अमरोहा : उत्तर प्रदेश राज्याच्या मुरादाबाद जिल्ह्यातील अमरोहा तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ८२,७०२ (१९७१). हस्तिनापूरच्या अमरोहा राजाने हे वसविले अशी एक दंतकथा आहे, तर पृथ्वीराजाच्या बहिणीने हे वसविले असेही समजतात. १२६६ मध्ये बल्बन येथे येऊन गेल्याचा उल्लेख मिळतो. १३०४ मध्ये दिल्लीच्या सुलतानाने मोगलांचा येथे पराभव केला. एका हिंदू मंदिरावर तेराव्या शतकात जामा मशिद बांधण्यात आली. तेथे त्या वेळी राहणारा शेख सद्दू हा अवलिया म्हणून प्रसिद्ध होता. चौदाव्या शतकात शरफुद्दीन उर्फ शाह विलायत नावाचा मुसलमान साधू येथे राहत असे. या दोघांच्या दर्ग्यांमुळे अमरोहाला धार्मिक महत्त्व आले. येथे अनेक मशिदी आहेत.
उत्तर रेल्वेवर दिल्लीपासून १३० किमी.वर हे स्थानक असून १८७० पासून येथे नगरपालिका आहे. हातमागाचे कापड, मातीची नक्षीदार भांडी इ. वस्तूंसाठी हे प्रसिद्ध असून तालुक्यात पिकणाऱ्या धान्याची ही बाजारपेठ आहे.
दातार, नीला