अवलोकितेश्वर : हे एका बोधिसत्त्वाचे नाव. महायान पंथात बुद्धापेक्षा बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले.सद्धर्मपुण्डरीकह्या ग्रंथाच्या २४ व्या परिच्छेदात ह्या अवलोकितेश्वराचे माहात्म वर्णन करून शरण आलेल्या लोकांच्या साहाय्यार्थ सदैव धावून येण्याची त्याची नेहमीच कशी तयारी असते हे दाखविले आहे. त्यामुळे भारता बाहेरच्या बौद्ध प्रदेशांत त्याला विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्याच्या मूर्ती उभारलेल्या दिसतात. नेपाळ मधील काठमांडू शहरात प्रमुख चौकात ह्या देवतेची मूर्ती आहे. तसेच ख्मेर प्रजासत्ताकातील अंकोरवात येथील एका बौद्ध मंदिराच्या शिखरावर एक प्रचंड मूर्तीचा मुखवटा आहे, तो याच उपास्य देवतेचा समजला जातो. चीन, जपान, व्हिएटनाम या देशांत ‘क्वान्यिन्’ या नावाने ओळखली जाणारी देवता हीच होय. काही ठिकाणी अवलोकितेश्वर अर्धनरनारीच्या स्वरूपातही आढळतो. एक सहस्र हात असलेली अशी ही देवता आहे. असे कल्पून तिच्या अनेक हात असलेल्या मूर्ती व चित्रे बनवलेली आढळतात.
बापट, पु. वि.