अनुभववाद : ज्ञानमीमांसेतील एक महत्त्वाची व प्रभावी विचारप्रणाली. इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम आहे आणि मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, म्हणजे विधानात जे सांगितलेले असते, त्याची अनुभवद्वारा प्रतीती घेऊनच ते खरे आहे की खोटे आहे हे ठरविता येते. ही दोन तत्त्वे म्हणजे अनुभववादी विचारप्रणालीचा गाभाच होत. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानातील सायरीनेइक-मत किंवा एपिक्यूरस-मत ही अनुभववादी मते होती, असे म्हणता येईल. परंतु अनुभववादाचा खरा प्रारंभ आधुनिक निसर्ग-विज्ञानांच्या उदयाच्या सुमारास झाला, असेच म्हटले पाहिजे. विज्ञानांची प्रस्थापना करण्यात अनुभववादाने बजाविलेली कामगिरी निषेधक व विधायक अशी दुहेरी होती. ईश्वराने प्रकाशित केलेल्या किंवा ॲरिस्टॉटलसारख्या अधिकारी पुरूषांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाशी सुसंगत असतील अशीच विधाने सत्य असतात, ह्या ज्ञानाप्रामाण्याच्या प्रस्थापित निकषाचे अनुभववादी तत्त्ववेत्त्यांनी खंडन केले आणि त्याच्या जागी इंद्रियानुभवात ज्याची प्रतीती घेता येते अशी विधानेच सत्य असतात हा निकष प्रस्थापित केला. त्याचप्रमाणे वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि वैज्ञानिक रीतीच्या तार्किक स्वरुपाचे विश्लेषण करून ते स्पष्ट व निश्चित करण्यात ह्या तत्त्वत्त्यांनी मोठा हातभार लावला. ह्या नवीन वैज्ञानिक ज्ञानाचे समर्थन करून त्याची प्रस्थापना करण्यात पुढाकार घेतलेल्या अनुभववादी तत्त्ववेत्यांत फ्रान्सिस बेकन, जॉन लॉक, जॉर्ज बर्कली, डेव्हिड ह्यूम ह्यांची गणना करता येईल. ह्यांच्यात लॉकची कामगिरी अधिक पद्धतशीर, विस्तृत आणि मूलगामी असल्यामुळे त्याला अनुभववादाचा प्रवर्तक समजण्यात येते आणि ते योग्यच आहे.वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरूपाची आपल्या भूमिकेवरून चिकित्सा व स्पष्टीकरण करताना अनुभववाद्यांना विवेकवादाशी तोंड द्यावे लागते. अनुभवापासून प्राप्त होणारे ज्ञान संशयास्पद असते व म्हणून ते संपूर्णपणे प्रमाण असू शकत नाही संपूर्णपणे प्रमाण असे ज्ञान केवळ बुद्धीपासून प्राप्त होऊ शकते बुद्धीला कित्येक स्वयंसिद्ध, स्वयंप्रमाण अशी विधाने ज्ञात होतात आणि त्यांच्यापासून निगमनाने, पायरीपायरीने इतर विधाने निष्पन्न करून सिद्ध करणे ही विज्ञानाची खरी रीत आहे. निगमनाच्या ह्या उतरंडीतील प्रत्येक पायरी मूळ विधानांइतकीच स्वयंसिद्ध असते, अशी ज्ञानाविषयीची विवेकवादी भूमिका आहे. ह्या भूमिकेप्रमाणे विधानाची इंद्रियानुभवात प्रतीती येण्यात त्याचे प्रामाण्य सामावलेले नसते, तर स्वयंसिद्ध विधानांपासून निगमनाने निष्पन्न होण्यात त्याचे प्रामाण्य सामावलेले असते. आधुनिक तत्त्वज्ञानाच्या पहिल्या कालखंडाचा इतिहास म्हणजे अनुभववाद आणि विवेकवाद ह्यांच्यातील वैचारिक संघर्षांचा, लॉक, बर्कली, ह्यूम हे अनुभाववादी तत्त्ववेत्ते आणि देकार्त, स्पिनोझा आणि लायप्निट्स हे विवेकवादी तत्त्ववेत्ते ह्यांच्यातील वादविवादाचा इतिहास. ह्या परस्परविरोधी परंतु परस्परपूरक विचारप्रणालींचा समन्वय ⇨इमॅन्युएल कांटने आपल्या तत्त्वज्ञानात केला. इंद्रियानुभवाशिवाय मानवी ज्ञान असूच शकत नाही, इंद्रियानुभवातूनच मानवी ज्ञानाला त्याचा सर्व आशय प्राप्त होतो परंतु ह्या आशयाला ज्ञानाचा आकार देण्याचे, ज्ञानाचे स्वरूप त्याला प्राप्त करून देण्याचे कार्य, बुद्धीपासून प्राप्त होणाऱ्या संकल्पना आणि तत्त्वे करतात. बुद्धीत उगम पावणाऱ्या ह्या संकल्पनांचा आशय अनुभवांना आकार देण्याच्या त्यांच्या कार्यातून निश्चित होतो. बुद्धीपासून प्राप्त होणाऱ्या ह्या तत्त्वांचे प्रामाण्य स्वयंसिद्ध नसते, तर ह्या तत्त्वांना अनुसरून अनुभवांचा जर परस्परांशी समन्वय केला नाही, तर त्यांना ज्ञानाचा आकारच प्राप्त होणार नाही. म्हणून ही तत्त्वे ज्ञानाचा आवश्यक असा आधार आहेत व म्हणून प्रमाण आहेत, हे कांटच्या भूमिकेचे सार आहे.
