अर्जेंटिना : (रिपब्‍लिकना आर्जेंतिना) : दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील पाचरीच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षांश २२ ते ५५ द. व रेखांश सु. ५४२०’ ते ७३ प. लोकसंख्या अंदाजे २,३५,३९,००० (१९७०). याच्या उत्तरेस बोलिव्हिया, ईशान्येस पॅराग्वाय, पूर्वेस ब्राझील, यूरग्वाय आणि अटलांटिक महासागर, दक्षिणेस अटलांटिक महासागर आणि पश्चिमेस चिली आहे. याची दक्षिणोत्तर लांबी सु. ३,६९४ किमी., जास्तीत जास्त रुंदी १,४९७ किमी. किनारा सु. २,६६५ किमी. असून क्षेत्रफळ २७,७७,८१५ चौ. किमी. म्हणजे साधारणतः मध्य प्रदेश वगळून भारताएवढे आहे.

 

भूवर्णन : अर्जेंटिना हे नाव ‘आजेंटम्’ (चांदी) या लॅटिन शब्दावरून पडले आहे. येथील मुख्य नदीचे नाव ‘प्लाता’ (स्पॅनिश–चांदी) असेच आहे. स्पॅनिश लोकांना येथे जे मूळ रहिवासी प्रथम भेटले त्यांच्या कानांत चांदीचे दागिने होते त्यामुळे या देशात खूप चांदी असावी या भावनेने त्यांनी या देशास हे नाव दिले असा समज आहे. परंतु बोलिव्हियातील चांदीचा व्यापार या नदीकाठावरील लोकांतर्फे होत असल्यानेही ही नावे रूढ झाली असण्याचा संभव आहे. योगायोग असा, की या देशात चांदी मुळीच सापडत नाही.

 

भूरचनेच्या दृष्टीने अर्जेंटिनाचे चार भाग पडतात : (१) अँडीज पर्वतातील डोंगराळ प्रदेश, (२) पॅटागोनिया, (३) पँपास आणि (४) उत्तरेकडील उष्णकटिबंधीय प्रदेश.

 

अँडीज पर्वताने अर्जेंटिनाचा सु. ३० टक्के भाग व्यापला आहे. त्यात अनेक हिमाच्छादित सुप्त ज्वालामुखी आहेत. यातील शिखरांपैकी एकविसांची उंची ६,२०० मी. पेक्षा अधिक असून त्यात ७,०३५ मी. उंचीचे ॲकन्काग्वा हे पश्चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखर आहे. मेर्सेदार्यो हे शिखर ६,७७० मी. उंच आहे.

 

अँडीजच्या पूर्व बाजूस उत्तरेकडे रीओ नेग्रो नदीपासून दक्षिणेस थेट मॅग‌ेलनच्या सामुद्रधुनीपर्यंत अर्जेंटिनाच्या दक्षिण भागास ‘पॅटागोनिया’ म्हणतात. या भागात प्रथम आलेले गोरे लोक येथील मूळ रहिवाशांस ‘पॅटॅगोनिस’ –मोठ्या पायांचे–असे म्हणत, त्यावरून हे नाव पडले. हा प्रदेश किनाऱ्‍यावरील अरुंद मैदानापासून पायरीपायरीने उंचावत व रुंदावत जातो. याची उंची सु. १०० ते १,५०० मीटरपर्यंत वाढत जाते. या पठारी प्रदेशातून वाहणाऱ्‍या नद्यांनी खोल घळ्या तयार केल्या आहेत. या भागात स्थायिक झालेल्या लोकांत ब्रिटिश बेटांमधून आलेले बरेच लोक होते. त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी आपला परंपरागत मेंढपाळीचा धंदा येथेही सुरू करून अर्जेंटिनाचे जीवन समृद्ध केले. आज मेंढ्यांचे मांस व लोकर यांबद्दल पॅटागोनिया जगप्रसिद्ध आहे. कोरडी हवा व मुरमाड रूक्ष जमीन असलेल्या या प्रदेशात दोन कोटींहून अधिक मेंढ्या आहेत. अर्जेंटिनातील तेलसाठेही येथेच आहेत.

 

‘पँपास’ या मूळ इंडियन शब्दाचा अर्थ ‘अवकाश’ किंवा ‘सपाटी’ असा आहे. हे विस्तीर्ण तृणक्षेत्र अर्जेंटिनाच्या समृद्धीचा गाभाच होय. याची काळी सुपीक माती २ ते ३·५ मी. खोल असून तिच्यात दगडगोटे सापडत नाहीत. तिच्यात खते क्वचितच घालावी लागतात. अर्जेंटिनातील ८० टक्के लोक पँपासमध्ये राहतात आणि येथील पशुधन चार कोटींवर आहे. प्लाता नदीपासून ब्वेनस एअरीझला लागून हे तृणक्षेत्र अँडीज पर्वतापर्यंत अर्धवर्तुळाकार पसरले आहे. याचा विस्तार ५·१८ लक्ष चौ. किमी. असून तो देशाच्या एकपंचमांशाइतका आहे. अर्जेंटिनाच्या पशुधनाचा व शेतमालाचा तीन-चतुर्थांश हिस्सा पँपासमधून येतो.

 

उत्तरेकडील उष्णकटिबंधीय प्रदेशात अँडीज पर्वत व पाराना नदी यांमधील सखल भाग मोडतो. तो वर्षावने व दलदली यांनी व्यापलेला असून मनुष्यवस्तीस प्रतिकूल आहे.

 

अर्जेंटिनात तेल सोडल्यास खनिजे कमी आहेत. शिसे, जस्त, कथील व मँगॅनीज जेमतेम गरजेपुरते निघते. पुरेसा कोळसा आहे व लोखंड बरेच असावे असा अंदाज आहे. पण यांचे उत्पादन अपुरे आहे.

 

पाराना (स्पॅनिश भाषेत जलपिता) ही अर्जेंटिनातील सर्वांत मोठी नदी असून ती ४,१८४ किमी. लांबीची आहे. ला प्लाताला मिळण्यापूर्वी १९३ किमी. पर्यंत तिला बरेच फाटे फुटतात व ते पुन्हा एकत्र होतात. यामुळे हिच्या काठावर व प्रवाहात जलोढांची सुपीक मैदाने, बेटे आणि दलदलीचे प्रदेश तयार झाले आहेत. या प्रशस्त प्रदेशात विविध फळझाडे व मालपेट्यांस आणि पिंपांस उपयुक्त लाकडाची झाडे भरपूर आहेत. हिला मिळणाऱ्‍या नद्यांत पॅराग्वाय ही सर्वांत मोठी असून काही अंतरापर्यंत अर्जेंटिना व पॅराग्वायमधील ती सीमारेषा आहे. ला प्लातास मिळणारी यूरग्वायही अशीच अर्जेंटिना आणि ब्राझील व यूरग्वायमधील सीमारेषा आहे. ही ज्या ठिकाणी ला प्लातास मिळते तेथे तिचे मुख तेरा किमी. रुंद आहे.

