अजामीळ: भागवतात निर्देशिलेला एक विष्णुभक्त संस्कृतमध्ये त्याचे नाव ‘अजामिल’ असे असून, तो कान्यकुब्ज देशातील ब्राह्मण होता. स्वकुटुंबियांचा त्याग करून त्याने शूद्रेशी विवाह केला. वयाच्या ८८ व्या वर्षी मरणसमयी यमदूत आले असता, त्याने आपल्या दहा मुलांपैकी धाकट्या नारायणाचे नाव घेतले. त्यामुळे विष्णुदूत आले. अंतकाळी नारायणनामोच्चरणामुळे तो सर्वपापमुक्त झाला असे सांगून, विष्णूदूतांनी त्याला यमदूतांपासून सोडविले. यमदूत व विष्णुदूत यांच्यातील संवाद ऐकून त्याला उपरती झाली. सर्वसंगपरित्याग करून तो हरिद्वार येथे जाऊन राहिला व शेवटी त्याला मुक्ती मिळाली. विष्णुनामोच्चरणाने सर्व पाप नाहीसे होते, ह्या भागवतधर्मातील तत्त्वाचे अजामीळ हे एक प्राचीन उदाहरण होय.
केळकर, गोविंदशास्त्री