कांटनंतर अनुभववाद संपुष्टात आला नाही. फ्रेंच एन्सायक्लोपीडिस्ट, डेव्हिड हार्ट्ली, जेरेमी बेंथॅम, जेम्स मिल, जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्यांच्या विचारांतून अनुभववादी परंपरा दृढ आणि विकसित होत गेली. परंतु ‘मानवी ज्ञानाचे स्वरूप काय आहे?’ ह्या प्रश्नाऐवजी ‘नीतीचे स्वरूप काय आहे?’आणि ‘नैतिक नियमांचे प्रामाण्य कशावर आधारलेले असते?’ ह्या प्रश्नांना ह्यूमनंतरच्या ह्या अनुभववादी तत्त्ववेत्त्यांच्या विचारांत मध्यवर्ती स्थान प्राप्त झाले होते. नैतिक संकल्पना आणि आचार, सामाजिक संस्था, कायदे ह्यांची अनुभववादी भूमिकेच्या आधाराने पुनर्रचना करण्याचा ह्या तत्त्ववेत्त्यांचा प्रयत्न होता. ⇨जॉन स्टयूअर्ट मिलने मात्र अनुभववादाच्या मूलतत्त्वांना अनुसरून मानवी ज्ञानाच्या, विशेषतः वैज्ञानिक ज्ञानाच्या आणि वैज्ञानिक रीतीच्या, स्वरूपाचे स्पष्टीकरण करण्याच्या पद्धतशीर प्रयत्न केला. मिलच्या प्रांजळ विवेचनामुळे सबंध मानवी ज्ञानाची अनुभववादी भूमिकेवरून व्यवस्था लावण्यात येणाऱ्या ज्या अनुल्लंघ्य अडचणी ह्यूमने दाखवून दिल्या होत्या, त्या परत एकदा स्पष्ट झाल्या. गणिती विधानांच्या स्वरूपाचा अनुभववादी भूमिकेवरून उलगडा कसा करता येईल, ही एक प्रमुख अडचण होती. परंतु ⇨बर्ट्रंड रसेलने एका नवीन समर्थ अशा तर्कशास्त्राचा विकास करून गणिती विधानांच्या स्वरूपाचा अनुभववादी भूमिकेशी सुसंगत अशा पद्धतीने उलगडा केल्यानंतर अनुभववादाला परत चालना मिळाली. नवीन तर्कशास्त्राच्या आधाराने पुनरुत्थान पावलेल्या अनुभववादाचे परिणत स्वरूप म्हणजे तार्किक प्रत्यक्षार्थवाद नवीन तर्कशास्त्राच्या आधारलेले एक अभिनव, स्वयंपूर्ण तत्त्वज्ञान ह्या स्वरूपात तार्किक प्रत्यक्षार्थवाद अवतीर्ण झाल्यासारखा भासत असला, तरी अनुभववादी परंपरेशी त्याचे दृढ नाते आहे आणि अनुभववादाने धारण केलेले ते एक नवीन रूप आहे, ह्याची जाणीव हळूहळू सर्वांना आणि तार्किक प्रत्यक्षार्थवादी तत्त्ववेत्त्यांनाही झाली.तार्किक प्रत्यक्षार्थवादाने ज्ञानशास्त्र, नीतिशास्त्र इ. क्षेत्रांतील तात्त्विक समस्यांचे जे तर्ककठोर, सूक्ष्म आणि नेमके विश्लेषण केले, त्यामुळे अनुभववादी भूमिकेच्या तार्किक सामर्थ्याचा प्रत्यय जसा आला, तसेच अनुभववादी भूमिकेला डावलता येणार नाही हे जसे स्पष्ट झाले त्याचप्रमाणे तिच्या मर्यादाही उघड झाल्या. ह्याच्यातून ⇨लूडविग व्हिटगेनश्टाइनच्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स ह्या ग्रंथात प्रातिनिधिकपणे प्रतिबिंबित झालेल्या ‘भाषिक विश्लेषणावादा’चा उदय झाला.तार्किक प्रत्यक्षार्थवाद आणि भाषिक विश्लेषणवाद ह्यांतील परस्परसंबंध ह्यूम आणि कांट ह्यांच्यातील परस्परसंबंधासारखाच आहे.