 

रीओ द ला प्लाता (रौप्यसरिता) किंवा प्लेट ही वस्तुतः नदी नसून पाराना व यूरग्वाय यांची संयुक्त नदीमुखखाडी आहे. हिने एकूण ३०,००० चौ. किमी. पेक्षा अधिक क्षेत्र व्यापले असून, मुखाजवळ हिची रुंदी २४० किमी. आहे. हिच्या दक्षिण तीरावर अर्जेंटिनाची राजधानी ब्वेनस एअरीझ व उत्तर तीरावर यूरग्वायची राजधानी माँटेव्हिडिओ आहे. अर्जेंटिनातील मोठमोठ्या नद्या पश्चिमेकडे अँडीज पर्वतात किंवा उत्तरेकडे अरण्यात उगम पावून अटलांटिक महासागरास मिळतात. त्या मुखापासून १६०० किमी. पेक्षा अधिक अंतरापर्यंत जलवाहतुकीस उपयोगी पडतात.

 

अर्जेंटिनाच्या पश्चिम व मध्य भागातही देल व्हाये, दुल्से (गोड), प्रिमेरो (पहिली), सेंगुदो (दुसरी), तर्सेरो (तिसरी), क्वार्तो (चवथी) व किंतो (पाचवी) वगैरे नद्या आहेत. यांतील बहुतेक निरनिराळ्या सरोवरांस जाऊन मिळतात.

 

ब्वेनस एअरीझ, पँपास, कॉर्दोव्हा या प्रांतांत व पॅटागोनियात लहानमोठी सरोवरे आहेत. काही खाऱ्‍या पाण्याची आहेत, तर काहींना वितळणाऱ्या बर्फाचे पाणी मिळते.


देशाच्या विस्तारामुळे हवामानाचे अनेक प्रकार दिसून येतात. जानेवारी हा सर्वात उष्ण महिना. जून, जुलै हे सर्वांत थंड महिने असतात. उत्तरेकडे चाको भागात उन्हाळ्यात अतिशय उष्णता (४८·९ से. पर्यंत) तर दक्षिणेस पॅटागोनियाच्या दक्षिण भागात हिवाळ्यात तीव्र थंडी (-१६·१ से. पर्यंत) आढळते. तथापि उत्तरेकडे हवामान विषम (सरासरी १३·३ ते ४३·३ से.) आणि दक्षिणेस समुद्रसान्निध्यामुळे बरेच सम (सरासरी ०·७ ते ९·६ सें.) असते. पँपास भागात हवामान सौम्य व समशीतोष्ण असते. दक्षिण ध्रुवाकडून येणारे थंड वारे पॅसिफिकवरून येताना आर्द्र होतात. अँडीजच्या पश्चिम भागावर त्यामुळे भरपूर पाऊस पडतो परंतु अँडीजच्या पूर्वेकडे अर्जेंटिनामध्ये हे ‘चिनुक’ अथवा ‘फॉन’ प्रमाणे कोरडे व काहीसे ऊबदार होऊन वाहू लागतात. यांना येथे ‘झोंडा’ म्हणतात. अँडीजमध्ये असलेल्या काही खिंडींतून व दऱ्याखोऱ्‍यांतून थोडे आर्द्र वारे अर्जेंटिनात पोहोचतात त्यामुळे तेथे काही ठिकाणी पाऊस पडतो. दक्षिण ध्रुवाकडून अर्जेंटिनात सरळ येणाऱ्या थंड वाऱ्यांना तेथे ‘पँपेरो’ म्हणतात. त्यांची उत्तरेकडून वाहणाऱ्‍या ‘नार्टे’ या ऊबदार वाऱ्‍यांशी गाठ पडून आवर्त उत्पन्न होतात त्यामुळे अर्जेंटिनाच्या ईशान्य भागात सुमारे ५०–१०० सेंमी. पाऊस पडतो. परंतु हे आवर्त फॉकलंडच्या थंड समुद्रप्रवाहावरून दक्षिणेकडील पॅटागोनियामध्ये शिरत असल्याने तेथे थंड, बोचणारे व कोरडे वारे वाहतात. बाईआ व्हूलांकापासून वायव्येकडे जाणाऱ्‍या रेषेच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण अधिक (७५ सेमी. पर्यंत) आहे, तर पश्चिमेस कमी (५ सेंमी. पर्यंत) आहे.

 

उत्तर अर्जेंटिनातील जंगलात व दलदलीत पुष्कळ प्राणी आढळतात. जग्वार, प्यूमा, विविध रानमांजरे, कोल्हे, कॅपिबारा, आर्माडिलो, भीमकाय मुंगीखाऊ वगैरे उल्लेखनीय आहेत. गवताळ प्रदेशात अनेक प्रकारचे कृंतक, रिया, ऑटर, वीझल, ऑपॉसम इ. प्राणी आणि विविध सरीसृप आढळतात. येथे पक्ष्यांच्या पुष्कळ जाती असून शहामृग व टिनॅमो हे त्यांपैकी प्रमुख होत. अर्जेंटिनाच्या नद्यांत विविध प्रकारचे मासे भरपूर सापडतात. स्पेनमधून आणलेली गुरे येथे चांगली वाढली व त्यांतील काही निसटून जाऊन रानटी बनली. अर्जेंटिनामध्ये जगातील वनस्पतींच्या १० टक्के जाती मिळतात. उत्तरेकडे लोहमार्गाला उपयुक्त असलेले टणक लाकडाचे वृक्ष आहेत. क्वेब्राचोपासून टॅनिन मिळते. ईशान्येकडे होणाऱ्‍या येर्बामातेपासून चहासारखे राष्ट्रीय पेय बनवितात. पॅटागोनियात सायप्रस, पाईन, लार्च, ओक, बीच इ. वृक्ष आढळतात. पँपासचे गवत हे अर्जेंटिनाचे जीवन असून तेथे आढळणारा ‘ऑम्बु’ हा छायावृक्ष राष्ट्रीय वृक्ष मानतात.

 

इतिहास : अर्जेंटिनाच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. तेथे पूर्वी इंडियन लोक राहत होते. अमेरिकन इंडियन लोक २०,००० वर्षांपूर्वी आशियातून आले असावेत, असे विद्वानांचे मत आहे. १५ व्या शतकात अर्जेंटिनात निरनिराळ्या जमातींचे व भिन्नभाषी सुमारे तीन लाख इंडियन लोक राहत होते. त्यांच्यावर इंका साम्राज्याचे वर्चस्व असावे असे दिसते कारण त्यांच्यापैकी बरेच लोक क्वेचुआ ही इंकाची भाषा बोलत होते. लोक शिकार, पशुपालन व काही प्रमाणात शेती ह्यांवर राहत असावेत.

