ॲनॅलसाइमाचे स्फटिक. (१) समलंबफलकाकार, (२) घन घ समलंबफलके यांचा संगोय असलेला स्फटिक

ॲनॅलसाइम : (ॲनॅलासाइट). खनिज. स्फटिक घनीय गटाचे. घनाकार किंवा समलंबफलकाकार स्फटिक किंवा त्यांचे समूह [→ स्फटिकविज्ञान], कणमय किंवा संकेंद्री संरचनेचे पुंजही आढळतात. पाटन : घनीय, तुटक [→ पाटन]. भंजन अर्धशंखाभ. पारदर्शक ते जवळजवळ अपारदर्शक. कठिनता ५-५·५०. वि.गु. २·२२-२·२९. चमक काचेसारखी. रंगहीन किंवा कधीकधी हिरव्या, करड्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे. रा. सं. NaAlSi2O6·H2O [→ खनिजविज्ञान]. हे भाजल्यावर फुगते व त्यातील पाणी निघून जाते. ॲनॅलसाइम सामान्यत: द्वितीयक (मूळ निक्षेप तयार झाल्यानंतरच्या) प्रक्रियांनी तयार झालेले असते व ते अग्निज, विशेषत: ज्वालामुखी खडकांतील पोकळ्यांत आढळते. डिओलाइट गटातील इतर खनिजे व कॅल्साइट हीही त्याच्या जोडीने सामान्यत: असतात. बरेच अल्कली असणाऱ्या ॲनॅलसाइम-बेसाल्टासारख्या खडकांच्या आधारकाचा (ज्यात मोठे स्फटिक रुतलेले असतात त्या खडकाच्या भागाचा) एक घटक म्हणूनही ते आढळते व ते प्राथमिक (मूळचे) असावे असे दिसते. बराचसा सोडा व बाष्प असलेल्या शिलारसांच्या सरळ स्फटिकीभवनाने ते तयार झाले असावे.

ठाकूर, अ. ना.