कांटपूर्व अनुभववाद : इंद्रियानुभवांपासून आपल्याला सारे ज्ञान प्राप्त होते आणि इंद्रियानुभवांद्वारा प्रतीती आल्यानेच विधान खरे ठरते, ह्या अनुभववादाच्या मध्यवर्ती सूत्रापासून दोन निकष निष्पन्न होतात.
एक संकल्पनांच्या अर्थपूर्णतेचा निकष आणि दुसरा विधानांच्या सत्याचा निकष. मानवी ज्ञानाचा आशय म्हणजे सत्य विधाने. कोणतेही विधान करतांना आपल्याला संकल्पना कराव्या लागतात. उदा., ‘हे फूल तांबडे आहे’ ह्या विधानात ‘तांबडे’ ह्या संकल्पनेचे ‘हे फूल’ ह्या पदाने निर्दिष्ट होणाऱ्या वस्तूविषयी विधेयन करण्यात आले आहे. ह्या संकल्पना आपल्याला कशा प्राप्त होतात? अनुभववादाची लॉकने मांडलेली भूमिका अशी, की आपल्या सर्व संकल्पना निःशेषपणे आपल्याला इंद्रियानुभवांपासून प्राप्त होतात. हे मत अर्थात विवेकवादाशी विरोधी आहे. विवेकवादाच्या म्हणण्याप्रमाणे कित्येक स्वयंप्रमाण विधानांचे ज्ञान आपल्या बुद्धीला होते आणि अशा विधानांत अनुस्यूत असलेल्या संकल्पनांचा उगम बुद्धीतच असतो त्या अनुभवापासून प्राप्त झालेल्या नसतात. लॉक ही शक्यता नाकारतो. त्याचे प्रसिद्ध वचन असे आहे, की ‘मन सुरूवातीला कोऱ्या पाटीसारखे असते’ आणि त्याच्यावर पुढे जे काही लिहिले जाते ते इंद्रियानुभवांकडून लिहिले जाते. मानवी मनाचे स्वरूप सुरूवातीला कसे असते आणि पुढे ते कसे बदलत जाते, ह्याविषयीचा हा एक सिद्धांत आहे. म्हणजे हा एक मानसशास्त्रीय सिद्धांत आहे, असे वाटणे शक्य आहे. पण वास्तविक संकल्पना अर्थपूर्ण कधी असतात, ह्याविषयीचा हा तार्किक निकष आहे. ह्या निकषाप्रमाणे एखादी संकल्पना अर्थपूर्ण आहे हे दाखवून द्यायचे, तर ती इंद्रियानुभवांपासून उपलब्ध झाली आहे हे दाखवून दिले पाहिजे. उदा., ‘तांबडे’ ही अशी संकल्पना आहे. किंवा ती संकल्पना सावयव असेल (उदा., ‘सोनेरी पर्वत’), तर तिच्या अंतिम घटकांत तिचे विश्लेषण करून प्रत्येक घटक इंद्रियानुभवापासून प्राप्त झाला आहे, हे दाखवून दिले पाहिजे. एखादी संकल्पना अर्थपूर्ण आहे ह्या समजूतीने आपण ती वापरीत असतो परंतु तिचे असे विश्लेषण केले असता तिचे कित्येक घटक कोणत्या मूळ इंद्रियानुभवांपासून प्राप्त झाले आहेत हे दाखवून देता आले नाही, तर ती संकल्पना अप्रमाण ठरते. मग एकतर त्या त्या संकल्पनेतून हे अप्रमाण घटक वगळून तिची नवीन व्याख्या केली पाहिजे किंवा ती सबंध कल्पना निरर्थक ठरवून तिचा अव्हेर केला पाहिजे.
