अतिप्रवाहिता : द्रव हीलियम (He II) मध्ये २·१९० के. [→केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम] (लँब्डा बिंदू) तापमानाच्या खाली आढळणारा घर्षणमुक्त प्रवाहीपणा. सर्वसामान्य द्रव व वायूसुद्धा पलीकडे जाणार नाहीत एवढ्या सूक्ष्म छिद्रांतून व केशनलिकांतून हीलियम (He ΙΙ) सहज वाहू शकतो. या असामान्य द्रवाच्या बाबतीत ‘उच्च ऊष्मीय संवाहकता’, ‘पटल प्रवाह’(अत्यंत पातळ थरातून वाहणे), ‘द्वितीय ध्वनी’ (आंदोलन-विस्तार कमी न होता ऊष्मीय आंदोलने अमर्याद अंतरापर्यंत जाणे) व ‘धारायंत्र-परिणाम’ (कारंज्याप्रमाणे उडणे) असे गुणधर्म आढळतात. या अतिप्रवाही द्रवाची श्यानता (प्रवाहास होणारा अडथळा) व एंट्रॉपी (उष्णता व तापमान यांचे महत्त्वाचे गुणोत्तर) शून्य असते. लँबडा बिंदूच्या तापमानात आढळणारी हीलियमाची द्रव अवस्था सामान्य (He Ι) व असामान्य (He ΙΙ) अशा दोन द्रवांचे मिश्रण म्हणून असते व तापमान कमी होईल तसतसे सामान्य हीलियम द्रवाचे असामान्य द्रवामध्ये रूपांतर होत जाते.
पहा : एंट्रॉपी नीच तापमान भौतिकी.
शिरोडकर, सु. स.