अहमदीया पंथ : भारतात स्थापन झालेला एक इस्लामी धर्मपंथ. गुरदासपूर (पंजाब) विभागातील कादियान गावी १८९१ मध्ये मिर्झा गुलाम अहमद कादियानी (सु. १८३९–१९०८) याने त्याची स्थापना केली. ‘कादियानी’ असेही या पंथाचे नाव आहे. मिर्झा गुलाम अहमद याने असे घोषित केले, की ख्रिस्ती व ज्यू धर्मांतील आगामी प्रेषित (मसाय्), तसेच इस्लाममधील महदी आपणच आहोत इतकेच नव्हे, तर आपण मोझेझ, येशू ख्रिस्त व मुहंमद पैगंबर या तिघांचेही प्रेषित आहोत. १९०४ मध्ये त्याने आपण कृष्णाचा अवतार असल्याचेही घोषित केले. आपण अद्‌भुत चमत्कार दाखवू शकतो व आपण वर्तविलेली भविष्ये खरी ठरतात, असा त्याचा दावा होता. बराहीन-इ-अहमदीया (१८८०) हा त्याचा ग्रंथ असून पंथात तो विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पंथाची मते सर्वसाधारणपणे इस्लाम धर्मासारखीच असली, तरी काही बाबतींत त्यांत महत्त्वाचा फरकही आहे. इस्लाममधील ‘जिहाद’ (धर्मयुद्ध) कल्पनेचा मिर्झा गुलाम अहमद याने नवा अर्थ लावून ते मत उचलून धरले. त्याच्या मते ‘जिहाद’ म्हणजे मुसलमानेतरांना केवळ युक्तिवादानेत इस्लाम धर्म पटवून देणे होय युद्ध करून अथवा शस्त्राच्या बळाने नव्हे. महदीचे प्रमुख कार्य म्हणजे शांतता प्रस्थापित करणे आणि शांततेच्या मार्गानेच ‘जिहाद’ करणे हे होय, असे त्याने व त्याच्या अनुयायांनी प्रतिपादिले. त्याने आधुनिक काळाला अनुरूप असे जे ‘जिहाद’ कल्पनेचे विवरण केले, ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. त्याने अहमदीया अनुयायी हा पारंपरिक इस्लाममधील कुठल्याही संप्रदायाचा अनुयायी नसतो, असेही प्रतिपादन केले. कुठल्याही परिस्थितीत लोकांनी आपल्या सरकारशी प्रामाणिक राहून त्यांच्या आज्ञांचे पालन करावयास हवे. इस्लाम व ख्रिस्ती या धर्मांच्या तसेच आर्य-समाजाच्या अनुयायांनी त्याला कडाडून विरोध केला.

मिर्झा गुलाम अहमदाच्या मृत्यूनंतर अहमदीया पंथाची ‘कादियान शाखा’ व ‘लाहोर शाखा’ अशा शाखांत विभागणी झाली. पंथातील बहुसंख्य लोक पहिल्या शाखेत सामील झाले आणि पंथसंस्थापकास पैगंबरांचा प्रेषित मानून त्याच्या वंशजास कर देऊ लागले. या शाखेचे केंद्र पाकिस्तानातील राबवाह येथे आहे. मिर्झा बशीर अल्‌-दीन हे ह्या शाखेचे सध्या प्रमुख आहेत. लाहोर शाखेचे अनुयायी थोडे आहेत. मिर्झा गुलाम अहमद हा पंथसंस्थापक, तसेच पैगंबराचा प्रेषित असल्याचे मत त्यांना मान्य नसून ते त्याला फक्त ‘मुजद्दिद’ म्हणजे धर्मसुधारक मानतात. इतर धर्मीयांचे स्वत:च्या पंथात धर्मांतर करण्याऐवजी इस्लाममध्ये धर्मांतर करण्यावर या शाखेचा विशेष भर आहे. मौलवी मुहंमद अली हे ह्या शाखेचे सध्या प्रमुख आहेत. सध्या पंथाच्या दोन्हीही शाखा विद्यमान असून त्यांनी पंथप्रचारार्थ ऊर्दू, इंग्रजी इ. विविध भाषांत नियताकालिके, पुस्तके इ. स्वरूपाचे विपुल साहित्य प्रसिद्ध केले आहे. कादियान शाखेच्या मिर्झा बशीर अल्-दीन यांनी १९२४ मध्ये उर्दू भाषेत आपल्या पंथाबाबत एक बृहद्‌ग्रंथ लिहिला असून, तो अहमदीया ऑर द ट्‍रू इस्लाम  ह्या नावाने इंग्रजीत भाषांतरितही झाला आहे. ह्या शाखेने कुराणाची आपल्या पंथीय विवरणांसह विविध भाषांत भाषांतरेही केली आहेत. लाहोर शाखेने १९२० मध्ये कुरणाचे सटीप इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले आहे. तसेच त्यांनी १९३६ मध्ये लाहोर येथून द रिलीजन ऑफ इस्लाम  हा इंग्रजी बृहद्‌ग्रंथही प्रसिद्ध केला आहे. कुराणाची व ह्या ग्रंथाची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ह्या दोन्हीही ग्रंथांत कुराणातील अनेक वचनांचे परंपरेस सोडून, अहमदीयांच्या नव्या दृष्टिकोनातून विवरण केले आहे. मिशनरी वृत्तीने ह्या दोन्हीही शाखा जगभर आपल्या पंथाचा प्रचार करीत आहेत. भारत व पाकिस्तानाव्यतिरिक्त अफगाणिस्तान, इराण, ईजिप्त इ. इस्लामी देशांत तसेच इंग्लंडमध्येही या पंथाचे लोक आढळतात. त्यांच्या प्रभावी प्रचारामुळे त्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे.

परंपरावादी कडव्या मुसलमानांनी अहमदीया पंथास विरोध करून अहमदीया पंथाचे लोक मुसलमान नाहीतच ते कुराणविरोधक आहेत म्हणून पाखंडी आहेत ते मुसलमानेतर अल्पसंख्याक ‘काफिर’ आहेत, असे प्रतिपादन करून त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलने केली. अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये अहमदीयांविरुद्धच्या आंदोलनांना हिंसक स्वरूप प्राप्त झाले. पकिस्तानात १९५३ मध्ये परंपरावादी मुसलमान आणि अहमदीया यांच्यात मोठ्या दंगली झाल्या. अहमदीया लोक मुसलमानाच नाहीत आणि त्यांना सरकारी नोकऱ्यांत घेऊ नये, यासाठी तेथे राज्यव्यापी उग्र आंदोलने झाली. त्यासाठी एम. मुनीर व एम. आर. कयानी ह्या न्यायमूर्तींचे चौकशीमंडल नेमले गेले. ह्या मंडळाचा अहवाल ‘मुनीर अहवाल’ म्हणून प्रसिद्ध आहे.

संदर्भ : 1. Gibb, H. A. R. Modern Trends in Islam, Chicago, 1947.

            2. Walker, H. A. The Ahmadiyah Movement, Calcutta, 1918.

सुर्वे, भा. ग.