 

व्हेसपूची ह्याने १५०१-०२ च्या सुमारास रीओ द ला प्लाताचा शोध लावला आणि स्पॅनिश खलाशांना त्याच्यामुळेच स्फूर्ती मिळाली, असे काही मानतात. वान दीआय दे सोलीस ह्या स्पॅनिश खलाशाने १५१६ मध्ये अर्जेंटिनात प्रथम प्रवेश केला. पण त्यास तेथील इंडियन लोकांनी ठार मारले. त्यानंतर १५२६ च्या सुमारास सिबॅश्चन कॅबट व द्येगो गारसीआ हे तेथे गेले. पण त्या दोघांत मतभेद झाल्यामुळे ते स्पेनला परतले. पुढे पेद्रो दे मेनदोसाच्या नेतृत्वाखाली स्पेनने तेथे वसाहत स्थापण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर मारतीनेस दोमींग्गो इरालाने ला प्लाता भागात घुसून १५३९ मध्ये आसूनस्यॉन हे गाव वसविले. हे येथील पहिले स्पॅनिश शहर होय. पुढे व्हान दे गाराई याने पॅराग्वाय नदीवर १५७३ मध्ये सांता फे हे बंदर आणि १५८० त ब्वेनस एअरीझ हे शहर वसविले. येथून स्पेनच्या वसाहतींची झपाट्याने वाढ झाली. सर्व वसाहतींवर आसूनस्यॉनचे वर्चस्व व पेरू येथील राज्यप्रतिनिधींचा ताबा असे. वसाहतींना स्पेनचे व्यापारी कायदे लागू असत. त्यामुळे वसाहतींची फारशी प्रगती झाली नाही. मात्र ब्रिटन व पोर्तुगाल यांचा चोरटा व्यापार वाढला. त्यास पायबंद घालण्यासाठी स्पेनने १७७६ मध्ये ला प्लाता हा स्वतंत्र प्रांत निर्माण करून त्यावर राज्यपालाची नेमणूक केली. त्यात त्या वेळी आजचे अर्जेंटिना, पॅराग्वाय, यूरग्वाय व बोलिव्हियाचा काही भाग हे प्रदेश अंतर्भूत होते. त्यांची राजधानी ब्वेनस एअरीझ केली. ब्रिटिशांनी १८०६-०७ मध्ये केलेले हल्ले ब्वेनस एअरीझच्या नागरिकांनी धैर्याने परतविले. त्यामुळे त्यांचे आत्मबळ व स्वातंत्र्यलालसा जागृत झाली. २५ मे १८१० ला एक नागरिक-समिती (जंटा) स्थापन झाली. तिने नेपोलियनने पदच्युत केलेला स्पेनचा राजा फर्डिनँड याच्या नावे राज्य करण्याचे ठरविले. हा दिवस आजही स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात येतो. थोर स्वातंत्र्यवीर होसे दे सान मार्तीन ह्याच्या नेतृत्वाखाली तूकूमानमध्ये नागरिक-मंडळाने क्रांती करून ला प्लाता प्रांताचे स्वातंत्र्य ९ जुलै १८१६ रोजी घोषित केले. त्यामुळे स्पेनची या प्रांतावरील सत्ता संपुष्टात आली. ला प्लाता भागाचे पॅराग्वाय, यूरग्वाय, अर्जेंटिना व बोलिव्हिया हे चार स्वतंत्र देश झाले. मात्र अर्जेंटिनात अंतर्गत यादवी सुरू झाली.

 

बेर्नारदीनो रीव्हादाव्ह्या हा १८२६ मध्ये अर्जेंटिनाचा राष्ट्रपती झाला. तोच पहिला तसेच पुरोगामी राष्ट्रपती होय. त्याने अनेक कायदे करून सुधारणा केल्या. पण त्यास अंतर्गत कलहामुळे राजीनामा द्यावा लागला. १८२९–५२ दरम्यान व्हान मॅन्वेल द रोसास हा राष्ट्रपती झाला. तो हुकूमशहा होता. त्याला हूस्तो होसे दे ऊरकीसा या त्याच्याच अनुयायाने पदच्युत करून हद्दपार केले, तेव्हा पूर्वी रोसासने हद्दपार केलेले आलबेर्दी, मीत्रे, सारम्येंतो यांसारखे देशभक्त मायदेशी परतले. त्यांच्या साहाय्याने ऊरकीसाने १८५३ साली संविधान तयार केले. तथापि त्याला मान्यता मिळण्यास दहा वर्षे लागली. हे अर्जेंटिना गणराज्याचे पहिले लोकशाही संविधान होय. पुढे जनरल मीत्रेच्या कारकिर्दीत (१८६२–६८) अर्जेंटिनाने खूप प्रगती केली. त्याच्या नंतरचा राष्ट्रपती सारम्येंतो पुरोगामी व देशभक्त होता. त्याने शिक्षणाचा पाया घातला. मात्र यानंतर १९१२ पर्यंत अर्जेंटिनाचा इतिहास भ्रष्टाचार, उधळपट्टी व अंतर्गत कलह यांनी भरला होता. तथापि याही काळात शेती, उद्योगधंदे यांत वाढ होऊन लोहमार्गांचे जाळे देशभर पसरले. १९१२ मध्ये रोके पेन्ना ह्या राष्ट्रपतीने गुप्त-मतदान-पद्धती कायदा करून तो अमलात आणला. यामुळे इपोलितो ईरिगोयेन हा जहाल उदारमतवादी १९१६ मध्ये राष्ट्रपती झाला. पहिल्या महायुद्धकालात तो तटस्थ होता. त्याने सामाजिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. मध्यंतरी १९२२–२८ दरम्यान त्याचा सहकारी राष्ट्रपती झाला. नंतर पुन्हा ईरिगोयेन निवडून आला. परंतु आपल्या अखेरच्या दिवसांत लहरी स्वभाव व वृद्धत्व यांमुळे त्यास तत्कालीन जागतिक मंदीस तोंड देणे अशक्य होऊन लष्करी क्रांती उद्भवली आणि लष्करी अंमलाखाली नियंत्रित लोकशाही व श्रीमंत शेतमालक ह्यांचे युग सुरू झाले.

