अप्साला : स्वीडनचे प्रमुख सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या १,३०,०९७ (१९७१). हे फ्यूफ्सान नदीवर, स्टॉकहोमच्या वायव्येस ६६ किमी. आहे. अस्ट्रा आरॉस हे याचे प्राचीन नाव. येथून ३·२ किमी. वर असलेले गाम्ला अप्साला (जुने अप्साला) हे सहाव्या शतकापासून राजधानीचे शहर होते. अप्साला येथे ११६४ पासून आर्चबिशपचे पीठ होते. स्वीडनमधील सर्वांत मोठे गॉथिक कॅथीड्रल येथे १२८७ ते १४३५ यांदरम्यान बांधले गेले. कॅथीड्रलमध्ये थोर गस्तेव्हस, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वनस्पतिशास्त्रज्ञ लिनीअस, धर्मवेत्ता व शास्त्रज्ञ स्वीड्‌नबॉर्ग आदींची थडगी आहेत. ल्यूथरन धर्मपंथाचे प्रमुख केंद्र याच शहरी काढण्यात आले. १४७७ मध्ये येथे अप्साला विद्यापीठाची स्थापना झाली. जगातील नामांकित विद्यापीठांत याची गणन होते. विद्यापीठातील ग्रंथालय समृध्द असून त्यात दहा लाख ग्रंथ व वीस हजार दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. सोळाव्या शतकात गस्तेव्हस वासाने बांधलेला किल्ला, आर्चबिशपचा बरोक शैलीचा राजवाडा, लिनीअस वनस्पति-उद्यान व इतर संग्रहालये, वेधशाळा इ. प्रेक्षणीय स्थळे शहरात आहेत. येथे सायकली,पियानो व विविध धातुकामाचे कारखाने असून ग्रंथ-प्रकाशन हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. हे एक महत्त्वाचे लष्करी केंद्र असून येथे सैनिकी शाळा आहेत. याशिवाय शहरात शेती, गृहशास्त्र, कला इत्यादींच्या शिक्षणसंस्था आहेत.

ओक, द.ह.