अभयदेवसूरि : (सु. १०३२-सु. १०८३). एक प्रसिद्ध जैन आचार्य. श्वेतांबरांच्या अर्ध-मागधी आगमांतील अकरा अंगग्रंथांवर शीलांकाचार्यांनी लिहिलेल्या टीकांपैकी दोनच टीका उपलब्ध असल्यामुळे उरलेल्या पुढील नऊ अंगग्रंथांवर अभयदेवसूरीने टीका लिहिल्या. त्यामुळे तो‘नवांगीवृत्तिकार’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या टीकाग्रंथांची नावे: स्थानांग, समवायांग, व्याख्याप्रज्ञप्ति (भगवती), ज्ञातृधर्मकथा, उपासकाध्ययन, अंतकृद्दशा, अनुत्तरापैपातिक, प्रश्नव्याकरण व विपाकसूत्र ही होत. गुजरातमधील कपडवंज येथे त्याचा मृत्यु झाला.
पहा : जैन साहित्य.
पाटील, भ. दे.