अस्थिभंग : अभिघात (आकस्मिक इजा) किंवा ताण पडल्यामुळे हाड पूर्ण अथवा अंशत: मोडल्यास त्या अवस्थेला ‘अस्थिभंग’ असे म्हणतात. अभिघाताची वा ताणाची शक्ती व स्वरूप आणि अस्थींची ताण सोसण्याची क्षमता यांवर अस्थिभंग अवलंबून असल्यामुळे काही अस्थींमध्ये भंग होण्याची विशेष प्रवृत्ती आढळते.

लहान मुलांच्या अस्थी पुरेशा कठीण आणि भक्कम झालेल्या नसल्यामुळे मूल चालता चालता पडले तरी अस्थिभंग होण्याचा संभव असतो. वृद्धावस्थेत अस्थी ठिसूळ झालेल्या असल्यामुळे अल्प शक्तीच्या अभिघातामुळेही अस्थिभंग होऊ शकतो. सतरंजीच्या दशांमध्ये पाऊल अडकून पडण्याचे निमित्त होऊनही वृद्धावस्थेत मांडीच्या हाडाची ग्रीवा (मानेसारखा भाग) मोडल्याची उदाहरणे आढळतात. तरुण आणि प्रौढ स्त्रीपुरुषांची हाडे उच्चतम क्षमतेच्या अवस्थेत असल्यामुळे शारीरिक ताण पडणारी कार्ये करावी लागत असूनही अस्थिभंग होत नाही. अभिघात वा ताण तीव्र अथवा वेडावाकडा असेल तरच अस्थिभंग होऊ शकतो.

अस्थिनिर्मितीतील जन्मजात दोष, अस्थींचे काठिण्य कमी करणारे ⇨मुडदूस,  ⇨ अस्थिमार्दव  वगैरे रोग, अस्थींची अर्बुदे (सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी गाठी ) आणि कर्करोगाचे अस्थीतील प्रक्षेप (रोगाच्या मूलस्थानातून इतरत्र उत्पन्न झालेले कर्क) वगैरे कारणांमुळे अस्थिभंगाचा संभव अधिक दिसतो. काही मानसिक आणि तंत्रिकारोगांतही (मज्जातंतूंच्या रोगांत) अपघातांचा संभव अधिक असल्याने अस्थिभंगांचे प्रमाण वाढते.

कारणे : (१) प्रत्यक्ष अभिघात, (२) अप्रत्यक्ष अभिघात. उदा., उंचावरून पडताना आघात जरी तळपायावर झालेला असला तरी मांडीचे अथवा पायाचे हाड मोडते, (३) स्नायूंचे आकस्मिक आणि जोराने आकुंचन. गुडघ्याच्या वाटीचा अस्थिभंग या प्रकाराचा असतो.

प्रकार : अस्थिभंग पूर्ण अथवा अपूर्ण असू शकतो. पूर्ण प्रकारात अनुप्रस्थ (आडवा), तिरका, अनुदैर्घ्य (उभा) अथवा मळसूत्राकार असा अस्थिभंग होऊ शकतो. अपूर्ण प्रकारात अस्थीची एकच बाजू मोडलेली असून दुसरी शाबूत असते. उदा., डोक्याच्या कवटीच्या बाहेरचा थर मोडला तरी आतला थर अभंग असू शकतो. लहान मुलांची हाडे मऊ असल्यामुळे केव्हाकेव्हा अस्थिभंग हिरवी डहाळी मोडल्यासारखा असतो. अपूर्ण अस्थिभंगाची ही उदाहरणे होत.

चिकित्सेच्या दृष्टीने अस्थिभंगाचे पुढील प्रकार होतात : (१) सामान्य : या प्रकारात त्वचेवर जखम नसते. (२) सव्रण (जखमेसह) : त्वचेवर जखम असल्यामुळे अस्थिभंगस्थानी जंतुसंसर्ग होण्याचा संभव असतो. (३) अंतर्घट्टित : हाडाची मोडलेली टोके एकमेकांत घट्ट रुतून बसल्यासारखी असतात.              (४) विखंडित : दोहोंपेक्षा जास्त तुकडे होणे. (५) उपद्रवयुक्त : तंत्रिका, रोहिणी, संधी वगैरे इतर अवयवांना इजा झालेली असणे. (६) अग्रप्रवर्ध विलग होणे : लांब अस्थींची वाढ होत असताना त्यांच्या टोकावर असलेले अग्रप्रवर्ध (ज्यामुळे अस्थीची वाढ होते असा भाग) निसटणे. हा प्रकार वयाच्या १८ ते २० वर्षांपर्यंतच दिसतो.