 

१९३२ पासून अर्जेंटिनातील घडामोडींवर यूरोपमधील फॅसिझम व नाझीवाद यांचा परिणाम झाला. जर्मनीच्या हेरांचे जाळे देशभर पसरले. पेरॉनसारखे लष्करी अधिकारी त्यात गोवले गेले. हूस्तो, रॉबेर्तो, कास्तीयो, रॉसन व रामिरेस ह्यांच्यानंतर राष्ट्रपती झालेल्या फॉरेलने १९४५ साली जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. यामुळे त्यास ‘पॅन अमेरिका’ संघात आणि संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. पण युद्धाच्या काळात पेरॉनसारख्या लष्करी नेत्याचा उदय झाला. आपण मजुरांचे त्राते आहोत असा दावा करून १९४६ मध्ये तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला. त्याने झपाट्याने कामगार व शेतमजूर यांसाठी कायदे करून पंचवार्षिक योजनांद्वारे शेतीस व औद्योगिकीकरणास उत्तेजन दिले. काही धंद्यांचे राष्ट्रीयीकरण केले. पण या सुधारणा करताना त्याने मतस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य, इ. लोकशाही तत्त्वांची गळचेपी केली न्यायालये, वृत्तपत्रे, शिक्षण-संस्था इत्यादींवर नियंत्रणे घातली धर्मगुरुंचे पाठबळ मिळावे म्हणून शाळांतून धर्मशिक्षण सक्तीचे केले. त्यातच लोकमानसावर विलक्षण पकड असलेली त्याची पत्‍नी ईव्हा वारली. ह्यामुळे प्रथम लोकप्रिय झालेला पेरॉन लोकमानसातून उतरला. त्यातच मजूरसंघटनेबद्दल धर्मगुरू व पेरॉन ह्यांत १९५५ साली मतभेद झाले. त्याच वर्षी जूनमध्ये आरमारी बंड झाले. लष्कराने सर्व सत्ता हाती घेतली. अखेर पेरॉनने ९ सप्टेंबर १९५५ ला पदत्याग करून अर्जेंटिना सोडला. त्यानंतर जनरल लोनार्डी अधिकारावर आला पण त्यास दूर करून आरांबुरू हा सेनापती राष्ट्रपती झाला.


पेरॉन हद्दपार झाला, परंतु त्याचे विचार, त्याने स्त्रिया व श्रमिक वर्गाकरिता केलेले कायदे यांची पकड कायम राहिली आणि लष्कराने पुन्हा मुलकी शासन सुरू करण्याकरिता निवडणुका घेतल्या तेव्हा रॅडिकल पक्षाचा जहाल उमेदवार आर्तूरो फ्राँडीसी हा पेरॉन-अनुयायांच्या साहाय्याने निवडून आला (फेब्रु. १९५८). पेरॉन-पक्षास मतबंदी होती परंतु त्यांचे बळ संसदेतही उपेक्षणीय नव्हते. त्यामुळे नोब्हेंबर १९५८ मध्ये आणीबाणी जाहीर करून त्यांच्या चळवळीस आळा घालावा लागला. बऱ्‍याच प्रांतांमध्येही केंद्रसत्ता स्थापित करावी लागली, कारण तेथे पेरॉन-भक्तांची सत्ता होती परंतु फ्राँडीसी हा त्यांच्याच मतांनी राष्ट्राध्यक्ष झाला हे सैन्याधिकारी विसरू शकले नाहीत आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे अनेक मंत्रिबदल करूनही २९ मार्च १९६२ ला त्याच्या विरुद्ध बंड होऊन सिनेटचा अध्यक्ष गुइदो यास राष्ट्रपती केले गेले. त्याने झालेल्या निवडणुका रद्द ठरवल्या. तरीही त्यास दोन कट्टर नाफेरवादी बंडे दडपावी लागली (सप्टेंबर १९६२ व एप्रिल १९६३). १९ जुलै १९६३ ला डॉ. इलिया हा सर्वांत कमी नावडता म्हणून निवडून आला. सैन्याधिकाऱ्यांशी होणाऱ्‍या कटकटी व आर्थिक मंदी यांनी तो बेजार झाला. शेवटी २८ जून १९६६ ला एका लष्करी गटाने त्यास पदच्युत केले आणि जनरल ओंगानिया वान कार्लोसच्या नेतृत्वाखाली पुन्हा लष्करी हुकूमशाही स्थापन झाली. ओंगानियाने सर्वोच्च न्यायालय बंद केले. सर्व राज्यपाल पदच्युत करून विधिमंडळे बरखास्त केली. राजकीय पक्षांवर बंदी घालून त्यांची मालमत्ता जप्त केली. विद्यापीठे ताब्यात घेतली. मात्र कॅथलिक चर्चशी तडजोड करून फ्राँडीसी व इलिया यांनी हिरावलेल्या त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक सवलती त्यांस परत दिल्या. जून १९७० मध्ये ओंगानियाला पदच्युत करून रॉबेर्तो लिव्हिंग्स्टन याला जनरल लानुसे याच्या नेतृत्वाखाली सैनिक गटाने राष्ट्राध्यक्ष केले परंतु मार्च १९७१ मध्ये लिव्हिंग्स्टनही पदच्युत होऊन सैनिकगटाने कारभार हाती घेतला. सप्टेंबर १९७३ च्या निवडणुकीने पेरॉनची अध्यक्ष म्हणून व त्याची पत्नी इझाबेला हिची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. १ जुलै १९७४ रोजी पेरॉन वारल्यामुळे इझाबेला अध्यक्ष झाली. अतएव काही अपवादात्मक काळ सो़डल्यास हा समृद्ध देश स्वातंत्र्यापासून बहुतांशी हुकूमशहांच्याच हाती राहिला आहे. १९३० ते १९५८ पर्यंत जे दहा राष्ट्रपती झाले त्यांतील आठ सैन्यप्रमुख होते.

 

