अशोक—२ : (इ.स.पू. ? ३०३—? २३२). विश्वविख्यात प्राचीन सम्राट. मगघातील पाटलिपुत्र येथे राज्य करणाऱ्या ⇨ मौर्यवंशातील हा तिसरा राजा. याची बाळपणची माहिती मिळत नाही. त्याचे वडील बिंदुसार याच्या राजवटीत अशोक प्रथम तक्षशिला आणि नंतर उज्जयिनी येथे राजप्रतिनिधी म्हणून काम करीत होता. हा बिंदुसाराचा ज्येष्ठपुत्र नसला, तरी त्याचीच युवराजपदावर नेमणूक झाली. इ.स.पू. २७३ मध्ये बिंदुसाराच्या मृत्यूनंतर सुसीम ह्या आपल्या वडील भावावर कुरघोडी करून त्याने राजपद मिळविले. हा भ्रातृकलह पुढेही तीन-चार वर्षे चालला असावा. कारण त्याने प्रत्यक्षात इ.स.पू. २६९ मध्ये राज्यारोहण केलेले दिसते. वाङ्मयीन पुराव्यांवरून असे दिसते, की अशोकाला राजपद सहजासहजी प्राप्त झाले नसावे. त्यासाठी त्याने आपल्या बऱ्याच भावांना मारले असावे. महावंसात असे म्हटले आहे, की “बिंदुसाराला १६ राण्यांपासून १०१ मुलगे झाले. त्यांत अशोक पराक्रमी व लढाऊ वृत्तीचा होता. हाती सत्ता आल्यानंतर त्याने आपल्या ‘तिस्स’ नावाच्या सावत्र भावाला काही काळ युवराजपदावर नेमले. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी तो ‘चण्डाशोक’ किंवा ‘दुष्टाशोक’ या नावाने ओळखला जाई, मात्र त्यानंतर ‘धर्माशोक’ किंवा ‘सद्गुणी अशोक’ या नावाने ओळखला जात असे.” सीलोनी वृत्तांत अतिशयोक्तिपूर्ण असले, तरी संपूर्णपणे त्याज्य ठरविता येणार नाहीत.
कलिंगावरील स्वारी व तिचे परिणाम: कलिंगावर सु. इ.स.पू. २६१ मध्ये केलेल्या अशोकाच्या एकमेव स्वारीचे कारण आणि स्वरूप अज्ञात आहे. तथापि शहबाझगढीच्या शिलालेखात कलिंग देशाचा उल्लेख “अद्यापि न जिंकलेला प्रदेश” असा केला आहे त्यावरून आशोकाने प्रदेशविस्तारासाठीच कलिंगावर सरळ आक्रमण केले असावे, असे दिसते. पण युद्धातील अपरिमित प्राणहानीमुळे त्यास पश्चाताप झाला आणि तो बौद्ध धर्माकडे आकर्षित झाला. त्यास राज्यविस्ताराचे कार्य किती दुष्ट स्वरूपाचे असते आणि नैतिक व आध्यात्मिक विजय किती उदात्त असतो हे समजून आले व येथून त्याचे सर्व अंतर्गत व परराष्ट्रीय राजकारण धर्माधिष्ठित व शांतिप्रवण झाले. या युद्धामुळे कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला व बिंबिसार आणि अजातशत्रू यांनी आरंभिलेले राजकीय एकसंधीकरण पूर्ण झाले. अशोककाळी भारताचे जेवढे राजकीय एकी- करण झाले तेवढे त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या नंतर कोणत्याही हिंदू सम्राटाच्या काळी झालेले दिसत नाही.
कलिंग-विजयानंतर सु. इ.स.पू. २६१ मध्ये अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, मात्र ती दीक्षा उपासकाची (गृहस्थाश्रमी बौद्धाची) होती. अडीच वर्षांनंतर तो संघात म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या वर्गात सामील झाला, असे त्याच्या रूपनाथ येथील शिलालेखावरून स्पष्ट दिसते. यानंतर तो धर्मप्रचाराचा उद्योग झटून करू लागला. त्याने प्रथम आपल्या राज्यातील शिकार बंद करून टाकली. केवळ चैनीसाठी दौरे काढणे थांबविले.
