अँडेसाइट : ज्वालामुखी खडक. याची संरचना पृषयुक्त (सूक्ष्मकणी आधारकात मोठे स्फटिक असलेली संरचना) असून प्लॅजिओक्लेज हे खनिज याचा मुख्य घटक असते. प्लॅजिओक्लेज, कृष्णाभ्रक व हॉर्नब्‍लेंड यांचे बृहत्स्फट (मोठे स्फटिक) व घट्ट विणीचा (वयनाचा) आधारक मिळून हा खडक बनलेला असतो. मुख्यत: प्लॅजिओक्लेजाचे सूक्ष्म स्फटिक व थोडीफार काच मिळून आधारक बनलेला असतो. प्लॅजिओक्लेज हे सामान्यत: अँडेसाइन व क्वचित अल्पसिकत (सिलिका कमी असणारे) ऑलिगोक्लेज असते. क्वचित याच्यात ऑजाइट किंवा हायपर्स्थीन असते. अँडीज पर्वताच्या दक्षिण भागातील खडकांत आढळल्यावरून हे नाव दिले गेले. बेसाल्टाच्या खालोखाल विपुल आढळणारा असा हा खडक आहे.

पहा : अग्निज खडक.

ठाकूर, अ. ना.