लॉकच्या भूमिकेतून दोन प्रकारच्या अडचणी उपस्थित झाल्या. एक, आपण नेहमीच्या व्यवहारात आणि विज्ञानात ज्या कित्येक मूलभूत संकल्पना वापरतो,–उदा., अवकाश, काल, द्रव्य,कार्यकारणभाव इ.—त्यांचे अनुभवात प्राप्त होणाऱ्या घटकांत विशेष विश्लेषण करता येत नाही, हे उघड झाले. उदा., कार्यकारणभावाचे विश्लेषण पूर्वी घडलेली घटना, तीच्यानंतर घडलेली घटना आणि ह्या दोहोंना जोडणारा एक आवश्यक संबंध ह्या घटकांत करावे लागते. पण ह्या आवश्यक संबंधाचा प्रत्यय इंद्रियानुभवात आपल्याला कधीच येत नाही. तेव्हा लॉकच्या निष्कर्षाप्रमाणे ह्या सर्व मूलभूत संकल्पना अर्थशून्य म्हणून त्याज्य ठरवाव्या लागतात किंवा त्यांच्या परत नव्याने व्याख्या कराव्या लागतात.उदा., द्रव्य (वस्तू) म्हणजे ज्याच्या अंगी गुण आहेत असे अधिष्ठान नसून केवळ गुणांचा समुच्चय असते किंवा ‘अ’ ‘ब’चे कारण आहे ह्याचा अर्थ ‘अ’पासून ‘ब’ आवश्यकतेने निष्पन्न होते असा नसून, जेव्हा जेव्हा ‘अ’ घडते तेव्हा तेव्हा ‘ब’ निरपवादपणे घडते असा आहे, इत्यादी. दुसरी अडचण लॉकने जाणिवेच्या केलेल्या विश्लेषणाशी निगडित आहे. एखादे वेदन जर आपण घेतले, तर त्याची दोन अंगे असतात. त्या वेदनाचा काही आशय असतो आणि त्या आशयाचे ते वेदन असते, लॉकच्या म्हणण्याप्रमाणे हे वेदन ज्याप्रमाणे मानसिक कृती किंवा घटना असते, त्याप्रमाणे त्याचा आशयही मानसिक असतो, त्याला मनात स्थान असते. लॉकच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही अनुभवाच्या उदा., वेदन, बोधन, कल्पना इ. बाबतीत हे खरे असते.त्याचा आशय केवळ मानसिक असतो. लॉकची ही भूमिका बर्कली व ह्यूम ह्यांच्यानंतरच्या अनुभववाद्यांनी स्वीकारली. पण बर्कलीने असे दाखवून दिले,की ह्या भूमिकेप्रमाणे आपल्याला बाह्य, भौतिक वस्तूंचे ज्ञान होऊ शकणार नाही. स्वतः लॉकने ह्या बाबतीत स्वीकारलेले मत वेगळे होते. बोधनामध्ये जी वेदने अंतर्भूत असतात, त्यांचे आशय जरी मानसिक असले तरी त्यांच्या द्वारा आपल्याला बाह्य भौतिक वस्तूंच्या अस्तित्वाचे व स्वरूपाचे पुरेसे निश्चित ज्ञान होऊ शकते, हे मत त्याने स्वीकारलेले होते पण त्याच्या मूळ भूमिकेशी ते विसंगत आहे, हे बर्कलीने दाखवून दिले. बाह्य, भौतिक विश्वाचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही किंबहुना ‘भौतिक वस्तू’ ही संकल्पनाच विसंगत आहे. आपणा सर्वांच्या मनात ईश्वराकडून सुसंगतपणे आणि सुव्यवस्थितपणे निर्माण करणयात येत असलेल्या वेदनांच्या आशयांची मालिका म्हणजेच, ‘बाह्य’ जग, ही भूमिका त्याने स्वीकारली. बर्कलीनंतर ह्यूमने अनुभववादाची व्यवस्थित मांडणी केली. द्रव्य आणि कार्यकारणभाव ह्या संकल्पनांचे प्रामाण्य त्याने नाकारले बाह्य, भौतिक वस्तू किंवा आपल्या अनुभवांचे अधिष्ठान असलेला स्थायी आत्मा ह्या संकल्पना स्वीकारायला अनुभववादी भूमिकेत काही आधार नसतो हे दाखवून दिले आणि आपला अनुभव म्हणजे अनेक प्रकारची वेदने आणि त्यांच्या क्षीण प्रतिकृती असलेल्या प्रतिमा किंवा कल्पना ह्यांची मालिका आहे, एवढच ज्ञान अनुभववादी भूमिकेतून प्रमाण म्हणून आपल्याला स्वीकारता येते हे सिद्ध केले.
