अँग्‍लो-सॅक्सन कायदेपद्धति: इंग्‍लंडवरील नॉर्मन स्वारी १०६६ साली झाली. त्यापूर्वीचा सहा शतकांचा काळ हा अँग्‍लो-सॅक्सन कालखंड होय. तो कालखंड ट्यूटन, सॅक्सन व ज्यूट जमातींनी स्वार्‍या करून तेथे वस्ती केल्यापासून सुरू झाला. त्या काळात सदर जमातींच्या चालीरीतींतून उद्‌भूत झालेला व विकास पावलेला कायदा म्हणजे अँग्‍लो-सॅक्सन कायदा होय. बाराव्या शतकापासून आजतागायत विकसित झालेल्या ‘कॉमन लॉ’ची मुळे या कायद्यातच आहेत. पण वेळोवेळी त्यात इतका बदल झाला की, त्यात मुळातील काहीही उरलेले नाही. त्यामुळे त्या कायद्याला आता केवळ ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. अँग्‍लो-सॅक्सन कालखंडामध्ये रोमन वर्चस्व जवळजवळ नव्हते. पण इंग्‍लंडने ६६४ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर तेथे रोमन कल्पनांचा प्रभाव अप्रत्यक्षपणे पडू लागला. त्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे राजा ही एक सामर्थ्यशाली संस्था बनली.

त्या काळात नातेवाइकांचे गट इंग्‍लंडमधील समाजाचे घटक असत. त्यांना ‘मैग्थ’ म्हणत. त्यांच्यापैकी कोणाचाही खून झाल्यास त्यासंबंधी उपाययोजना वरील गट करीत असे व त्यांच्यापैकी कोणीही खून केल्यास त्याचा गट खुनी इसमाला मदत करीत असे. नवरा व बायको यांचा रक्तसंबंध नसल्याने ते भिन्न गटाचे मानले जात. गुलामांना जंगम वस्तू समजत. त्यांना विकण्याचा व ते मारले गेल्यास त्यांच्याबद्दल नुकसानी मागण्याचा अधिकार त्यांच्या मालकांस असे.

त्या काळात हल्लीच्या अर्थाने फौजदारी कायदा नव्हता. गुन्हा व अपकृत्य यांत फरक नव्हता. कृत्य जाणूनबुजून केलेले असो, अगर अजाणता केलेले असो, आणि त्यामागचा हेतू कोणताही असो, त्याची जबाबदारी ते करणार्‍याने घेतलीच पाहिजे, असा कायदा होता. अपघात अगर स्वसंरक्षण हे गुन्ह्याचे समर्थन मानले जात नसे. गुन्हेगाराला शिक्षा म्हणजे फक्त गटाला नुकसानभरपाई देणे. ख्रिस्ती धर्म स्वीकारला गेल्यानंतर दोन सुधारणा झाल्या. गुन्हेगाराचा हेतू व उद्देश यांचाही विचार होऊ लागला आणि गुन्ह्यांबद्दल नुकसानी राजालाही मिळू लागली. गुन्हे शासनाविरुद्ध असतात, या तत्त्वाचे बीज यातच आहे.

संपत्तिविषयक कायदा संदिग्धच होता. कृषक वर्ग फिरता, वस्ती विरळ व जमीन विपुल. म्हणून हाती येईल ती रिकामी जमीन कसणे ही पद्धत होती. त्यामुळे जमिनीपेक्षा गुरांना अधिक महत्त्व असे. अर्थात ही परिस्थिती फार दिवस टिकली नाही. जमिनीचे वाटप आणि मालक व कूळ या प्रारंभी नसलेल्या कल्पना समाज स्थिर झाल्यावर रूढ झाल्या. प्रार्थनेच्या वेळी आपले नाव स्मरले जावे, म्हणून राजा चर्चला जमिनीचे दान करीत असे. लष्करी नोकरीकरिता व्यक्तींना तो जमिनीचे दान करी पण ते बहुशः आदात्याच्या हयातीपर्यंतच असे. हस्तांतरणाचे चिन्ह म्हणून काठी अगर चाकू देण्यात येत असे व जामीनही देण्यात येई. पुढे ख्रिस्ती धर्म प्रचारात आल्यानंतर हस्तांतरणे लेखी होऊ लागली.

ज्याच्याकडे जंगम मालाचा कब्जा तोच मालक समजला जाई. कोणत्याही प्रकारे कब्जात असलेले जनावर पळवण्यात आले, तर चोरी झाली असे मानण्यात येई. आणि मग आरोपीची सुटका व्हावयाची असेल, तर त्याला आपण ते विकत घेतले, असे दाखवावे लागे. विक्री हा साक्षीदारासमोर झालेला उघड व्यवहार असे.

कराराबद्दल तत्त्वे निश्चित नव्हती. स्वतःचे आश्वासन व दुसऱ्याची जामीनकी हीच कराराची प्राचीन पद्धत असे.

बापाने अगर त्याच्या नातेवाइकाने मुलीला संरक्षणाखाली ठेवण्याचा आपला अधिकार बहुधा पैसे घेऊन नवऱ्याला विकत देणे, अशी विवाहाची कल्पना होती. पण विक्रीनंतरसुद्धा बाप अगर नातेवाईक यांचे त्या मुलीसंबंधी अधिकार व जबाबदाऱ्या कायम राहत असत. मुलीला आधी नवऱ्याच्या स्वाधीन केले जाई आणि मग पुरोहितासमक्ष विवाह लावण्यात येई. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी पती पत्‍नीला देणगी देत असे, तिला ‘मॉर्निग गिफ्ट’ असे म्हणत. आणि त्यातूनच ‘शुल्क’ या कल्पनेचा उगम झाला. पुढे नवऱ्याने मुलीच्या बापाला अगर नातेवाइकांना पैसे देण्याची पद्धत बंद झाली व ईश्वरी कायद्याप्रमाणे बायकोला वागवण्याची शपथ तो घेऊ लागला आणि तिच्या उपयोगाकरिता संपत्तीची व्यवस्था करू लागला. नवऱ्याच्या वर्चस्वाखाली बायकोला राहावे लागे. परस्परांची संमती, बायकोची बेइमानी व अभित्याग या कारणांकरिता घटस्फोट होत असत.

