अवेस्ता : पारशी धर्मग्रंथ आणि तो ज्या भाषेत लिहिला आहे ती भाषा यांना अनुलक्षून ‘अवेस्ता’ ही संज्ञा वापरली आहे.
अवेस्ता भाषा : प्राचीन इराणची ही भाषा, आर्यभाषासमूहातील एक भाषा होय. या भाषेच्या व्याकरणाचे संस्कृत भाषेच्या व्याकरणाशी, शब्दसंपदा, शुद्धलेखनपद्धती व वर्णोच्चार या बाबतींत अतिशय साम्य आहे.
संस्कृतप्रमाणेच अवेस्ता भाषेत मूळ धातूचे दहा गण कल्पिले असून ते धातू आत्मने व परत्मै पदांत चालतात. संस्कृतप्रमाणेच स्वरान्त व व्यंजनान्त नामे व सर्वनामे सर्व विभक्तींत, तिन्ही वचनांत व तिन्ही लिंगांत चालवली जातात. अवेस्ता ग्रंथाच्या लिपीस ‘अवेस्ता लिपी’ असेच म्हणतात व ही लिपी सेमिटिकप्रमाणे उवजीकडून डावीकडे लिहिली जाते. समान राजघराण्याच्या अमदानीत प्रचलित असलेल्या पेहलवी भाषेच्या लिपीतून अवेस्ता लिपीचा विकास झाला असून ⇨ॲरेमाइक लिपी ह्या दोन्ही लिप्यांच्या उगमस्थानी आहे, असे तज्ञ समजतात.
अवेस्ता लिपीत ध्वनिचिन्हे पुष्कळ आहेत, पण एकंदर ध्वनिपद्धती स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :
स्वर: अ, आ, इ, उ, ए, ओ (ऱ्हस्व)
अः, आः, इः, उः, एः, ओः (दीर्घ)
व्यंजने: क, ख़, ग, घ़, ङ (कंठ्य)
च, ज, ञ (तालव्य)
त, थ़, द, ध़, न (दंत्य)
प, फ़, ब, व़, म (ओष्ठ्य)
य, व (अर्धस्वर)
र (कंपक)
स, झ (दंत्य ऊष्म)
श, भ्फ (तालव्य-ऊष्म)
ह. (महाप्राण)
खुलासा : (१) ऋ, लृ नाहीत. ऋच्या जागी अर्, अर्अ असे लेखन आढळते. वरील तक्त्यात स्वरापुढे दिलेले विसर्गचिन्ह दीर्घत्व दाखवते. याशिवाय आःइ, आःउ, आएः, आओ, ओः इत्यादी. संयुक्त स्वरही आहेत. (२) मूर्धन्य व्यंजनांचा वर्ग नाही. (३) घर्षक व्यंजने नुक्ता देऊन दाखविली आहेत. (४) झ व भ्फ हे स व श यांचे मिळते सघोष घर्षक आहेत. (५) ल नाही. (६) विसर्ग नाही. (७) या भाषेत गुण व वृद्धी होऊन केवळ स्वरांपासून संयुक्त स्वर मिळतात.
बारीकसारीक फरक दृष्टीआड करून नाम, आख्यात, उपसर्ग व निपात या व्याकरणाच्या चतुर्विध अंगांकडे व तदनुषंगिक प्रत्यंगांकडे लक्ष दिल्यास संस्कृत व अवेस्ता या दोन भाषांतील विलक्षण साम्य दिसून येते आणि या दोन भाषांचे मूळ एकच असले पाहिजे हे पटते.
अवेस्तामधील खालील मंत्रावरून हे साम्य दिसून येईल :
देवनागरी लिप्यंतर : यो यओम् कारयेइति हो : अषॅम् कारयेइति—वेंदिदाद—३३१
संस्कृत : योः यवं किरति सो ऋतं किरति।
मराठी भाषांतर : जो धान्य पेरतो तो ऋत पेरतो.
