान कधीच होऊ शकत नाही. सान्त वस्तूच्या सीमित गुणधर्मांच्या मर्यादा झुगारून दिल्या, की अनंत, निरुपाधिक तत्त्वांचे स्वरूप ज्ञात होते, अशी जी आपली समजूत असते, ती चुकीची होय. कारण ती आपणास तार्किक अडचणीत पाडते. म्हणून निरुपाधिक तत्त्व हे सर्वथा अज्ञेयच असते, असे ⇨सर विल्यम हॅमिल्टनचे मत होते.


हॅमिल्टनच्या विचारसारणीचा अंगीकार करून मॅन्सलने प्रतिपादिले, की अनंताविषयी आपण भौतिक शास्त्रीय अथवा तर्कशास्त्रीय दृष्टीने विचार करू लागलो, की अपरिहार्यपणे आत्मविसंगतीच्या जाळ्यात सापडतो आणि संभ्रमित होतो. यास्तव सारी साशंकवृत्ती झाडून टाकून, अपौरुषेय धर्मशास्त्राच्या आधारे अनंताच्या सत्य अस्तित्वावर आपण नितांत श्रद्धा ठेवावी हेच उत्तम.

हॅमिल्टन आणि मॅन्सल यांच्या शिकवणीवर ⇨हर्बर्ट स्पेन्सरने आपला अज्ञेयवाद रचला. अनुभवातील सापेक्ष वस्तू आपणास ज्ञात होतात पण अनुभवातीत निरपेक्ष तत्त्व सर्वथा ‘अज्ञेय’ राहते. अज्ञेयाच्या प्रांतात धर्म आणि विज्ञान यांची हातमिळवणी होते. धर्माच्या ईश्वरविषयक कल्पना प्रथम कोत्या, सगुणमूर्तिकेंद्रित असतात त्या पुढे व्यापक आणि अमूर्त होतात व शेवटी निर्गुण, निराकार, अज्ञेय परमात्म्याच्या कल्पनेत परिणत होतात. त्यांचप्रमाणे विज्ञानाची सुरुवात मूर्त वस्तुस्थितीच्या वर्णनापासून होते आणि पुढे पुढे ते व्यापक आणि अमूर्त सिद्धांताप्रत येऊन पोचते. धर्माला ईश्वराचे सत्यस्वरूप आणि विज्ञानाला निसर्गाचे मूळ स्वरूप, अज्ञात व अज्ञेय राहते. शिवाय, वस्तूंचे वस्तूंशी संबंध आणि वस्तूंचे ज्ञात्याशी संबंध अशा दुहेरी संबंधांनी प्रत्येक वस्तू वेष्टिलेली असते. तिचे संबंधमुक्त अवस्थेत आपणास दर्शन होऊच शकत नाही. ज्ञाता आणि ज्ञातवस्तू यांचे द्वैत ज्ञानाच्या क्षेत्रात टाळताच येत नाही. म्हणून विश्वाचे अंतिम, निरपेक्ष मूळ तत्त्व आणि वस्तूंचे द्वैतरहित, संबंधांपलीकडील आद्य स्वरूप जात्याच मानवी बुद्धीला अज्ञेय असते, असे स्पेन्सरचे म्हणणे होते.

भारतीय तत्त्वज्ञानातील ⇨बौद्ध दर्शन अज्ञेयवादी म्हणता येईल. आत्मा आणि परमात्मा यांविषयी मौन पाळून ‘या गोष्टी अज्ञेय आहेत, त्यांविषयी तर्कट करण्यात हशील नाही, शिवाय त्यांविषयीचे ज्ञान जीवनाचे मर्म जाणून घेण्याचे कामी अनावश्यक आहे’, असे मत गौतम बुद्धाने अनेकदा मांडले आहे.

आधुनिक काळात इंग्रजी अमदानीत, भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीय विचारवंतांना जेव्हा प्रथमच, इंग्रजी भाषेच्या द्वारे, पाश्चात्त्य विद्येचा परिचय झाला तेव्हा त्यांच्या हाती प्रामुख्याने हक्सली–स्पेन्सरचे अज्ञेयवादी ग्रंथ पडले. संशयवादाच्या खोल गर्तेत न पडता, आपल्या देशातल्या अंधश्रद्धेच्या कुबट वातावरणातून सुटण्याचा वैचारिक मार्ग त्यांना या अज्ञेयवादाने दाखविला.अंधश्रद्धेला ढकलून देऊन, श्रद्धेला न दुखविणारा, तसेच ईश्वरवाद आणि निरीश्वरवाद या दोन्ही टोकांना टाळून सुवर्णमध्ये साधणारा अज्ञेयवाद त्यावेळच्या पाश्चात्त्यविद्याविभूषित भारतीयांना, विशेषत: महाराष्ट्रीयांना, अत्यंत आकर्षक वाटला. या वादाने आपल्याकडील बंडखोर विचारवंतांना एक नवी वैचारिक दिशा दाखविली आणि समाजसुधारणेचा मंत्र दिला. तत्कालीन भारतीयांवर या अज्ञेयवादाचा किती प्रभाव पडला होता, ते लोकमान्य टिळकांनी आपल्या गीतारहस्यात स्पेन्सरच्या मतांचा जो सविस्तर परामर्श घेतला आहे, त्यावरून स्पष्ट दिसून येते.

संदर्भ : 1. Flint, R. Agnosticism, London, 1903.

           2. Huxley, T. H. Science and Christian Tradition, London, 1900.

           3. Stephens, Sir Leslie, An Agnostic’s Apology, New York, 1903.

           4. Ward, J. Naturalism and Agnosticism, London, 1903.

केळशीकर, शं. हि.