आ. १. अस्थिभंगांचे प्रकार. (१) सामान्य, (२) विखंडित (३) अंतर्घट्टित, (४) लहान मुलातील हरित्-यष्टिभंग.

सर्वसामान्य लक्षणे : (१) विरूपता : अस्थिभंगस्थळी सूज येऊन तेथे रक्त साखळते. हाडाचे मोडलेले तुकडे एकमेकांपासून दूर गेल्यामुळे ग्रस्त भागाचा आकार बदललेला दिसतो. (२) अप्राकृत चलनक्षमता : अस्थिभंगस्थानी अनैसर्गिक चलनवलन होऊ शकते. (३) क्रियानाश : मोडलेल्या हाडाच्या दोन्ही बाजूंचे सांधे हालू न शकल्यामुळे ग्रस्त भागाची क्रिया बंद पडते. (४) करकर : ग्रस्त भाग हलविण्याचा प्रयत्न केला तर हाडाचे मोडलेले तुकडे एकमेकांवर घासल्यामुळे तेथे ‘करकर’ असा आवाज येतो. (५) वेदना : हाड मोडलेल्या जागी तीव्र वेदना होतात तेथे चाचपून वा दाबून पाहिले असता या वेदना अतितीव्र होतात. ग्रस्त भागाची बारीक हालचालीही फार वेदनायुक्त होते.

विशिष्ट लक्षणे : भंग झालेल्या अस्थीच्या स्थानपरत्वे विशिष्ट लक्षणे दिसतात. उदा., कवटीचे हाड मोडून त्याच्या तुकड्याचा दाब मेंदूवर पडल्यामुळे झटके, बेशुद्धी वगैरे लक्षणे दिसतात. पृष्ठवंशाच्या कशेरुकांचा (पाठीच्या कण्याच्या मणक्यांचा) भंग झाल्यास त्याचा दाब मेरुपृष्ठावर (मज्जारज्जूच्या पृष्ठावर) पडून पक्षाघात हे लक्षण दिसते, तसेच बरगडी मोडून तिचे टोक फुप्फुसात घुसल्यास फुप्फुसातील हवा त्वचेखाली येऊन तेथे फुगवटी व करकर आवाज येतो.

उपद्रव : (१) अवसाद (शॉक) आणि रक्तस्राव, (२) जंतुसंसर्ग, (३) लांब अस्थींच्या मध्यकात असलेली वसा तेथून निसटून रक्तमार्गे फुप्फुसात वा मेंदूत जाऊन तेथे अंतर्कीलन (रक्ताची गुठळी किंवा बाह्य पदार्थ रोहिणीत किंवा नीलेत अकस्मात अडकून रक्तप्रवाह बंद पडणे) होणे, (४) अस्थिभंगज्वर (हाड मोडल्याने येणारा ताप).

आ. २. अस्थी जुळून येण्याचे प्रकार. (अ) मोडलेली टोके जवळ व समोरासमोर असताना, (आ) मोडलेली टोके वाकली असताना, (इ) मोडलेली टोके एकमेकांपासून पूर्ण विलग असताना, (क) बाह्य अथवा आवरक तंतुग्रंथी, (ख) मध्य अथवा आतील तंतुग्रंथी, (ग) निश्चित अथवा कायम तंतुग्रंथी.