कालेलकर, ना. गो.
अवेस्ता धर्मग्रंथ : अवेस्ता या धर्मग्रंथात जरथुश्त्राने प्रवर्तित केलेल्या धर्माची तत्त्वे व तदनुषंगिक विषय यांचे निरूपण आहे. जरथुश्त्राच्या काळाविषयी मतभिन्नता असली, तरी इराणी परंपरेनुसार अवेस्ताची रचना इ.स.पू. ५५८ ते ३०० या अकमेनियन काळात आली असावी. ‘झंद ’ किंवा ‘झेंद’ म्हणजे मूळ ग्रंथावरील पेहलवी भाषेतील विवरण किंवा भाष्य. सतराव्या शतकाच्या शेवटी झेंद अवेस्ता ही संज्ञा पाश्चात्त्य अभ्यासकां- नी रूढ केली. जरथुश्त्राच्या वचनांना ‘गाथा ’ म्हणतात. अवेस्तातील गाथा प्राचीनतम व महत्त्वाच्या असल्याने गाथा ही संज्ञाही पुष्कळदा त्यास दिली जाते.
जरथुश्त्राच्या वचनांची श्लोकसंख्या वीस लक्ष असावी, असे प्लिनी (इ.स. २३–७९) या रोमन ज्ञान- कोशकाराने म्हटले आहे. अवेस्ता साहित्य बारा हजार चर्मपत्रांवर लिहिलेले होते, असे वर्णन अल्-तबरी (इ.स. ?–९२३) या अरबी इतिहासकाराने केले आहे.
ग्रीक व मुसलमान यांच्या अनेक स्वाऱ्यांमुळे पुष्कळसे अवेस्ता साहित्य नष्ट झाले. विद्यमान अवेस्ता साहित्य वेळोवेळी संकलित केलेले असून त्याची शब्दसंख्या ८३,००० आहे. मूळ अवेस्ता धर्मग्रंथ (‘नस्क’) २१ असून, त्यात प्रत्येकी सात धर्मग्रंथांचे तीन विभाग होते. पहिल्या ‘गाथा ’ विभागात पवित्र जरथुश्त्राची धर्मसूत्रे होती. दुसऱ्या ‘दातिक’ विभागात अवेस्ता कायद्याचे विवेचन होते. तिसरा ‘हधमांथ्रिक ’ विभाग संकीर्ण विषयांना वाहिलेला होतो. इ. स. तिसऱ्या शतकापर्यंत हे धर्मसाहित्य अस्तित्वात असावे. ‘ दिन्कर्द’ या नावाच्या विस्तृत पेहलवी ग्रंथात दोन ग्रंथ (नस्क) सोडून बाकी १९ ग्रंथांचे संक्षिप्त वर्णन आढळते. उपर्युक्त प्राचीस धर्मग्रंथ आज उपलब्ध नाहीत. सर्वांत जुन्या पाच गाथांचा रचनाकाळ ऋग्वेदसंहितेइतकाच आहे, असे काही विद्वानांचे मत आहे.
अवेस्ता धर्मसाहित्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :
(१)यस्न : यस्न म्हणजे यज्ञ, यजन किंवा पूजा. हा विभाग सर्वांत प्राचीन असून, त्यात ७२ अध्याय म्हणजे ‘हा ’ आहेत. त्यात यज्ञविधी, उपासनापद्धती व गूह्य-संस्कार यांविषयी मंत्र व निरूपण असून देवतांची स्तोत्रेही आहेत. जरथुश्त्राच्या पाच गाथांचाही त्यात समावेश होतो. त्या गाथांची ओजस्वी शैली उल्लेखनीय आहे.
(२) विस्परत : विस्परत म्हणजे विभूती किंवा थोर पुरुष. या विभागात २३ अध्याय म्हणजे ‘कर्त’ आहेत. यातील स्तोत्रे यस्नातील मंत्रांबरोबर पठण केली जातात. काही उच्च नीतितत्त्वांचे निरूपणही या विभागात आढळते.
