ॲतलासाव्ह, व्‍लादिमीर : (?–१७११). कॅमचॅटका द्वीपकल्पाचा संशोधक. सायबीरियातील कझाक जमातीत जन्म. १६७२ मध्ये झारने पूर्व प्रदेशातील खंडणी वसूल करण्याकरिता व नवीन भूमीचा शोध लावण्याकरिता येकुत्सक येथे पाठविले. १६९५ मध्ये सीमेलगतच्या ठाण्यावर असताना त्याला कॅमचॅटका द्वीपकल्पाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. डेझनेव्ह व नंतर ल्यूका मोरोस्को यांच्या नेतृत्वाखाली त्याने दोनदा संशोधनमोहिमा पाठविल्या. १६९९ मध्ये तो स्वत: समन्वेषणास गेला. कॅमचॅटका द्वीपकल्पात विस्तृत प्रवास करून त्याने तेथील नद्या, खनिजे, प्राणी, लोक इत्यादींविषयीची माहिती गोळा केली व तो प्रदेश पीटर दी ग्रेटच्या अंमलाखाली आणला. त्याच्या अहवालावरून कॅमचॅटका द्वीपकल्पाच्या शोधाचे श्रेय त्याला देण्यात येते.

शाह, र. रू.