राजकीय स्थिती: थोड्याफार फरकाने अर्जेंटिनाचे संविधान अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या धर्तीवर आहे. यात पेरॉनच्या वेळी महत्त्वाचे फरक करण्यात आले होते. परंतु त्याच्या पदच्युतीनंतर १८५३ चे संविधान १८६०, १८६६ व १८९८ मधील दुरुस्त्यांसह पुन्हा प्रचलित झाले. राष्ट्रपती व तो अकार्यक्षम झाल्यास उपराष्ट्रपती यांच्या हाती सर्व कार्यशक्ती केंद्रित आहे. दोघेही सार्वत्रिक मतदानाने निवडले जातात आणि दोघेही रोमन कॅथलिक व अर्जेंटिनात जन्मलेले असावे लागतात. यांची मुदत सहा वर्षांची असते व त्यांना ताबडतोब पुनः निवडणुकीस उभे राहता येत नाही (हे कलम पेरॉनने बदलले होते). १९४७ पासून स्त्रियांस मताधिकार आहे. मंत्रिमंडळाची नेमणूक व बडतर्फी राष्ट्रपतीच्या अधिकाराधीन आहेत. तथापि मंत्र्यास कार्याचा जाब संसदेस द्यावा लागतो. राष्ट्रीय संसद द्विसदनी असून तिचे प्रतिनिधी-मंडळ (चेंबर ऑफ डेप्युटीज) व राज्यमंडळ (सिनेट) असे कक्ष आहेत. प्रतिनिधी ४ वर्षांकरिता प्रत्यक्ष मतदानाने निवडतात. निम्मे मंडळ दर दोन वर्षांनी निवडले जाते. राज्यमंडळावर प्रत्येक प्रांताचे दोन प्रतिनिधी असून त्यांची मुदत ९ वर्षांची असते. प्रतिनिधी-मंडळ व राज्यमंडळ यांच्या उमेदवारांची वये अनुक्रमे २५ व ३० वर्षे पूर्ण असावी लागतात. अर्जेंटिनाचे २२ प्रांत, १ केंद्रशासित राजधानीचा प्रदेश, टिएरा डेल फ्यूगो व दक्षिणेकडील बेटांचा एक राष्ट्रीय प्रदेश असे भाग केलेले आहेत. केंद्रसंविधानाशी विसंगत होणार नाही असे स्वतःचे संविधान करण्यास प्रांतांस स्वातंत्र्य आहे. त्यांचा राज्यपालही सार्वत्रिक मतदानाने निवडला जातो. लोकसत्ताक तत्त्वास बाधा येत असेल, तर प्रांतीय क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असल्याने अप्रिय पक्ष सत्तारूढ झाल्यास प्रांतात बखेडे करवून, हस्तक्षेपयोग्य परिस्थिती निर्माण करण्याचा मोह त्यास होऊ शकतो. यामुळे प्रांतीय राज्यपाल राष्ट्रपतीची बाहुली होतात. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमतो. तसेच सैन्याधिपती म्हणून तिन्ही दलांचे अधिकारीही तोच नेमतो.

 

प्रांतीय न्यायालये अलग असून ती फक्त प्रांतीय बाबींतच निवाडा देतात. राष्ट्रीय बाबींकरिता सर्वोच्च न्यायालय व त्याखालील न्यायालये आहेत. सैन्याचे पायदळ, गिरिपथके, यंत्रसज्‍जदळ, तोफखाना, विमानगामी पथके असे विभाग आहेत. २० ते ४५ वयाच्या नागरिकांना २ वर्षे नाविकदलात आणि एक वर्ष पायदळ अथवा हवाईदलात काढणे आवश्यक असते. १९७३ च्या माहितीनुसार खडे सैन्य ८५,००० व राखीव अडीच लाख आहे नौदलात आठ विनाशिका, तीन फ्रिग्रेट, दोन पाणबुड्या आणि ५० लहान बोटी आहेत आणि हवाई दलात ३०० वैमानिक व २०० लढाऊ विमाने, शिवाय काही बाँबफेकी व वाहतूकविमानेही आहेत.

अर्जेंटिनाच्या राजकारणात लष्करी अधिकाऱ्‍यांनी अनेकदा हस्तक्षेप केल्याने सैन्याधिकारी व मुलकी शासन यांमध्ये अधिकारसंघर्ष नेहमीचाच आहे व मुलकी राष्ट्रपतीचे जीवन कष्टप्रद व धोक्याचेही झाले आहे.

अर्जेंटिना संयुक्त राष्ट्रे, अमेरिका ऐक्य संघ इ. बहुतेक आंतरराष्ट्रीय संघटानांचा सदस्य आहे.

आर्थिक स्थिती: दक्षिण अमेरिकेत आर्थिक दृष्ट्या अर्जेंटिना सर्वांत पुढारलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याच्याहून फक्त ब्राझीलच मोठा आहे आणि व्हेनेझुएला सोडल्यास अर्जेंटिनाचे दरडोई उत्पन्न सर्वोच्च आहे. बहुसंख्य लोकवस्ती शहरी (६१%) आहे आणि त्यात मध्यम वर्गाचे प्रमाण मोठे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी-अखेरीस व विसाव्याच्या सुरवातीस अर्जेंटिनात यूरोपीय भांडवल व आप्रवासी यांचा लोंढा सुरु झाला. पँपासमध्ये शेती व पशुधन यांची प्रचंड वाढ झाली आणि यूरोप, विशेषतः ब्रिटन, येथील मांस व गहू यांची बाजारपेठ याने काबीज केली. दुसऱ्या महायुद्धानंतरही अर्जेंटिनाचा अग्रक्रम काही वर्षे कायम राहिला.

म्हणण्यासारखी खनिजसंपत्ती नसूनही अर्जेंटिनातील उद्योग व कारखाने प्रगत आहेत. महायुद्धात व नंतर काही काळ अर्जेंटिनाची भरभराट हेवा वाटण्याजोगी होती. परंतु १९५० नंतर पेरॉनच्या एकांगी अर्थव्यवस्थेमुळे त्यास उतरती कळा लागली. १९५८ पासून ही परिस्थिती पालटत असून परकीय भांडवल पुन्हा देशात येऊ लागले आहे. माल तयार करणारे उद्योग, चालू व होऊ घातलेले कारखाने यांनाच परकीय भांडवलाचा उपयोग व्हावा, असे शासनाचे धोरण आहे. अर्जेंटिनात पैसा गुंतविणाऱ्‍यांमध्ये विशेषतः अमेरिका, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्‌स, पश्चिम जर्मनी, फ्रान्स व इटली हे देश प्रमुख आहेत.

अर्जेंटिनात सुमारे २८ कोटी हेक्टर जमिनीपैकी ४१% चराऊ, ३२% जंगलव्याप्त व ११ टक्के शेतीखाली आहे. बाकीची पडून आहे. दहा लाखांहून अधिक लोक शेतीव्यवसायात आहेत. १९६६ च्या नोंदणीनुसार ४,७१,७५६ शेते आहेत. यांतील ५० टक्के मालकच वाहतात, १७ टक्के खंडावर आहेत आणि उरलेली शासन किंवा समाईक भांडवल कंपन्यांच्या मालकीची आहेत. यांची वाटणी समतोल नाही. उदा., ८६ टक्के शेतमालकांकडे फक्त १६ टक्के तर ०·५ टक्के मालकांकडे ३३·५ टक्के जमीन आहे. परंतु अपुरी लोकसंख्या आणि अफाट शेतजमीन यांमुळे भूमिहीनांच्या गर्दीची वा असमाधानाची झळ देशास लागलेली नाही.


