ॲक्सलरॉड, ज्यूल्सस : (३० मे १९१२ – ). अमेरिकन औषधिवैज्ञानिक. १९७० च्या वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते (उल्फ फॉन ऑयलर आणि सर बर्नार्ड काट्झ यांच्याबरोबर विभागून). यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. न्यूयॉर्क येथील सिटी कॉलेज आणि विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर तेथेच १५ वर्षे जीवरसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९४९ मध्ये बेथेस्डा येथील हृद्विकार संस्थेमध्ये त्यांची नेमणूक झाली व १९५५ मध्ये त्यांना तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेच्या औषधिविज्ञानाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. १९५५ मध्ये त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाची पीएच्. डी. संपादन केली. १९४५ च्या सुमारास अमोनियाची बाटली फुटून झालेल्या अपघातात त्यांच्या एका डोळ्यास अंधत्व आले.
यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे तंत्रिका कोशिकांमधून (मज्जातंतूंचे उगमस्थान असलेल्या पेशींमधून) आवेग (संवेदना) गेल्यानंतर त्यांतील नॉर ॲड्रेनॅलीन हा पदार्थ निष्क्रिय कसा होतो, याबद्दलच्या यंत्रणेसंबंधी होय. कॅटेकोल-ओ-मिथिल-ट्रॅन्सफरेझ या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत भाग न घेता ती जलद घडवून आणणाऱ्या पदार्थाच्या) रासायनिक विक्रियेमुळे हे घडून येते, असे त्यांनी सिद्ध केले. या यंत्रणेवर इतर औषधिद्रव्यांचा काय परिणाम होतो, त्याचाही त्यांनी अभ्यास केला त्यामुळे काही मनोविकृती सुसाध्य होण्याचा संभव निर्माण झाला आहे.
ढमढेरे, वा. रा.
“