ॲनाहीम : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर. लोकसंख्या १,६६,७०१ (१९७०). हे लॉस अँजेल्सच्या आग्नेयेस ४० किमी. सांता आना नदीच्या खोऱ्यात वसले आहे. काही जर्मन वसाहतवाल्यांनी येथे प्रथमच १९५७ मध्ये सहकारी वसाहत स्थापन केली. भूमध्य सामुद्रिक हवामान व सुपीक प्रदेश यांमुळे या शहराची झपाट्याने वाढ झाली. संत्री, मोसंबी, अक्रोड आदी फळांच्या अमाप उत्पादनामुळे येथे फळांवर प्रक्रिया करणे, फळे डबाबंद करणे, पत्र्याचे डबे, तारा, रसायने इत्यादींचे अनेक कारखाने निघाले. १९५५ मध्ये ⇨ वॉल्ट डिझ्नी याने आपल्या ‘डिझ्नीलँड’ ची येथेच स्थापना केली. अतिशय आकर्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणास भेट देण्याकरिता देशोदेशीचे नागरिक येतात.
लिमये, दि. ह.