पशुसंवर्धनाकरिता इतके अनुकूल हवापाणी वा मृदा इतरत्र क्वचितच आढळते. पशुधनाबाबत भारत, अमेरिका, रशिया यांच्या खालोखाल अर्जेंटिनाचा क्रम लागतो. वर्षभर चरता येईल असे गवत भरपूर होते आणि अल्फाल्फा गवताची लागवडही लाखो हेक्टरांत झालेली आहे. पँपासमध्ये निर्यातीकरिता विशिष्ट प्रकारच्या गाईबैलांची जोपासना केली असून इतर ठिकाणची जनावरे स्थानिक उपयोगाकरिता वापरतात. १९६७ मध्ये गाईबैल ५·४९ कोटी, मेंढ्या ४·६ कोटी, डुकरे ३५ लक्ष व घोडे ४८ लक्ष होते. दर वर्षी सरासरी ९० लाख जनावरांची कत्तल केली जाते. यातील २० टक्के मांस निर्यात होते व ८० टक्के देशातच खपते. तसेच अर्जेंटिनातील मेंढ्यांची संख्याही जगात तिसऱ्‍या क्रमांकाची असून यांपैकी एक कोटी मेंढ्या दर वर्षी मारल्या जातात. यातील ३३% निर्यात होते. दुग्धोत्पादन, कोंबड्या व डुकरे यांचा धंदाही लघुउद्योग म्हणून केला जातो. सु. तीन कोटी हेक्टर जमीन शेतीखाली असून अन्नधान्यांपैकी गव्हाचे उत्पादन १० टक्के आहे. हा देश गव्हाच्या निर्यातीत अग्रेसर आहे. बार्ली, ओट व राय यांचेही पीक उल्लेखनीय आहे. यांशिवाय जवस, सूर्यफूल, ऑलिव्ह वगैरे तेले देणारी पिके निघतात. कापूस, ऊस, भात, तंबाखू, येर्बामाते वगैरेंचे उत्पादन पुरेसे होते. फळभाज्यात देश स्वयंपूर्ण असून मेंदोसा प्रांतात विविध मद्ये तयार होतात. सुमारे नऊ कोटी हेक्टर जमिनीवर अरण्ये असून उत्तम कठीण लाकूड भरपूर निघते. मात्र मऊ लाकूड आयात करावे लागते. देशातील सरोवरे व नद्या आणि भोवतालचा समुद्र यांत मासे भरपूर आहेत, परंतु अर्जेंटिनास माशांपेक्षा मांसच प्रिय असल्याने मच्छीमारीकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.

 

मांस व गहू यांच्या निर्यातीस अर्जेंटिनाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असूनही गेल्या पाव शतकात देशाचे औद्योगिकीकरण दुर्लक्षित नाही. राष्ट्रीय उत्पादनात तृतीयांश हिस्सा उद्योगधंद्यांचा असून शेतीचा एकपंचमांश आहे. भारी उद्योग सोडल्यास इतर सर्वांत, विशेषतः कृषिउद्योग, कापड, लोकर, इमारती-साधने इत्यादींमध्ये अर्जेंटिना जवळजवळ स्वयंपूर्ण आहे. परदेशी मालावर जकात बसवून देशी उद्योगांस चांगले संरक्षण दिले आहे. भारी उद्योगांमध्येही पोलाद व लोखंडाचे कारखाने निघाले आहेत. परंतु खनिजांची वानवा ही मोठीच अडचण आहे. अर्जेंटिनात थोड्याफार प्रमाणात गंधक, कथील, सोने, चांदी, अस्फाल्ट व पेट्रोलियम सापडते. सैन्याने स्थापिलेल्या आपल्या उपयोगाच्या वस्तूंच्या कारखान्यांमुळे राष्ट्रीय उद्योगधंद्यांस सुरुवात झाली आहे. हल्ली अर्जेंटिनामध्ये रसायने, आगगाड्यांची उपकरणे, वाहने, लहान विमाने, जहाज-बांधणी, डबाबंद मांस व मांसोद्भव पदार्थ, क्वेब्राचोपासून टॅनिन, येर्बामाते, साखर-शुद्धी, पीठ, मद्ये, सुती व लोकरी कापड, कागदलगदा, प्लॅस्टिक, रंग, औषधी वगैरेंचे कारखाने आहेत. कातडी सामान, ट्रॅक्टर वगैरे शेतीच्या अवजारांचे कारखाने उल्लेखनीय आहेत. बहुतेक कारखाने ब्वेनस एअरीझच्या ईशान्येस केंद्रित झाले आहेत. जलविद्युत्‌शक्तीचा अभाव असल्याने अर्जेंटिनाला कोळसा अगर तेल ह्यांवर अवलंबून राहावे लागते. परदेशी भांडवलाच्या मदतीने तेलनिर्मिती आणि जलविद्युत्‌निर्मिती वाढविण्यात येत आहे.

 

१९५५ पासून अर्जेंटिनाचा व्यवहारशेष प्रतिकूल होता आणि व्यापारसंतुलन तुटीचे होते परंतु १९६२–६४ मध्ये व्यापारसंतुलन अनुकूल झाले. १९७१ मध्ये निर्यातीचे मूल्य ७·९६ अब्ज पेसो होते आणि आयातीचे ८·५८ अब्ज पेसो होते. निर्यातीत ४० टक्के हिस्सा पशुधनाचा आणि ५० टक्के शेतमालाचा होता. देशाच्या निर्यातीची मुख्य गिऱ्हाइके ब्रिटन, नेदर्लंड्स, इटली, जर्मनी व ब्राझील ही होत. आयात मुख्यतः अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, इटली व्हेनेझुएला, ब्राझील व फ्रान्स येथून होते.

 

अर्जेंटिनाचे नाणे पेसो हे होय. एका पेसोचे १०० सेंतावो होतात. १९७२ मध्ये पेसोची किंमत एका अमेरिकन डॉलरला पाच पेसो आणि एका पौंडाला १२·२० पेसो होती.

 

दक्षिण अमेरिकेत दळणवळणाच्या बाबतीत अर्जेंटिना आघाडीवर आहे. या खंडातील ४० टक्के लोहमार्ग आणि निम्म्याहून अधिक दूरध्वनी अर्जेंटिनात आहेत. अर्जेंटिनातील एकूण लोहमार्ग ४४,४६६ किमी. असून १०० चौ. किमी. ला २·५ किमी. लोहमार्ग असे हे प्रमाण पडते. परंतु दक्षिण अर्जेंटिनात लोहमार्ग नाहीत. बहुतेक मार्ग ब्वेनस एअरीझपासून पंख्याप्रमाणे पसरले आहेत. यांतील ६० टक्के मार्ग राष्ट्रीयीकरणापूर्वी ब्रिटिश मालकीचे होते. चिली, बोलिव्हिया, पॅराग्वाय व यूरग्वायला येथून लोहमार्ग जातात. ब्वेनेस एअरीझमध्ये भुयारी लोहमार्गही आहेत. ९,३९,४९८ किमी. लांबीचे रस्ते आहेत. अंतर्देशीय व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक समाधानकारक आहे. तेल व मालवाहू बोटींची संख्या बरीच आहे. शिवाय यूरोपकडे मांसाची निर्यात करण्याकरता प्रशीतक बोटीही आहेत. अर्जेंटिनाच्या किनाऱ्‍यावर मोठ्या बोटी घेणारी १५ बंदरे आहेत, परंतु मुख्यतः ब्वेनस एअरीझ (७५ टक्के), ला प्लाता, बाईआ व्हलांका व रोझार्यो या बंदरांतून आयात-निर्यात चालते.