(३)यश्त : बावीस सूक्तांच्या या विभागातील ‘मिथ्र’ किंवा ‘मेहेर’ व जलदेवता (आवाँ किंवा अरदीसूर अनाहित) यासंबंधीची सूक्ते प्रदीर्घ आहेत. ‘ फरवर्दिन यश्त’ हा विभूतींच्या स्मृतिचिंतनाला वाहिलेला आहे. ‘जमियाद यश्ता’त प्राचीन इराणमधील पर्वतांची व राजेलोकांची वर्णने आहेत. पुराणकथांच्या दृष्टीने या विभागाला महत्त्व आहे. अवेस्ताधर्मियांचा नीतिविषयक दृष्टिकोनही त्यावरून समजतो. छंदोबद्ध स्वरूपातील सूक्तरचनेत बरेच काव्यगुणही आढळतात.
(४)वेंदिदाद : वेंदिदाद हे अवेस्ता भाषेतील ‘वी-दएवोदात’ या शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे. संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा एकमेव विभाग होय. यात २२ अध्याय म्हणजे ‘फ्रकर्त’ आहेत. असुरी शक्तीचे दमन, कृषिकर्म, प्रेतसंस्कार, रजस्वला स्त्रियांचा आचार व अन्य विषयांसंबंधीचे विधिनिषेध यांसंबंधी या विभागात निरूपण आहे. पहिल्या अध्यायात हिंदुस्थानसह सोळा देशांचे भौगोलिक वर्णन आढळते. जरथुश्त्र व अहुर मज्द यांतील प्रश्नोत्तररूपी गद्यसंवादही यात आहे.
(५)खोर्दाह अवेस्ता : प्राचीन अवेस्ता धर्मसाहित्यातून कुटुंबीय लोकांसाठी संकलित केलेल्या वेच्यांचा हा लघुसंग्रह आहे. सूर्य, चंद्र, जल, अग्नी, मिथ्र इ. देवतांची स्तोत्रे या संग्रहात आढळतात. त्यांस ‘न्याइश’(निघाइश्त) म्हणतात. पारशी लोक या स्तोत्रांचे नित्य किंवा नैमित्तिक पठण करतात.
उपर्युक्त साहित्याखेरीज ‘निरंणिस्तान’सारखी अन्य स्फुट प्रकरणेही उपलब्ध आहेत. पेहलवी भाषेतही अवेस्ता धर्मग्रंथ आढळतात. या सर्व धार्मिक साहित्यावरून प्राचीन इराणमधील संस्कृतीचा बोध होऊ शकतो. या साहित्याने प्राचीन आर्यपरंपरांचे जतन केल्याचे दिसून येते.
सनातन व शाश्वत वस्तूचा निर्देश करणारऱ्या वैदिक ‘ऋत’ कल्पनेत जो व्यापक अर्थ आहे, तो अवेस्ता – तील ‘अष’ कल्पनेत आहे. ऋत-ॲरॅत-अर्त-ॲरॅश्-अर्ष-अष, अशा प्रकारे ‘ऋत’ शब्दापासून ‘अष’ शब्द व्युत्पादिता येतो.‘अष’ कल्पनेवरच अवेस्तातील आध्यात्मिक, उपासनात्मक, नैतिक व सामाजिक विचार अधिष्ठित आहे. ‘अहुन-वर्श्य’ या मंत्रात अष जीवनाचा शिकवण आहे. अहुर मज्दाने जरथुश्त्रास हा मंत्र दिला.
ज्या वेळी प्रस्तुत मंत्र जरथुश्त्र मानवजातीस प्रदान करतो, त्या वेळी अवस्तात आथ्रव, रथएश्ता, वास्त्र्यो-फषुयाँस् व हूइतिश् अशा चार वर्गांचा एक उल्लेख येतो (यस्न १९—१७). तथापि अवेस्तात इतरत्र मात्र फक्त पहिल्या तीन वर्गांचाच उल्लेख आढळतो. कारण तिसऱ्याच वर्गात चौथा वर्ग समाविष्ट आहे.