प्रतिष्ठापन : अस्थिभंगस्थानी हाडाभोवती असलेले आवरण (पर्यास्थिकला) अखंड राहिल्यास मोडलेली टोके एकमेकांपासून फार दूर जात नाहीत, पण पर्यास्थिकलाही फाटलेली असेल तर मोडलेली टोके स्थायूंच्या आकुंचनामुळे दूर जातात व त्या दोन तुकड्यांमधील जागेत रक्तस्राव होऊन तेथे रक्त साठून गोठते. रक्तातील आणि इतर ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतील) भक्षीकोशिका (सूक्ष्मजीव, ऊतके व रक्तातील कोशिका, बाह्य पदार्थ इ. खाण्याची व पचविण्याची शक्ती असणाऱ्या कोशिका हे साठलेले रक्त शोषून घेतात त्याच वेळी तेथील संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकातील [ → ऊतके, प्राण्यांतील] कोशिकांपासून नवीन तंत्वात्मक कोशिकांची उत्पत्ती होऊन त्या तंतूंमुळे मोडलेल्या हाडाच्या दोन्ही टोकांमध्ये मऊ व जाड अशी एक गाठ बनते, तिला ‘तंतुग्रंथी’असे म्हणतात. पुढे या गाठीतील तंतूंवर कॅल्शियमाचे थर बसून ती टणक व घट्ट बनते. अशा रीतीने तंतुग्रंथीच्या मृदू आणि कठीण अशा दोन अवस्था दिसतात. मोडलेल्या हाडाची अणकुचीदार टोके शोषिली जाऊन तेथे नवीन उत्पन्न झालेल्या अस्थीमुळे अस्थिभंगाचे प्रतिष्ठापन होते.

आ. ३. पशूंतील अस्तिभंगचिकित्सेचे प्रकार. (अ) धातूचे आधारक, (आ) धातूच्या पट्टीचा वापर, (मज्जांतर्गत कीलन.)

या सर्व प्रतिष्ठापनक्रियेला स्थानपरत्वे तीन ते सहा आठवड्यांइतका वेळ लागतो. व्यक्तीची प्रकृती आणि परिस्थिती यांवरही हा अवधी अवलंबून असतो.

निदान : पूर्ववृत्त आणि लक्षणे यांवरून निदान करणे सोपे असते. क्ष-किरण परीक्षेने निदान तर निश्चित होतेच, शिवाय मोडलेल्या अस्थीच्या तुकड्यांमध्ये अंतर पडले आहे की नाही, ते एकमेकांत अंतर्घट्टित आहेत की नाहीत, वगैरे गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे चिकित्सेला मदत होते.

चिकित्सा : (१) प्राथमिक : रक्तस्राव थांबविणे, अवसादासाठी योग्य तो उपाय करणे आणि मोडलेले हाड हालू नये म्हणून फळी, काठी व छत्री ग्रस्त भागाला घट्ट बांधणे, या गोष्टींकडे प्रथम लक्ष देणे आवश्यक असते. रक्तस्राव फार झाल्यास रक्त, द्राक्षशर्करा (ग्लुकोज) विद्राव आणि लवण (सलाइन) विद्रावाचा त्वरित उपयोग करावा लागतो.

(२) कायम : हाडाचे मोडलेले तुकडे व्यवस्थित बसविण्यासाठी क्ष-किरण परीक्षेचा फार उपयोग होतो. स्नायूंच्या आकुंचनामुळे हाडांचे तुकडे एकमेकांवर चढले असताना खालच्या तुकड्याला सतत ओढून धरण्यासाठी वजने बांधावी लागतात. कित्येक वेळा मोडलेले तुकडे व्यवस्थित बसविण्यासाठी शुद्धिहारकाचा (शुद्धी घालविणाऱ्या पदार्थाचा) उपयोग करावा लागतो.

(३) अशा तऱ्हेने मोडलेले हाड व्यवस्थित बसविल्यानंतर ते पुन्हा हालू नये म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये बुचकळून तयार केलेले बंध वापरावे लागतात. हे प्लॅस्टर वाळल्यानंतर घट्ट व टणक बनल्यामुळे अस्थिखंडे हालू शकत नाहीत. निरनिराळ्या प्रकारांच्या लाकडी, लोखंडी व इतर प्रकारांच्या ‘आधारकां’ चाही उपयोग करावा लागतो. काही वेळा धातूच्या बनविलेल्या सळया, खिळे, पट्ट्या, स्क्रू वगैरेंचा उपयोग करून मोडलेले तुकडे घट्ट सांधण्यात येतात.

(४) शक्य तितक्या लवकर रोग्याचे पुनर्वसन व्हावे म्हणून आणि ग्रस्त भागांतील स्नायूंची अपपुष्टी (आकुंचित होऊन निरुपयोगी होणे) होऊ नये म्हणून, प्रथम दुसऱ्याच्या मदतीने व नंतर स्वत:च

हालचाल करणे, मालीश, व्यायाम वगैरे गोष्टींचा जरूरीप्रमाणे उपयोग करावा लागतो.