 

देशात १९६४ मध्ये ९० नभोवाणी-केंद्रे आणि १० दूरचित्रवाणी-केंद्रे होती व दूरचित्रवाणी-यंत्रांची संख्या सु. १६ लाख होती. १९७१ मध्ये १७,४६,०१५ दूरध्वनियंत्रे होती.

 

लोक व समाज-जीवन: अर्जेंटिनाची भाषा स्पॅनिश, संस्कृती फ्रेंच व वृत्ती जर्मन आहे असे म्हटले जाते. आता यात थोडा फरक होऊ लागला आहे.

 

१९६० मध्ये अर्जेंटिनाची लोकसंख्या २,००,०९,००० भरली. यात १,००,३५,००० पुरुष व ९९,७४,००० स्त्रिया होत्या. यांतही सुमारे १३% परकीय होते. १९४७ ते १९६० मध्ये ४१,१२,००० ची भर लोकसंख्येत पडली. हे प्रमाण दरसाल १·८ टक्के भरले. यामध्ये आप्रवाशांचे प्रमाण भरपूर आहे. मात्र लोकवस्ती देशभर समान विखुरलेली नाही. पँपास या २७ टक्के भूप्रदेशात ६० टक्के लोक राहतात. याच भागात कॉर्दोव्हा, सांता फे, ला पँपा, केंद्रशासित ब्वेनस एअरीझ हे प्रांत येतात. यांतही ला पँपा व ब्वेनस एअरीझमध्ये विशेष गर्दी (४८ टक्के) आहे. दक्षिणेकडील पॅटागोनिया हा अत्यंत विरळ वस्तीचा प्रदेश आहे. यात दर चौ. किमी. ला एकाहून कमी वस्ती आहे. तर ब्वेनस एअरीझमध्ये सर्व देशात दाट म्हणजे दर चौ. किमी. ला २९·९ वस्ती आहे.

 

सर्व अर्जेंटिनात लोकवस्तीचे प्रमाण दर चौ. किमी. ला ८·३ पडते. ब्वेनस एअरीझ शहर (लोकसंख्या ३३ लक्ष–१९६६) व त्याची उपनगरे यांमध्ये अर्जेंटिनाचे एकतृतीयांश लोक (७१ लाख) गर्दी करून आहेत.


 बहुतेक सर्व लोक यूरोपीय वंशाचे आहेत. अर्जेंटिनात यूरोपीयांना भटके व मागासलेले लोक आढळले त्यांस नष्ट करण्यास वेळ लागला नाही. आता फारच थोडे इंडियन राहिले आहेत. स्पॅनिश व इंडियन यांमध्ये मिश्रणही कमी झाल्याने या देशात मेस्तिसो (मिश्रवंशीय) दोन टक्के असतील व तेही अँडीज पर्वताच्या पायथ्याकडील प्रदेशात केंद्रित आहेत. लॅटिन अमेरिकेतील हा ‘गोऱ्‍यांतला गोरा’ देश होय. येथील अफाट शेतीवर, विशेषतः पशुसंवर्धनाकरिता, मेस्तिसो व गरीब आप्रवासी यांची भरती करण्यात आली. वर आकाश व खाली अमर्याद सपाट जमीन, वाहनास घोडा, झोपण्यास तेच खोगीर व जीन, खाण्यास गोमांस व पिण्यास लालभडक कच्ची दारू अशा परिस्थितीत अर्जेंटिनाचा विख्यात ‘गाउचो’ हा वर्ग निर्माण झाला. याचे जीवन व त्याबद्दलच्या काव्यकथा अर्जेंटिनाच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग झाली आहेत.

 

आज मेस्तिसो कमी असले, तरी १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या अल्प लोकसंख्येत त्यांचे प्रमाण मोठे होते. ते कमी करण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्‍न करण्यात आला. त्या सुमारास सारम्येंतो या पुढाऱ्‍याने आडदांड गाउचो व मेस्तिसो यांचा अर्जेंटिनाच्या सांस्कृतिक जीवनावरील प्रभाव कमी करून शुद्ध यूरोपीयांचे वर्चस्व स्थापण्यानेच देशाचे भवितव्य आशामय होण्याचा संभव आहे, असा सिद्धांत मांडला व त्याकरिता यूरोपीय आप्रवाशांची भरती करावी असे सुचविले. त्यास आलबेर्दी व मीत्रे यांचा पाठिंबा मिळाला. हे तिघेही राष्ट्रपती झाले व त्यांनी अनेक प्रलोभने देऊन हजारो यूरोपीय देशात आणले. या धोरणाने पन्नास वर्षांत अर्जेंटिनाचे सामाजिक स्वरूप आमूलाग्र बदलले. १८५२ मध्ये गोऱ्‍यांचे प्रमाण २·७५% होते ते १९४७ मध्ये ८९% झाले. लोकसंख्येत बुद्धया केलेल्या या फरकामुळे अर्जेंटिनात वांशिक यादवी नाही, तथापि यूरोपीयांमध्ये मुख्यत्वे इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच व त्यानंतर अनुक्रमे इंग्रज, जर्मन, स्विस, ऑस्ट्रियन, पोल, स्कँडिनेव्हियन, स्लाव्ह इ. लोक असल्याने त्यांचे स्वाभाविक गट पडलेले आहेतच आणि सामाजिक व राजकीय जीवनावर त्याचा परिणाम दिसतो. उदा., इटालियन बहुसंख्य असल्याने देशाच्या जीवनाच्या आविष्कारात इटालियन नावे प्रामुख्याने दिसतात. अर्जेंटिनाचा हुकूमशहा पेरॉन हा इटालियनवंशीयच होता.

 

तथापि निरनिराळे वांशिक, भाषिक व सांस्कृतिक संस्कार घेऊन येणाऱ्‍या या लोकांवर स्पॅनिश भाषा व अर्जेंटिनाची विशिष्ट संस्कृती यांचा ठसा उमटून एक नवा समाज या देशात उदयास आला आहे.

