अहल्या : ब्रह्मदेवाची मानसकन्या व गौतम ऋषीची पत्नी. तिला ब्रह्मदेवाने प्रथम गौतमाकडे ठेव म्हणून ठेवले पण पुढे गौतमाच्या जितेंद्रियत्वामुळे संतुष्ट होऊन ती त्याला भार्या म्हणून दिली. इंद्राने गौतमाचे रूप घेऊन अहल्येस फसवणुकीने भ्रष्ट केले. गौतमाने इंद्राला शाप दिला. अहल्येलाही ‘तू शिला होशील’ असा शाप दिला. नंतर ‘रामचंद्रांच्या पादस्पर्शाने तुझा उद्धार होईल’ असा उ:शाप दिला. त्याप्रमाणे तिचा नंतर उद्धार झाला. षड्विंश ब्राह्मण ग्रंथात इंद्र-अहल्यासंबंधाचा उल्लेख आहे, मुद्गलकन्या, वध्य्रश्चकन्या, दिवोदासभगिनी, शतानंदमाता असेही तिचे वर्णन आहे, ‘अहिल्या’ असाही तिच्या नावाचा अपभ्रंश रूढ आहे.
केळकर, गोविंदशास्त्री