‘हुमत’ (सद्विचार), ‘हूख्त’ (सदुक्ती) व ‘ह्वर्श्त’ (सत्कृती) ही अवेस्ताप्रणीत नैतिक जीवनाची त्रिसूत्री होय. पारश्यांच्या नवजोत या व अन्य संस्कारांत तसेच नित्य प्रार्थनेत या त्रिसूत्रीची प्रतिज्ञा (यस्न १२–८) अनिवार्य मानली जाते.
अवेस्तामधील ‘दरुण’, ‘गाहंबार’ व ‘यजिश्न’ या क्रियाकांडकलापांची तुलना वेदांतील ‘दशपूर्णमास’,‘चातुर्मास्येष्टी’ व ‘अग्निष्टोम’ (सोमयाग) यांच्याशी स्थूलमानाने करता येईल. ‘यजिश्न’ हा यज्ञप्रकार अग्निष्टोमासारखा मोठा नाही, पण दोहोंतही सोमास प्राधान्य आहे. सोम वनस्पतीस अवेस्तात ‘हओम’ अशी संज्ञा आहे. ‘यजिश्न’ यज्ञात पार्शी लोक इराणमधून आणलेली हओम वनस्पती कुटून तिचा रस नऊ छिद्रांच्या गाळणीतून गाळतात. या क्रियेत जीवनविकासाशी संबंधित असा आध्यात्मिक संकेत आहे.
विश्वातील नियामक शक्तींची देवतारूपांनी उपासना करून जीवनसमृद्धी साधण्याची आकांक्षा अवेस्ता – तील विविध सूक्तांत व्यक्त झाली आहे. मिथ्र, आवाँ किंवा अरद्वीसूर अनाहित, बघ, वयु, हओम व वॅरॅथ्रघ्न यासारख्या अवेस्तातील देवतांचे साम्य मित्र, अप्, भग, वायू, सोम व वृत्रघ्न या वैदिक देवतांशी दिसते. ऋग्वेदातील अप् देवतेच्या व अवेस्तातील अरद्वीसूर अनाहितेच्या सूक्तांत साम्य आढळते. तसेच साम्य
ऋग्वेदा तील ‘श्रीसूक्त’ व अवेस्तातील ‘अषिश् वङुहि’ सूत्र यांत आहे.
अवेस्तात पुनर्जन्माचा सिद्धांत आहे किंवा नाही, याबद्दल एकमत नाही. पुनर्जन्माच्या सिद्धांताचे समर्थन करणारी काही सूचक वचने (यस्न ४६·१९ ४९·११) मात्र पुष्कळदा पुढे केली जातात.
अवेस्तामधील पाच गाथांत जरथुश्त्राचे उदात्त विचार आढळतात. हृद्य, प्रेरक व सुसूत्र अशा उपनिषदां- तील शैलीप्रमाणे गाथांची शैली आहे. उदा., ‘उश्ता अह्माइ यह्माइ उश्ता कह्याइचीत्’ (यस्न ४३·१) अनुवाद: ‘ज्याच्यामुळे सर्वांस प्रकाश मिळतो, त्यास प्रकाश प्राप्त होतो.’
पहा : पारशी धर्म जरथुश्त्र.
तारापोर, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.)
संदर्भ : 1. Bailey, H. W. Ed. Arberry, J. The Legacy of Persia, Oxford, 1956.
2. Browne,Literary History of Persia, London, 1904.
3. Darmesteter, J. Mills, L. H. The Zend-Avesta, in Sacred Books of the East, Vols. IV, XXIII & XXXI, Oxford, 1883–87.
4. Jackson, A. V. Williams, An Avesta Grammar in Comparison with Sanskrit, Part-I,Stuttgart, 1892.
5. West, E. W.Essays on the Sacred Language etc., London, 1884.
“