धर्म प्रचाराच्या कार्यास चालना देण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी त्याने इ.स.पू. २५६ मध्ये खास अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. स्वत: तो बौद्ध तीर्थांच्या यात्रा करू लागला. प्रथम त्याने नेपाळच्या तराई प्रांतातील बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या कपिलवस्तूजवळच्या लुम्बिनी बागेचे दर्शन घेतले. त्याचा गुरू आचार्य उपगुप्त हाही या वेळी त्याच्या बरोबर होता. नंतर क्रमाक्रमाने त्याने कपिलवस्तू, गया, सारनाथ, कुशिनगर,श्रावस्ती अशा तीर्थस्थानांना भेटी दिल्या.
राज्यविस्तार : बिंदुसार आणि अशोक ह्यांचे तत्कालीन ग्रीक सत्ताधीशांबरोबर मैत्रीचे संबंध होते. ⇨चंद्रगुप्त आणि सील्यूकस निकेटर यांमधील तहान्वये ठरलेली वायव्येकडची सरहद्द अशोकाच्या काळीही अबाधित राहिली. ज्या शिलालेखांद्वारे अशोकाने आपल्या प्रजेस आज्ञा दिल्या ते भारताच्या निरनिराळ्या दूरदूरच्या भागांत बसविण्यात आलेले दिसतात. ते कसे विखुरलेले आहेत,ह्याची स्थूल कल्पना पुढील तपशिलावरून येईल. शिलालेखाचे सध्याचे भौगोलिक स्थान (देश व प्रदेश) प्रथम देऊन नंतर त्यांचे प्राचीन (मूळ) नाव दिले आहे. नेपाळ—रुक्मिणीदेई (वी ) पश्चिम पाकिस्तान—शहबाझगढी, मानसेहरा व तक्षशिला पूर्व अफगाणिस्तान—लंपाक व जलालाबाद दक्षिण अफगाणिस्तान—शहर-इ-कून भारत—आंध्र प्रदेश : एरागुडी (यर्रगुडि) उत्तर प्रदेश : काल्सी, मीरत (दिल्ली),कौशांबी (अलाहाबाद) व निग्लीवा ओरिसा : धौली (कलिंगलेख) व जौगढ (कलिंगलेख) गुजरात : गिरनार बिहार गया, पश्चिम बंगाल लौडिया-अरराज, लौडिया-नंदनगढ, रामपुर्वा, बाखिरा व ससाराम मध्यप्रदेश : सांची, सारनाथ व रूपनाथ महाराष्ट्र : सोपारा व देवटक म्हैसूर राज्य : मस्की, सिद्धपूर, जटिंग-रामेश्वर, ब्रह्मगिरी, गविमथ (गाविमठ) व पाल्किगुंडू राजस्थान : बैरात (ट) व भाब्रू हरियाणा : तोप्रा (दिल्ली).
ह्यावरून असे स्पष्ट होते, की अशोकाचे राज्य आजच्या भारत, प. पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान इ. प्रमुख देशांवर होते. तथापि त्यात दक्षिण भारतातील केरळपुत्र (चेर), चोल, पांड्य आणि ताम्रपर्णी (श्रीलंका) ह्या राज्यांचा समावेश नव्हता. पश्चिमेकडील दुसरा अँटायओकस (अंतियोक) ह्या ग्रीक नृपतीवरही त्याची अधिसत्ता नव्हती, हे गिरनार येथील गिरिलेखावरून स्पष्ट होते. ह्युएनत्संगच्या प्रवासवर्णनात आणि कल्हण- च्या राजतरंगिणीत अशोकाने काश्मीरात आणि नेपाळच्या तराईभागात सार्वजनिक हिताची विविध कृत्ये केल्याचे उल्लेख सापडतात. त्यांवरून हेही भाग त्याच्या साम्राज्यात असावेत असे दिसते. अशोकाच्या काळी चितळद्रुग जिल्हा ही मौर्य साम्राज्याची दक्षिणेकडील सीमा असावी. मुंबईजवळचे सोपारा आणि काठेवाडा- तील गिरनार येथील शिलालेखांवरून पश्चिम भारतावर अशोकाची अधिसत्ता असल्याचे दिसून येते. गिरनार येथील शिलालेखात अशोकाच्या वतीने तुषास्फ ह्या अधिकाऱ्याने सुदर्शन सरोवर पूर्ण केल्याचा उल्लेख पहिल्या रुद्रदामनने केला आहे. अशोकाच्या स्वामित्वाखालील मौर्यांचे एकूण साम्राज्य ब्रिटिशांकित हिंदुस्थानपेक्षा आणि तिसऱ्या शतकातील रोमन साम्राज्यापेक्षाही विस्तृत होते, हे स्पष्ट होते.