अभ्यंकर, श. ज.

पशूंतील अस्थिभंग : माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांमध्येही अस्थिभंग होऊ शकतो. अस्थिमार्दवादी रोग, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अभिघात, स्नायूंचे आकुंचन वगैरे कारणे माणसांप्रमाणेच जनावरांतही दिसून येतात. निरनिराळ्या पाळीव जनावरांमध्ये दिसणाऱ्या सर्वसाधारण कारणांपैकी खालील कारणे उल्लेखनीय आहेत.

घोडा : लाथ लागून किंवा लाथ मारताना, उडी मारताना अंदाज चुकून ठेचाळल्यामुळे, फरशीवरून पाय घसरल्यामुळे, वाहनाला जुंपलेला असताना घोड्याला इतर जड वाहनाचा धक्का बसल्याने किंवा अपघाताने कठीण वस्तूंवर आदळल्याने अस्थिभंग होतो.

गाय–म्हैस : टक्कर करताना होणाऱ्या अभिघातामुळे, पाय झाडण्यामुळे, पाय घसरून पडल्यामुळे अथवा वळू–रेड्याच्या भारामुळे अस्थिभंग होऊ शकतो.

शेळी–मेंढी : चरताना डोंगरमाथ्यावरून पडल्यामुळे शेळी–मेंढीच्या पायाचा अस्थिभंग होतो. तसेच दगडचा अथवा काठीचा मार बसल्यानेही हाड मोडू शकते.

कुत्रा–मांजर : वाहनाखाली चेंगरल्यामुळे, पिलांवर माणसाचा अथवा जनावरांचा पाय पडल्यामुळे अस्थिभंग होऊ शकतो.

लक्षणे व निदान : जनावरांच्या अस्थिभंगाची सर्वसाधारण लक्षणे माणसाप्रमाणेच असतात. श्रोणिफलकाचा (ढुंगणाच्या हाडाचा) अस्थिभंग झाल्यास मोडलेल्या हाडावर भार देऊन जनावर उभे राहू शकत नाही. चेहऱ्याच्या हाडांपैकी कोणत्याही हाडाचा भंग झाला तर अन्न चावणे वा रवंथ करणे शक्य होत नाही. लाळ सारखी गळत राहते. केव्हाकेव्हा दातही तुटतात. मणक्याचा अस्थिभंग घोडा व कुत्रा या प्राण्यांत अधिक प्रमाणात दिसतो. अंसफलास्थिभंग (फऱ्याचे हाड मोडणे) बहुधा त्या हाडाच्या ग्रीवेपाशी होतो. परंतु त्या ठिकाणी जाड स्नायू असल्यामुळे निदान कठीण असले, तरी त्या स्नायूंमुळे मोडलेल्या हाडाचे तुकडे एकमेकांपासून फार दूर जात नाहीत म्हणून तो अस्थिभंग लवकर बरा होतो.

मोडलेले हाड सांधून ते जुळून येणे हे जनावरांमध्ये सोपे नसते कारण जनावर सारखे धडपड करीत असल्यामुळे मोडलेले तुकडे जागच्याजागी राहणे फार कठीण असते. अस्थिभंगाबरोबरच जखम झाली असेल, तर त्या जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. मलमूत्रोत्सर्गामुळे जनावराखालची जागा स्वच्छ ठेवणे दुरापास्त असल्यामुळे जखम निर्जंतुक राहणे फार कठीण असते.

चिकित्सा : अलीकडे लांब हाडांच्या पोकळीत जंतुहीन सळई घालून अस्थी हालू नयेत असा प्रयत्न करतात. तसेच विविध उपकरणांचा उपयोग करून हाडे स्थिर ठेवण्यात येतात. कुत्र्या–मांजरांत किंवा लहान जनावरांतच त्यांचा उपयोग होतो. आ. ३ (इ) मध्ये मज्जांतर्गत कीलन म्हणजे हाडांमधील मज्जेमध्ये (लांब हाडांच्या पोकळ भागात आढळणाऱ्या मऊ पदार्थात) खिळ्यासारख्या धातूचा तुकडा घालून हाडे जोडण्याची पद्धती दर्शविली आहे.

गद्रे, य. त्र्यं.