अरल: आकारमानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे सरोवर. हे रशियामध्ये उ. अक्षांश ४३° ३०’ ते ४६° ५०’ व पू. रेखांश ५८° ते ६२° यांदरम्यान आहे. अरबी व इराणी लोक त्यास ‘ख्वारिज्म समुद्र’ म्हणत परंतु ‘अरालडेंघिझ’ (= बेटांचा समुद्र) या किरगीझ शब्दावरुन ‘अरल’ नाव रुढ झाले. हे समुद्रसपाटीपासून ५० मी. उंच, ४२८ किमी. लांब व २९३ किमी. रुंद असून त्याचे क्षेत्रफळ ६८,६८० चौ.किमी. आहे. याची सरासरी खोली १६ ते २५ मी. असून ती पश्चिमेकडे ६७ मी. पर्यंत आहे. पाणी किंचित खारे असून त्याला बाहेर निचरा नाही. अरलच्या उत्तरेस स्टेपचा गवताळ प्रदेश, पश्चिमेस उश्तउर्तचा पठारी मुलूख, दक्षिणेस खिवा हा सुपीक प्रांत व पूर्वेला किझिलकुम हे वाळवंट आहे. सरोवरास ईशान्येकडून सिरदर्या व दक्षिणेकडून अमुदर्या या नद्या मिळतात. अरलच्या पश्चिमेस २८२ किमी. वर कॅस्पियन समुद्र असून एके काळी तो याला जोडलेला असावा. अरलमधील बेटे फारशी महत्त्वाची नाहीत कारण वादळी वाऱ्‍यांमुळे व पाणी गोठल्यामुळे वाहतूक सुलभ होत नाही. सरोवरात कार्प, बार्बेल, स्टर्जन वगैरे जातींचे मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. अराल्स्क व मूईनाक ही यावरील महत्त्वाची बंदरे होत.

 

लिमये, दि. ह.