धार्मिक धोरण: प्रारंभी अशोक बौद्धधर्मीय नव्हता. महावंसात आणि गिरनार व शहबाझगढी येथील कोरीव लेखांतून अशोकाच्या जीवनाविषयी जी माहिती मिळते तीवरून सुरुवातीस तो सनातन आर्यधर्माचाच अनुयायी असावा असे दिसते. त्याने जैन व आजीविक ह्यांनाही आश्रय दिला होता, असे काही शिलालेखांतून आढळते. शिवाय कल्हण आणि अबुलफज्ल यांच्या मतांनुसार त्याने काश्मीरमध्ये जैन धर्म पसरविला होता. ह्यामुळे काही काळ तो जिनानुयायी असावा असे काही विद्वानांचे मत आहे. काही विद्वानांना तो बौद्धधर्मीय होता हे मतच मान्य नाही तर काहींच्या मते तो स्वतः बौद्ध असूनही इतर धर्मांबद्दल त्याच्या मनात आदरभाव होता. अनेकांचे मत असे आहे की, अशोक बौद्धधर्मीयच होता आणि त्याचा धर्म सामान्यांसाठी होता. काही विद्वान त्यास भिक्षू म्हणतात तर इतर त्याचे वर्णन उपासक म्हणून करतात. त्याचा धर्म हा एक विश्वव्यापक मानवधर्म होता असेही एक मत प्रचलित आहे. पण सर्वांत ग्राह्य मत असे दिसते, की तो बौद्ध उपासक झाला आणि सांमान्यांसाठी त्याने आपल्या नीतिधर्माची उभारणी केली. काही शिलालेखांतून तो उपासक आणि शाक्य-उपासक बनला असे शब्दप्रयोग आढळतात. अशोकाने संघात प्रवेश केला होता किंवा काय, हे शंकास्पद आहे तथापि भाब्रू येथील शिलालेखात त्याची बौद्धसंघावरील श्रद्धा व्यक्त झालेली आहे. सदर शिलालेखातच बौद्ध धर्माला ‘सद्धर्म’ म्हटले आहे. बौद्धसंघ संघटित, मजबूत व चिरस्थायी कसा होईल ह्याविषयीच्या उपाययोजना रूपनाथ व मस्की येथील लघू गिरिलेखांत सांगितलेल्या आहेत. राज्यारोहणा-
नंतर दहा वर्षानी त्याने गया येथील बोधिवृक्षास आणि वीस वर्षांनी बुद्धाच्या जन्मस्थानास भेट दिली व बुद्धाच्या जन्मस्थानाच्या जमिनीचा सारा त्याने निम्मा केला. गिरनार व काल्सी येथील गिरिलेखांत अशोकाने काही पुरातन धार्मिक विधी किती निरर्थक आहेत हे सांगून यज्ञातील पशुहत्येस मनाई केली.