अनुभववादाच्या सिद्धांतापासून ह्यूमने काढलेल्या निष्कर्षामुळे ज्ञानमीमांसेच्या क्षेत्रात कोंडी झाली. ह्या कोंडीतून, संशयवादातून कांटने वाट काढली. कांटची सामान्य भूमिका काय आहे हे आपण वर पाहिले. तिला अनुभववादाचे अंग आहे हे उघड आहे. सर्व अर्थपूर्ण संकल्पना जरी इंद्रियानुभवांपासून निष्कर्षणाने प्राप्त होत नसल्या, तरी इंद्रियानुभवांची व्यवस्था लावण्यात त्यांना विवक्षित कार्य असले, तरच त्या प्रमाण ठरतात आणि ह्या त्यांच्या कार्यात त्यांचा अर्थ सामावलेला असतो, ह्या कांटच्या भूमिकेत अनुभववाद सामावून घेण्यात आला आहे.
कांटनंतरचा अनुभववाद : परंतु अनुभववादाचा मुख्य प्रवाह ह्यूमनंतर ⇨डेव्हिड हार्ट्ली, एन्सायक्लोपीडिस्ट, ⇨जेरेमी बेंथेम, ⇨जेम्स मिल, जॉन स्ट्यूअर्ट मिल ह्यांच्या विचारातून वाहत राहिला. ह्यूमने अनुभववादापासून जे संशयवादी निष्कर्ष काढले होते, तिकडे ह्या तत्त्ववेत्त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे वेदने हा अनुभवाचा मूळ प्रकार. वेदनांच्या क्षीण प्रतिकृती म्हणजे कल्पना. वेदने आणि कल्पना ह्या मूळ मानसिक द्रव्यापासून साहचर्याच्या नियमानुसार आपल्या सर्व अमूर्त संकल्पना आणि अनेक गुंतागुंतीच्या विधानांचे बनलेले आपले ज्ञान ह्यांची बांधणी कशी होते, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ह्या प्रयत्नाचे उद्दिष्ट दुहेरी होते. एक तर सर्वच मानवी ज्ञान अनुभवाला येणारी वेदने आणि त्यांच्या प्रतिकृती ह्यांच्यापासून ज्ञात नियमांनुसार उद्भवत असल्यामुळे त्याच्यात गूढ, अतींद्रिय (उदा., ईश्वरदत्त) असा घटक नाही हे त्यांना दाखवून द्यायचे होते. शिवाय केवळ आपले ज्ञानच नव्हे, तर सर्वच अनुभव साहचर्याच्या नियमांनुसावर घडत असल्यामुळे माणसाची परिस्थिती योग्य प्रकारे बदलून आणि त्याच्यावर योग्य ते संस्कार करून मानवी स्वभावाला इष्ट ते वळण देऊ शकू, असे त्यांना सिद्ध करायचे होते. दुसरे उद्दिष्ट असे, की आपल्या वर्तनाचे नियमन करणाऱ्या नैतिक संकल्पनासुद्धा अनुभवजन्य आहेत, हे त्यांना प्रस्थापित करायचे होते. सुख हे एक वेदन आहे आणि ज्या कृत्यांनी सुख होते ती कृत्ये चांगली, अशी त्यांनी चांगल्या कृत्याची व्याख्या केली. कृत्यांचे सुखदुःखरूप सामाजिक परिणाम तपासूनच ती योग्य, नैतिक आहेत की नाहीत हे ठरविता येते, हा सिद्धांत त्यांनी अनुभववादावर आधारला. ईश्वरी आज्ञा किंवा अंतःप्रज्ञा ह्यांच्यात नीतीचा आधार शोधला पाहिजे, ही भूमिका त्यांनी अव्हेरली. सारांश, अनुभववाद हा त्यांच्या दृष्टीने अतींद्रिय आधार सांगणाऱ्या अगम्य ज्ञानाविरूद्ध आणि ह्या ज्ञानावर आधारलेल्या अहितकर नैतिक कल्पना आणि चालीरीती
यांविरुद्ध लढण्याचे व मानवी ज्ञान व व्यवहार यांच्यात सुधारणा करण्याचे साधन होते.
