ॲडिपिक अम्ल : कार्बनी संयुग. सूत्र HOOC–(CH2)4–COOH. हे अम्ल प्रथम चरब्यांचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] करून तयार करण्यात आले व चरबीच्या ‘ॲडेप्स’ या लॅटिन नावावरून त्याला ‘ॲडिपिक अम्ल’ हे नाव दिले गेले. बीटाच्या शर्करामय रसात ते अल्प प्रमाणात असते.
गुणधर्म : घन स्फटिकी. स्फटिक पांढरे. वासहीन. त्याला एक प्रकारचा स्वाद व किंचित आंबट चव असते. पाण्यात किंचितसे पण अल्कोहॉलात बरेच विद्राव्य (विरघळते). द्रवांक (वितळबिंदू) १५३° से. ॲडिपिक अम्ल हे तृप्त (एकही संयुजा मुक्त नाही असे, → संयुजा) डायकार्बॉक्सिलिक अम्लाच्या गटातले असून त्या गटाच्या विक्रियांसारख्याच ॲडिपिक अम्लाच्या विक्रिया असतात व त्याची लवणे, एस्टरे, अमाइडे, अम्ल हॅलाइडे इ. तयार करता येतात.
कृती : सायक्लोहेक्झेन, सायक्लोहेक्झॅनॉल किंवा सायक्लोहेक्झॉनोन यांचे, ३०° ते ४०° से. तापमानास सांद्र (जास्त प्रमाणात असलेल्या) नायट्रिक अम्लाने किंवा हवेने भंजक ऑक्सिडीकरण करून ॲडिपिक अम्लाचे व्यापारी उत्पादन केले जाते. या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून सायक्लोहेक्झेन व फिनॉल यांच्यापैकी एक वापरले जाते.
सायक्लोहेक्झेनातून हवा घालविल्यास त्याचे ऑक्सिडीकरण होऊन सायक्लोहेक्झॅनॉल व सायक्लोहेक्झॅनोन ही संयुगे असलेले मिश्रण तयार होते.
फिनॉलाचे हायड्रोजनीकरण केल्याने (हायड्रोजनाबरोबर संयोग करून) सायक्लोहेक्झॅनॉल मिळते.
उपयोग : ॲडिपिक अम्ल व त्याच्यापासून तयार करण्यात येणारी संयुगे यांचा अनेक उद्योगधंद्यांत उपयोग होतो. ॲडिपिक अम्लापासून हेक्झॅमिथिलीन डायअमाइन H2N–(CH2)6–NH2 हे संयुग बनवितात. त्याचा आणि ॲडिपिक अम्लाचा संयोग होऊन मिळणारे पॉलिअमाइड म्हणजेच नायलॉन [→तंतू, कृत्रिम] हे कृत्रिम तंतुद्रव्य होय. यालाच ‘नायलॉन ६, ६’ असेही म्हणतात. या अम्लाची उच्च श्रेणीची (कार्बन अणुसंख्या जास्त असलेली) एस्टरे ही चांगल्या प्रतीची प्लॅस्टिकीकारके (प्लॅस्टिकची लवचिकता व इतर गुणधर्म सुधारण्यासाठी त्यात मिसळण्यात येणारे पदार्थ) म्हणून उपयुक्त आहेत. बहुवारिक (अनेक रेणू संयोग पावून बनलेल्या) ॲडिपिक ॲनहायड्राइजाचा उपयोग पॉलिव्हिनिल क्लोराइड मजबूत करण्यासाठी होतो. क्रोम कातडे (क्रोमियन लवणे वापरून कमावलेले कातडे) बनविण्यासाठी सोडियम ॲडिपेटाचा उपयोग होतो. कापड छपाईत अमोनियम ॲडिपेट वापरतात. ॲडिपिक अम्ल दीर्घकाल गुठळ्या न होता कोरडे राहते. या गुणामुळे सायट्रिक, टार्टारिक इ. अम्ले ज्यांमध्ये आहेत अशी पूड केलेली मिश्रणे, गुठळ्या न होता चूर्णावस्थेत टिकावी म्हणून त्यांत हे अम्ल मिसळतात. मुरंबे, जेली, फळांसारखी चव असलेली पेये इ. बनविण्याकरिता हे अम्ल वापरतात.
कुलकर्णी, श. भी.