मातापित्यांची सेवा, अहिंसापालन, सत्यप्रेम, आचार्यांविषयी आदरभाव व सर्व प्राणिमात्रांबद्दल दया व प्रेम, ही अशोकाने धर्माची सर्वसाधरण रूपरेषा देऊन संयम, न्यायीपणा, दयाळूपणा, चिकाटी, सहनशीलता आणि क्रियाशीलता ह्यांवरही भर दिला आहे. गिरनार येथील एका शिलालेखात राजाच्या कर्तव्यांचे दिग्दर्शन आहे. त्यावरून अशोकाने अधिकृतपणे जी आचारसंहिता सांगितली तिचे स्वतःही सर्वतोपरी पालन करण्या- विषयीचा त्याचा कटाक्ष दिसतो. प्रजेच्या कल्याणार्थ तो अविश्रांत झटत असे. आपल्या पाकगृहातील पशु- हत्येचे प्रमाण त्याने कमी केले, शिकार खेळणे बंद केले आणि शेवटी शेवटी मांसाहारही बंद केला. पशुयज्ञ थांबविण्यात आले चैनीच्या विविध प्रकारांवर नियंत्रण घालण्यात आले. जनावरांसाठी रुग्णालये स्थापण्यात आली. ठिकठिकाणी विहिरी खोदून आणि रस्त्यांच्या बाजूंना झाडे लावून प्रवास सुखकर करण्यात आला. रामपुर्वा येथील स्तंभशिलालेखात वडाची झाडे आणि आंब्यांच्या राया लावल्याचा, विहिरी खोदल्याचा, विश्रांतिगृहे (धर्मशाळा) आणि पाणपोया घातल्याचा उल्लेख असून आपल्या अशा सत्कृत्यांचे मानवजात अनुकरण करील अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. अशोकाने भारत व भारतेतर देशांत बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून खास अधिकारी नेमले. देशातील निवडक ठिकाणी त्याने शिलालेखांवर आपल्या धर्मासंबंधीची वचने कोरविली. आपल्या राज्यातील अनेक शहरांतून त्याने शेकडो मठांची स्थापना केलेली होती. महावंसात तर त्याने ८४,००० स्तूप वा विहार बांधल्याचा उल्लेख आहे. इ.स.पू. २४० च्या सुमारास बौद्धसंघाला बळकटी आणण्यासाठी आणि बौद्ध धर्माचा प्रचार अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्याने एक बौद्ध परिषद मोगलीपुत्त तिस्स या बौद्धभिक्षूच्या अध्यक्षतेखाली पाटलिपुत्र येथे बोलाविली हीच तिसरी बौद्ध परिषद होय. ह्या परिषदेने बौद्ध पथके धर्मप्रचारासाठी श्रीलंका, ब्रह्मदेश (सुवण्णभूमी ), सिरिया, ग्रीस (यवनभूमी ), मॅसेडोनिया, एपायीरस ह्या देशांत धाडली एवढेच नव्हे, तर पूर्व यूरोपातही त्याने धर्मप्रचारक पाठविले असण्याची शक्यता आहे. तिस्सच्या विनंतीवरून अशोकाने महेंद्राच्या नेतृत्वाखाली धर्मप्रचारकांचे एक पथक श्रीलंकेमध्ये धाडले. वरील परिषदेच्या स्वरूपाबाबत विद्वानांत मतैक्य नाही. काहींच्या मते वरील तिसरी बौद्ध परिषद ही अखिल बौद्धधर्मीय परिषद नसून केवळ थेरवाद्यांचा मेळावा होता. अशोक ब्राह्मण, जैन व आजीविक यांनाही दाने देत असे.
राज्यव्यवस्था: अशोकाने पूर्वापार चालत आलेल्या राज्यकारभारपद्धतीत अत्यंत आवश्यक तेवढेच बदल केले. कलिंग जिंकल्यावर तोशलीच्या राजप्रतिनिधीचे पद त्यास निर्माण करावे लागले. त्याचप्रमाणे त्याने धर्ममहामात्र व धर्मयुक्त हे पदाधिकारी खास धर्मप्रचारार्थ निर्माण केले. आपल्या प्रजेची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती ही अशोकाची प्रमुख उद्दिष्टे होती आणि या कार्यात त्याने नेमलेले कुशल व प्रामाणिक अधिकारी त्याला मदत करीत. तो आपल्या शिलालेखांत म्हणतो, “माझे वरिष्ठ,कनिष्ठ आणि मध्यम दर्जाचे हस्तक स्वत: माझी शिकवण आचरणात आणून चंचल मनाचे लोक आणि त्याचप्रमाणे सीमेवरील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करतात.” कलिंग येथील शिलालेखात “सारी माणसे मला मुलांसारखी आहेत आणि साऱ्याच माणसांनी माझ्या मुलांप्रमाणेच इहपरलोकीची सर्व सुखसमृद्धी उपभोगावी ”, असे अशोक इच्छितो.
