असिदंष्ट्र : (डोराडो). दक्षिण खगोलार्धातील पाश्चात्त्य नक्षत्रपद्धतीतील एक नक्षत्र. क्रांती -६००, विषुवांश ५० च्या आसपास [ → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. या तारकासमूहाचा आकार तरवारीसारखे तोंड असणाऱ्या माशाप्रमाणे असल्यामुळे याला पाश्चात्त्य नक्षत्र-पद्धतीत ‘स्वोर्ड फिश’ व भारतीय पद्धतीत ‘असिदंष्ठ्र’ असे नाव दिलेले आहे. हा समूह जालक (रेटिक्युलम) व चित्रफलक (पिक्टर) यांच्यामध्ये आहे. यातील आल्फा डोराडो हा श्वेतवर्णीय तारा ३·५ प्रतीचा [ → प्रत] असून त्याचा वर्णपट विशेष प्रकारचा आहे. या समूहाच्या दक्षिण सीमेवर मोठी मॅगेलनी अभ्रिका आहे. क्रांतिवृत्ताचा दक्षिण कदंब या समूहात येतो [ → क्रांतिवृत्त].
फडके, ना. ह.