 

कॅथलिक धर्म हा राजधर्म आहे, पण इतर धर्मास व पंथांस आचारस्वातंत्र्य आहे. कॅथलिक धर्मपीठाच्या बाबतीत राष्ट्रपतीस विशेषाधिकार हे देशाचे वैशिष्ट्य आहे. बिशपच्या दर्जाच्या धर्मगुरूंची नेमणूक सिनेटच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतो आणि पोपचे धार्मिक आदेश त्याची संमती मिळाल्यावरच देशात कार्यान्वित होऊ शकतात. अर्जेंटिनातील कॅथलिक धर्मशासनाचे काही मुख्याधिकारी राष्ट्रपतीच्या यादीतूनच पोपला निवडावे लागतात. बहुसंख्य (सु. ९५%) लोक कॅथलिक असल्याने त्यांचे सण व उत्सव देशभर उत्साहाने पाळले जातात. तसेच इटलीप्रमाणेच या देशातही ठिकठिकाणी अनेक देवदेवतांची लहान-मोठी मंदिरे आढळतात.

 

अर्जेंटिनातील दर माणशी मांसभक्षणाचे प्रमाण साऱ्या जगात अत्युच्च आहे. तसेच लाल मद्य हे सामान्यांचे पेय आहे. सर्वसाधारणतः लोक निरोगी, आनंदी व उत्सवप्रिय आहेत. नृत्यगायनाचा शोक सार्वत्रिक आहे. स्पॅनिश व गाउचो यांच्या नृत्याच्या मनोहर मिश्रणाने विशिष्ट लोकनृत्यप्रकार निर्माण झाले आहेत.

 

कौटुंबिक जीवन पुष्कळसे भारतीय धर्तीचे वाटते. मोठी कुटुंबे, वडीलधाऱ्‍‌यांचा आदर व अधिकार, सार्वजनिक रीत्या गौण पण कौटुंबिक अधिकार मोठा असे स्त्रियांचे स्थान, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ईव्हा पेरॉनमुळे स्त्रिया सार्वजनिक जीवनातही पुरुषांच्या बरोबरीने पुढे येऊ लागल्या. या देशात औरस व अनौरस संततीत कायद्याने फरक नाही.

 

अर्जेंटिनातील आरोग्यव्यवस्था लॅटिन अमेरिकेत उत्तम समजली जाते. देवी, मलेरिया व घटसर्प यांचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे. क्षय व कुष्ठरोग यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सामाजिक सुरक्षायोजनांचे प्रमाणही मोठे असून अनाथ, अपंग व वृद्धांना मदत, बेकारांना भत्ता, नुकसानभरपाई, प्रसूती, आरोग्यविमा इ. सवलती आहेत.

 

भाषा व साहित्य: अर्जेंटिनाची भाषा स्पॅनिश आहे परंतु इटालियन संख्याधिक्यामुळे त्यांच्या भाषेचा व उच्चारांचा प्रभाव पडून ती इतरांपेक्षा थोडी निराळी झाली आहे. मेक्सिको शहराबरोबरीने ब्वेनस एअरीझ हे प्रकाशनात अग्रेसर असून तेथील ग्रंथ सर्व लॅटिन अमेरिकेत जातात. ला प्रेन्सा (खप सु. २६ लाखांवर), ला नासिऑ (सु. २·९ लाख) वक्लारिन (सु. ३·४३ लाख) ही वृत्तपत्रे जगन्मान्य आहेत. राजधानीतील राष्ट्रीय ग्रंथालयात पाच लाख ग्रंथ व दहा हजार हस्तलिखिते आहेत.

 

एचेव्हेर्रीआ (१८०५–५१), ल्‌गोनेस लेओपोल्दो (१८७४–१९३८), बोर्जेस (१८८९ –   ), व्हिक्टोरिया ओकांपो, मीत्रे (१८२९–१९०६), सारम्येंतो (१८११–१८८८), अर्नांदेझ (१८३४–८६), रॉमेरो (१८९१–    ), माएआ (१९०३–     ) हे लेखक व कवी उल्लेखनीय आहेत. सावेद्रा लामास (शांती, १९३६) व आउसाय (वैद्यक, १९४७) हे नोबेल पारितोषिकांचे मानकरी अर्जेंटिनाचे नागरिक होत. रवींद्रनाथ टागोरांचे वाङ्मय एके काळी अर्जेंटिनात फार लोकप्रिय होते.

 

शिक्षण : दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनातील विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाण अत्युच्च आहे व साक्षरता ९० टक्के आहे. सर्व शिक्षण मातृभाषेतून आहे व त्या खंडात उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. प्राथमिक शिक्षण ६ ते १४ वयापर्यंत सक्तीचे व मोफत असून १९६३ मध्ये त्यात ९० टक्के, दुय्यम शिक्षणात १३ ते १८ वयाचे २८ टक्के व उच्च शिक्षणात १८ ते २१ वयाचे १० टक्के विद्यार्थी होते. एकूण २७ विश्वविद्यालये आहेत, त्यांत ९ राष्ट्रीय, २ प्रांतीय व १६ मुख्यतः धार्मिक संस्थांनी चालविलेली आहेत.

 

कला व क्रीडा: वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य यांवर नवनव्या फ्रेंच व अमेरिकन ग्रंथांचा व प्रवाहांचा प्रभाव दिसतो. नाना तऱ्हेचे नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत. त्यांत टँगो हा खास अर्जेंटिनाचा होय. गिटार हे तंतुवाद्य सार्वत्रिक आहे. क्रिकेट वगळून सर्व आधुनिक खेळ खेळले जातात. त्यांत सॉकर हा फुटबॉलचा प्रकार विशेष प्रिय आहे. याशिवाय हाई आलाई व पोर्तो हे खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अर्जेंटिनाचे घोडे व घोडेस्वार प्रख्यात असून अर्जेंटिनाची पोलो टीम भारताच्या तोडीची आहे.

 

महत्त्वाची स्थळे: दक्षिण अटलांटिकवरील मार देल प्लाता, अँडीजमधील सरोवरातील स्विस धर्तीचे सान कार्लोस दे बारीलोचे हे रम्य ठिकाण, ईशान्य सीमेवरील नायगाराहून उंच व रुंद ईग्वासू धबधबा व पँपास ही पर्यटकांची मुख्य आकर्षणे होत. मेंदोसा, कॉर्दोव्हा व तूकूमान ही ऐतिहासिक शहरे आणि ब्वेनस एअरीझ ही राजधानी प्रेक्षणीय आहे. यांतून वसाहतकालीन वास्तूंबरोबरच आधुनिक ग्रंथालये, संग्रहालये व कलाकेंद्रे पाहावयास मिळतात. 

 

संदर्भ : 1. James, Preston E. Latin America, New York, 1959.  

           2. Whitaker, A. P. The Argentina, New York, 1964.

 

शहाणे, मो. ज्ञा.