अमीबा: सगळ्या जिवंत प्राण्यांत अगदी साधी शरीररचना असणारा हा प्राणी आहे. प्रोटोझोआ संघातील ऱ्होयझोपोडा वर्गात याचा समावेश होतो. अमीबा वंशाच्या अनेक जाती असून त्या खाऱ्या व गोड्या पाण्यात आणि दमट जमिनीत राहतात. अमीबा प्रोटिअस ही जाती सार्वत्रिक आहे. अमीबाच्या बहुतेक जाती सूक्ष्म असतात पण काही डोळ्यांनी दिसण्यासारख्या मोठ्या असतात.
अमीबाच्या शरीराचा ठराविक आकार नसून तो सारखा बदलत असतो. त्याचे शरीर एकाच कोशिकेचे (पेशीचे) बनलेले असून पातळ, लवचिक जीवद्रव्यकलेने (पापुद्र्यासारख्या पदार्थाने) आच्छादिलेले असते. या कलेच्या आत ⇨जीवद्रव्य असून त्याच्या बाहेरच्या कोणत्याही
प्रकारचे कण नसलेल्या स्वच्छ थराला बहिर्द्रव्य आणि सापेक्षतया पातळ आणि कणमय असणाऱ्या बाकीच्या सगळ्या भागाला अंतर्द्रव्य म्हणतात. अंतर्द्रव्यात गोलसर केंद्रक असून ते सर्व चलनवलनशक्तीचे नियंत्रणकेंद्र असते. याच भागात एक किंवा अधिक संकोचशील रिक्तिका (संकोच पावणाऱ्या लहान पोकळ्या, → संकोचशील रिक्तिका) असतात. शरीराच्या आंतरिक दाबाचे नियमन करणे आणि द्रवरूप (उत्सर्ग) पदार्थ अंशतः शरीराबाहेर टाकणे ही यांची कार्ये होत. सूक्ष्मजंतू, डायाटम, जैव पदार्थांचे कण हे यांचे भक्ष्य होय शरीरारासून निघालेल्या बोटांसारख्या प्रवर्धरूप पादाभांनी भक्ष्य वेढून तो ते जीवद्रव्यात घेतो भक्ष्याच्या भोवती पाण्याचा लहानसा थर असतो, याला अन्न-रिक्तिका म्हणतात आणि हिच्यात अन्नाचे पचन होते. पचनक्रियेनंतर अन्न-रिक्तिका शरीराच्या पृष्ठभागावर कोणत्याही ठिकाणी फुटून मल बाहेर जातो. पादाभांचा उपयोग चलनाकरिताही होतो. चलनाची पद्धती इतकी लाक्षणिक आहे की, तिला ‘अमीबीय गती’ असे नाव मिळाले आहे. अमीबा ज्या पाण्यात राहतो त्यात विरघळलेला ऑक्सिजन ⇨विसरणाने जीवद्रव्यकलेतून शरीरात जातो आणि आत उत्पन्न होणारा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. चयापचयामुळे (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे, → चयापचय) उत्पन्न होणारे यूरियासारखे निरुपयोगी पदार्थ जीवद्रव्यकलेतूनच बाहेर जातात. अशा प्रकारे श्वसन-आणि उत्सर्जन-क्रिया सगळ्या पृष्ठाच्या द्वारे होतात. प्रतिकूल परिस्थितीत अमीबा एका पदार्थाच्या स्रवणाने शरीराभोवती संरक्षक पुटी निर्माण करून अनुकूल परिस्थितीची वाट पाहत निष्क्रिय अवस्थेत तिच्यात राहतो व अनुकूल परिस्थिती येताच बाहेर पडतो.
अमीबा एका ठराविक आकारमानाइतका वाढला म्हणजे द्विभाजनक्रियेने त्याचे जनन होते. या क्रियेत शरीराचे दोन तुकडे होऊन ते स्वतंत्र प्राणी होतात. अमीबाच्या पुष्कळ जाती विविध प्राण्यांच्या आहारनालात (अन्नमार्गात) परजीवी असतात यांपैकी काही रोग उत्पन्न करणाऱ्या असतात. एंटामीबा हिस्टॉलिटिकामुळे माणसाला आमांशाचा विकार होतो.
कर्वे, ज. नी.
“