वारसाबद्दलच्या प्राचीन अँग्‍लो-सॅक्सन कल्पना संदिग्धच होत्या. संपत्तीची स्वतंत्र मालकी जसजशी रूढ होत गेली, तसतसा त्या संपत्तीबद्दल वारसाहक्कही मान्य होऊ लागला. वारसाबद्दलचे नियम भिन्न भिन्न भागांत भिन्न भिन्न होते. आई असो अगर बाप असो, त्यांचा वारसा त्यांच्या नजीकच्या नातेवाइकांना मिळे. अँग्‍लो-सॅक्सनांची नाते मोजण्याची पद्धत मजेदार होती. मानवी शरीराच्या अवयवांचा उपयोग त्याकरिता ते करीत. आईबाप म्हणजे डोके भाऊबहिणी म्हणजे मानेचा सांधा सख्खे चुलत, मावस वगैरे भाऊ हे खांदा व दूरचे चुलत बंधू सहा श्रेणींपर्यंत म्हणजे कोपर, मनगट, मूठ व मधल्या बोटाचे दुसरे व तिसरे सांधे असे त्यांचे समीकरण असे. शेवटी नखाबरोबर नाते संपत असे. आर्थिक दृष्टीने जमिनीच्या लहान लहान वाटण्या करणे श्रेयस्कर नसल्याने, काही ठिकाणी स्थानिक रूढी म्हणून वडील घराण्याकडेच जमीन राही.

जंगम माल मरणोत्तर व्यवस्थेने किती प्रमाणात देता येत असे, याबद्दल पुरावा नाही. पण काही प्रकारची स्थावर मिळकत अशा व्यवस्थेचा विषय होऊ शके. अंतकाली धर्मगुरूपुढे उच्चारलेले शब्द हेच त्या व्यवस्थेचे स्वरूप असे. पुढे चर्चने मृत्युपत्राची पद्धत सुरू केली. मृत व्यक्तीच्या संपत्तीची व्यवस्था करण्याकरिता व्यवस्थापक नेमण्याची कल्पना प्रथम नव्हती. व्यक्ती मरण्यापूर्वी आपली संपत्ती मित्राकडे अगर धर्मगुरूकडे मरणोत्तर व्यवस्थेसाठी सोपवीत असे.

‘कुलपिता’ ही रोमन कल्पना इंग्‍लंडमध्ये नव्हती. मुलावरील बापाचा पालनाधिकार पुष्कळ दिवस टिकत असे. मूल अन्न खाऊ लागण्यापूर्वी त्याला ठार मारण्याचा आणि सात वर्षापर्यंतच्या मुलाला, अर्थात अत्यंत गरज असल्यासच, विकण्याचा अधिकार पित्याला असे. सज्ञानतेचे वय भिन्न भिन्न काळी व भिन्न भिन्न कारणांकरिता वेगवेगळे असे. मूल फौजदारी कायद्याच्या दृष्टीने बाराव्या वर्षी सज्ञान होत असे आणि १५ व्या वर्षी ते भिक्षू होऊ शके. त्या वयानंतर बाप  त्याला शिक्षा करू शकत नसे.

अधिरक्षेची कल्पना स्पष्ट नव्हती. शरीररक्षण आई व संपत्तीचे रक्षण बाप अगर त्याच्याकडील नातेवाईक करीत. वरीलपैकी कोणही नसले, तर राजा ते काम करी. अँग्‍लो-सॅक्सन कालखंडाच्या शेवटी शेवटी स्त्रिया काही अंशी स्वतंत्र झाल्या, तरी तोपर्यंत त्या बापाच्या संरक्षणाखाली असत व लग्नानंतर नवऱ्याच्या वर्चस्वाखाली असत.

न्यायालये स्थापन होण्यापूर्वी हक्क-बजावणीकरिता स्वावलंबनाचा वापर करीत आणि आरंभीची न्यायालये ती पद्धत बंद करू शकली नसली, तरी स्वावलंबनाचा कमीत कमी वापर व्हावा अशी नियंत्रणे घालीत. न्यायालयांच्या परवानगीशिवाय संपत्तीचा अटकाव समर्थनीय नसे. चोरीचा माल परत मिळविण्याचा अधिकार मालकाला असे. चोरी झाल्याबरोबर आरडाओरडा करणे आवश्यक असे आणि त्या वेळी इतरांनी मदत न केल्यास त्यांना शिक्षा केली जाई. शोधांती चोरीचा माल सापडल्यास तो ताबडतोब हस्तगत करण्याचा अधिकार मालकास असे आणि तो त्याला तसा न मिळाल्यास गुन्हेगाराला न्यायालयापुढे खेचता येई. साक्षीदार, शपथा व दिव्ये ही पुराव्याची अंगे असत. अँग्‍लो-सॅक्सन न्यायालयांच्या कार्यपद्धतीतच हल्लीच्या न्यायालयीन कार्यपद्धतीची बीजे सापडतात.

श्रीखंडे, ना. स.