योग्यता : अशोक हा एक महान ध्येय बाळगणारा आणि ते साधण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा राजा होता. त्याने बौद्ध धर्माला दिलेला आश्रय स्वार्थप्रेरित नव्हता. भारतात आणि भारताबाहेर त्याने निष्ठेने केलेले प्रचारकार्य हे एक साहस होते. धर्मप्रचारासाठी आणि लोकशिक्षणासाठी त्याने केलेली शिलालेखांची योजना ही एक मौलिक कल्पना होती. त्यास साम्राज्याची तृष्णा नव्हती. परंतु स्वतःचे सम्राटपद त्याने कधीही सोडले नाही. कलिंगयुद्धानंतर त्याने आपले राजकीय धोरण बदलले परंतु कलिंगवरचा ताबा कायम ठेवला. तथापि कलिंगयुद्धानंतर अशोकाने अनाक्रमणाचे तत्त्व स्वीकारले आणि अखेरपर्यंत ते अवलंबिले. सर्वांचे कल्याण करणे हे ध्येय ठेवून राज्ययंत्रणा त्यासाठीच वापरावयाची, असे उद्दिष्ट ठेवून त्याने त्या ध्येयाचा आयुष्यभर पाठपुरावा केला. परंतु त्याच्या पश्चात त्याच्या ध्येयाचे त्याच्या वारसांपैकी कोणीही स्मरण ठेवले नाही. अशोक इ.स.पू. २३२ च्या सुमारास निधन पावला. अशोकाच्या अनेक शिलालेखांतून त्याच्या राण्या व मुले यांचे उल्लेख आहेत तथापि सर्व तपशील उपलब्ध नाहीत. त्याचा कुणाल म्हणून एक मुलगा राजप्रतिनिधी असल्याचा उल्लेखदिव्यावदान ह्या बौद्ध ग्रंथात आहे. त्याशिवाय त्यास महेंद्र व तीवर नावाचे दोन मुलगे होते. तीवर हा त्याच्या कारुवाकी नावाच्या दुसऱ्या राणीचा मुलगा. ह्यांचे उल्लेख लघुस्तंभ-लेखांतून आहेत. वाङ्मयीन पुराव्यांत त्यास चार राण्या असल्याचा उल्लेख असून शाक्यकुमारी ही त्याची पट्टराणी होती. तिच्यापासून त्यास महेंद्र व संघमित्रा ही दोन अपत्ये झाली. ह्या दोघांना अशोकाने बौद्धधर्मपथकातून श्रीलंकेला धाडले होते. महेंद्र हा अशोकाचा भाऊ असावा,असेही काही वाङ्मयीन पुरावे आढळतात. भारता- च्याच नव्हे तर मानवजातीच्या इतिहासात अशोक हे अमर नाव आहे. “इतिहासग्रंथांच्या पानापानांवरून गर्दी करून राहिलेल्या हजारो–लाखो राजेमहाराजांची नावे काळ पुसून टाकील,परंतु अशोकाचे ध्रुवपद कधीच ढळणार नाही.” हे एच्. जी. वेल्स या इंग्रज इतिहासकाराचे त्याच्याविषयीचे उद्गार सार्थच आहेत.
पहा : मौर्यकाल.
संदर्भ : 1. Majmudar, R. C. Pusalkar, A. D. Ed. The Age of the Imperial Unity, Vol. II, Bombay, 1960.
2. Mookerji, R. K. Ashok,Delhi, 1962.
3. Sircar, D. C. Inscriptions of Ashok, Delhi, 1957.
4. Smith, V. A. Asoka, Delhi, 1957.
5. Thapar, Romila, Ashok and the Decline of the Mauryas, Oxford, 1961.
६. आपटे, वा. गो. सम्राज अशोक,पुणे, १९६४.
केनी, लि. भा.