ह्या सर्व उद्दिष्टांचे आणि विचारसरणीचे प्रगल्भ रूप जॉन स्ट्यूअर्ट मिलच्या तत्त्वज्ञानात आढळते. अनुभववादी भूमिकेवरून साहचर्य नियमांच्या आधाराने सर्व मानवी ज्ञानाची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न मिलने केला. विशेषतः वैज्ञानिक रीतीचे स्वरूप स्पष्ट करून तिची अनुभववादाच्या पायावर त्याला उभारणी करायची होती.सामाजिक शास्त्रांत वैज्ञानिक रीतीचे स्वरूप काय असेल हे निश्चित करणे, हे त्याचे एक प्रधान उद्दिष्ट होते. पण मिलच्या विवेचनामुळे अनुवादातील दोन अडचणी स्पष्ट झाल्या. एक गणिती विधानांच्या स्वरूपाचा उलगडा करणे अनुभववादाला अशक्य आहे हे आढळून आले. कारण गणिती विधान—उदा., ४ +५= ९—आवश्यकतेने खरे असते, असे आपण मानतो. उलट अनुभवावर आधारलेले विधान अनुभवात काय आढळून आले ह्याचेच निवेदन करते. म्हणजे काय आहे एवढेच ते सांगते काय असलेच पाहिजे हे ते सांगू शकत नाही. दुसरी अडचण अशी, की विज्ञानात आपण जे निसर्गनियम प्रस्थापित करतो, ते सामान्य विधानांच्या स्वरूपाचे म्हणजे ‘सर्व अ ब असतात’ हया स्वरूपाचे असतात. अनुभवाच्या आधारे जर असे सामान्य विधान प्रस्थापित करायचे असेल, तर एक तत्त्व गृहीत धरावे लागते. ते असे, की आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या अ ह्या प्रकारच्या सर्व वस्तूंत जे समान गुण आढळून आले ते आपण न पाहिलेल्या (भविष्यात पाहू किंवा भूतकाळात पाहिल्या असत्या अशा) ‘अ’ ह्या प्रकारच्या वस्तूंतही असतात. आता न अनुभविलेल्या वस्तूविषयीचे हे तत्त्व अनुभवाच्या आधारे प्रस्थापित करता येणार नाही हे उघड आहे. तेव्हा अनुभववादाचा पायाच कच्चा आहे.
आधुनिक कालखंडातील अनुभववाद : आधुनिक काळात अनुभववादाला जे नवीन वळण व चालना लाभली ती बूल, फ्रेग व विशेषतः रसेल ह्यांनी विकसित केलेल्या नविन,⇨चिन्हांकित तर्कशास्त्रामुळे गणिती विधाने आकारिक तर्कशास्त्राच्या मूलभूत नियमांपासून केवळ निगमनाने निष्पन्न करता येतात, हे सिद्ध करण्याचा रसेलने प्रयत्न केला. पुढे आकारिक तर्कशास्त्राची मूलभूत प्रमेये पुनरूक्तिपक असतात, त्यांना स्वतःचा आशय नसतो, हे व्हिट्गेनश्टाइनने दाखवून दिले. त्यामुळे आकारिक तर्कशास्त्रातील विधाने आणि त्यांच्यावर आधारलेली गणिती विधाने व वस्तूंविषयीची आपण करीत असलेली विधाने, ह्यांची स्वरूपे एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत, हे स्पष्ट झाले. विधानांचे शुद्ध आकार किंवा रूपे, विधानांचे सांगाडे, हा आकारिक तर्कशास्त्राचा विषय आहे. सर्व विधानाकारांचे साध्या विधानाकारांत विश्लेषण करता येते, हे आकारिक तर्कशास्त्र दाखवून देते. पण वस्तूविषयीचे कोणतेही विधान घेतले, तर त्याला आकार तर असतोच पण त्याचा आशयही असतो. हा आशय केवळ इंद्रियानुभवापासून लाभलेला असला पाहिजे, ही भूमिका अनुभववाद्यांनी ह्या नवीन तर्कशास्त्राच्या संदर्भात घेतली. हिच्यापासूनच तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांचा ‘विधानाच्या अर्थपूर्णतेचा निकष’ उपलब्ध झाला. तो असा : विधान जर अर्थपूर्ण असायचेस तर ते आकारिक तरी असले पाहिजे (म्हणजे आकारिक तर्कशास्त्राचा नियम किंवा गणिती विधान असले पाहिजे) किंवा इंद्रियानुभवाच्या आधारे त्याच्या सत्याची प्रचीती घेता आली पाहिजे ते सत्य आहे की असत्य आहे, हे ठरविता आले पाहिजे. नवीन तर्कशास्त्र, पारंपारिक ब्रिटिश अनुभववाद आणि ⇨अर्न्स्ट माख ह्या व्हिएन्ना येखील तत्ववेत्त्याने पुरस्कारलेला प्रत्यक्षार्थवाद ह्यांचा संगम तार्किक प्रत्यक्षार्थवादात झाला, असे म्हणता येईल. मॉरिझ श्लिक, फ्रीड्रिख व्हाइसमान.