अश्वमेध : राजाने करावयाचा एक सोमयाग. वैदिक काळात राजे पुत्रप्राप्तीसाठी व सर्वकामनांच्या पूर्तीसाठी, तसेच नंतरच्या काळातील राजे विश्वदिग्विजयाने चक्रवर्तिपद मिळवण्यासाठी हा याग करीत. अश्वमेधाचा घोडा एक वा अनेक रक्षकांसह चारी दिशांना फिरवीत. अश्वमेधासाठी श्यामकर्ण घोडा लागतो. त्याच्या पांढऱ्या वर्णावर काळे ठिपके असावे लागतात. इतर राजांनी त्याला आडकाठी न करता यज्ञ करणाऱ्याच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली व एक वर्षात घोडा परत आला, तरच सार्वभौम-चक्रवर्तित्व-प्राप्तीच्या आनंदाने अश्वमेध होई. घोडा अडविला गेला असता तो अडविणारांना एक वर्षात पराभूत केले नाही, तर हा यज्ञ रद्द होत असे. यजुर्वेद, महाभारत वजैमिनि-अश्वमेध या ग्रंथांतील
अश्वमेधविधि-प्रक्रियांत बरीच तफावत आढळते. यज्ञाचा आरंभ फाल्गुन शु. ८ किंवा ९ ला होतो. चैत्र शु. १५ ला आरंभ, असाही एक पक्ष आहे. यज्ञात घोड्यासह अनेक पशूंना मारण्यात येते. पशूंचे ग्राम्य (पाळीव) व आरण्यक (रानातले) असे दोन वर्ग पडतात. आरण्यक पशूंना मारीत नाहीत, तर त्यांच्यावर काही संस्कार करून त्यांना सोडून देण्यात येते. अश्व व ग्राम्य पशूंना मारून त्यांच्या अंगांचा होम असतो. मारलेल्या अश्वाच्या व यजमानपत्नीच्या जननेंद्रियांचा संबंध या यज्ञात विहित आहे. शंभर अश्वमेध केल्याने इंद्रपद प्राप्त होते, अशी समजूत होती. कलियुगात हा यज्ञ वर्ज्य सांगितला आहे.
पहा : यज्ञसंस्था.
केळकर, गोविंदशास्त्री