ॲन्सन, सर विल्यम रेनेल : (१४ नोव्हेंबर १८४३ – ४ जून १९१४). प्रसिद्ध इंग्‍लिश संविधानतज्ञ व विधिवेत्ता. ईटन व ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही दिवस वकिली केली. १८७४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्‍लिश कायद्याचा अधिव्याख्याता म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे स्वतंत्र विधिशाखा सुरू करण्यास त्याचेच प्रयत्‍न प्रामुख्याने कारणीभूत झाले. विद्यापीठाचे कुलगुरुपद व इतरही मानाच्या जागा त्याने भूषविल्या. पार्लमेंटमध्ये ‘युनियनिस्ट’ म्हणून तो १८९९ ला निवडून आला. १९०३ चा प्रख्यात शैक्षणिक कायदा करण्याचे व तो अमलात आणण्याचे श्रेय त्यालाच द्यावे लागेल. ब्रिटिश म्युझियमचा विश्वस्त बनण्याचाही त्यास मान मिळाला. संविधान व कराराच्या कायद्यावरील त्याची पुस्तके आजही प्रमाणभूत मानण्यात येतात.

शाह, र. रू.