⇨रूडॉल्फ कारनॅप, हान्स हान, ⇨कुर्ट गोडेल, ओटो नॉइराट इ. ‘व्हिएन्ना वर्तुळ’ म्हणून प्रसिद्ध असलेले तत्त्ववेत्ते ह्या विचारपंथाचे अध्वर्यू होते. इंग्लंडंमध्ये ⇨ए.जे.एअर, अमेरिकेत अर्न्स्ट नागेल व चार्ल्स मॉरिस आणि बर्लिनमध्ये हान्स राइकेनबाक, कार्ल हेंपेल इ. तत्त्ववेत्तेही ह्या विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. स्वतः बर्ट्रंड रसेल जरी तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा अनुयायी नव्हता, तरी त्याची ह्या विचारसरणीला सहानुभूती होती आणि त्याचा मूलभूत दृष्टीकोन अनुभववादीच होता. तार्किक अनुभववाद हे तार्किक प्रत्यक्षार्थवादाचेच अमेरिकेत प्रचलित असलेले दुसरे नाव होय.
तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा तत्त्वज्ञानातील कार्यक्रम निषेधक व विधेयक असा दुहेरी होता. अतींद्रिय वास्तवतेचे ज्ञान मिळवू पाहणाऱ्या पारंपरिक सत्ताशास्त्राचे, आपल्या विधानांच्या अर्थपूर्णतेच्या निकषांच्या साहाय्याने खंडन केले पण त्याबरोबर नेहमीच्या व्यवहारात आणि विज्ञानात स्वीकारत असलेल्या विविध प्रकारच्या विधानांचे विश्लेषण करून, अर्थपूर्णतेच्या आपल्या निकषाशी ती सुसंगत आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भौतिक वस्तूविषयीची विधाने, भूतकाळासंबंधीची विधाने, निसर्गनियम व्यक्त करणारी सामान्य विधाने, इतरांच्या मनाविषयीची विधाने (उदा., तो रागावला आहे.), हे विधानांचे काही ठळक प्रकार आहेत. आता ‘हे तांबडे आहे’ किंवा ‘हे गरम आहे’ इ. विधाने साधी, ज्यांचे घटक विधानात विश्लेषण करता येत नाही अशी, आहेत त्याचप्रमाणे इंद्रियानुभवाने त्यांची पूर्णपणो प्रचीती घेता येते, म्हणजे ती खरी आहेत की खोटी आहेत हे निश्चितपणे ठरविता येते. अशा विधानांना मूलविधान म्हणू या. विविध प्रकारच्या विधानांचे— उदा., भौतिक वस्तूसंबंधीच्या विधानांचे —अशा मूलविधानांत निःशेष विश्लेषण करावे, मूलविधाने कशा रीतीने एकत्र येऊन ते विधान बनले आहे हे दाखवून द्यावे आणि अशा प्रकारे त्या विधानाचा तार्किक आकार स्पष्ट करावा व ते अर्थपूर्ण आहे हे दाखवून द्यावे, हे तार्किक प्रत्यक्षार्थवादाचे विधायक उद्दिष्ट होते. पण हा कार्यक्रम फसला. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विधानांचे असे मूलविधानांत निःशेष विश्लेषण करता येत नाही व म्हणून ती अर्थपूर्ण ठरत नाहीत, हे उघड झाले. तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या तात्त्विक कार्यक्रमाचे वेगळ्या रीतीने वर्णन करता येईल त्याच्या अनुयायांनी तसे वर्णन केले होते. आकारिक तर्कशास्त्राचे नियम आणि विधानांच्या अर्थपूर्णतेचा त्यांनी स्वीकारलेला निकष ह्यांच्या साहाय्याने भाषेची तार्किक घडण स्पष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आकारिक तर्कशास्त्रात भाषेचा आदर्श सांगाडा रेखाटलेला असतो, असे त्यांचे मत होते. ह्या आदर्शाला अनुसरणाऱ्या तर्कशुद्ध भाषेचे नमुने त्यांनी रचले. आपली नेहमीची भाषा ज्या प्रमाणात ह्या नमुन्यांना अनुसरते, त्या प्रमाणात ती तर्कशुद्ध असते, अशी ही भूमिका होती. पण आपण आपल्या नेहमीच्या जीवनात किंवा विज्ञानात करीत असलेली कोणतीच विधाने आकारिक तर्कशास्त्राच्या सांगाड्यात चपखलपणे बसत नाहीत, हे उघड झाले. ह्याचा अर्थ असा, की ही विधाने तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या निकषाप्रमाणे अर्थशून्य म्हणून त्याज्य ठरवावी लागतील. सारांश, विसाव्या शतकात ह्यूमच्या संशयवादाची पुनरावृत्ती वेगळ्या स्वरूपात झाली.
व्हिट्गेनश्टाइनच्या फिलॉसॉफिक इन्व्हेस्टिगेशन्स ह्या ग्रंथातील विचारांनी तार्किक प्रत्यक्षार्थवादाला कलाटणी मिळाली. आपली भाषा आपल्या जीवनाचा एक भाग असते, किंबहुना आपली भाषा आपल्या जीवनाशी एकजीव झालेली असते व आपल्या जीवनाचा आकारच तिच्यात मूर्त झालेला असतो भाषेची घडण आकारिक तर्कशास्त्राने निश्चित केलेली नसते, तर आपल्या जीवनपद्धतीने ती निश्चित केलेली असते. अनेक प्रकारची भिन्नभिन्न कार्य करण्यासाठी आपण वेगवेगळे भाषिक प्रयोग करतो त्यांचा अर्थ समजून घ्यायचा, तर आपल्या जीवनाच्या आकाराच्या संदर्भात कोणती वेगवेगळी कार्य हे भाषिक प्रयोग पार पाडतात हे समजून घ्यायचे, म्हणजे जीवनाचा आकारच समजून घ्यायचा, अशी व्हिट्गेनश्टाइनची नवीन भूमिका होती. आपल्या अनुभवाचा असा एक आकार असतो त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या विधानांना त्यांचा आकार व अर्थ प्राप्त होऊ शकतो आणि ह्या अनुभवाच्या आकाराच्या पार्श्वभूमीवरच आकारिक तर्कशास्त्रात आपण विधानांचे शुद्ध म्हणजे रिक्त आकार तपासू शकतो, ह्या कांटच्या भूमिकेशी तिचे जवळचे नाते आहे.
अनुभववादापुढील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, नैतिक विधानांचे किंवा सामान्यतः मूल्यवाचक विधानांचे स्पष्टीकरण कसे करायचे? एखादे कृत्य चांगले आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या कृत्याच्या अंगच्या कोणत्याही गुणाचे वर्णन करीत नसतो, तर त्याच्याविषयीची आपली पसंतीचा भावना व्यक्त करीत असतो, असे ह्यूमचे म्हणणे होते. उपयुक्ततावाद्यांनी ‘चांगले’ म्हणजे ‘सुखद’ अशी व्याख्या केली होती परंतु सिज्विकसारख्या सुखवाद्यांनीच तिच्याविरूद्ध आक्षेप घेतले होते. एअर आणि इतर तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी ह्यूमची भूमिकाच सुधारून मांडली. नैतिक वाक्ये कृत्यांचे किंवा व्यक्तीचे वर्णन करणारी विधाने व्यक्त करीत नाहीत, तर कृत्यांविषयीच्या आपल्या अनुकूल किंवा प्रतिकूल वृत्ती व्यक्त करतात आणि इतरांच्या अनुकूल किंवा प्रतिकूल वृत्तींना आवाहन करण्याचे कार्य ती करतात, अशी ही उपपत्ती आहे आणि अलीकडच्या काळात ती बरीच प्रभावी ठरली आहे.
पहा : विवेकवाद संशयवाद चिद्वाद तार्किक प्रत्यक्षार्थवाद प्रत्यक्षार्थवाद लॉक,जॉन बर्क्ली, जॉर्ज ह्यूम, डेव्हिड.
संदर्भ : 1. Anderson, John, Studies in Empirical Philosophy, Sydney. 1962.
2. Ayer, A. J. Foundations of Empirical Knowledge, London, 1940.
3. Ayer, A. J. Winch, Raymond, Ed. British Empirical Philosophers, London, 1952.
4. Dewey, John, Experience and Nature, New York, 1925.
5. Price, H. H. Thinking and Experience, London, 1953.
6. Russell, Bertrand, Human Knowledge, London, 1948.
रेगे, मे. पुं.
“