अधिवास : खुषीने नेहमी राहण्याचे व्यक्तीचे विशिष्ट ठिकाण. कायद्याच्या काटेकोर परिभाषेत सांगावयाचे झाल्यास, व्यक्तीचे स्थायी घर वा मुख्य वास्तव्य असणारे ठिकाण. गाव, तालुका, जिल्हा, प्रांत, देश व राष्ट्र यांस अनुलक्षून अधिवास कोठे आहे, या प्रश्नाचे उत्तर जरूर त्याप्रमाणे द्यावे लागेल.

जन्मामुळे प्राप्त होणारा अधिवास यास जन्मधिवास म्हणतात. निवडीने स्वीकारलेल्या अधिवासास इच्छाधिवास म्हणतात. इच्छाधिवासाकरिता माणसाला निवडीची वैध क्षमता, त्याचे शारीरिक वास्तव्य व त्या ठिकाणी राहण्याची वर्तमान इच्छा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. अज्ञानांना व काही मर्यादेपर्यंत विवाहित स्त्रियांनाही निवडीची वैध क्षमता नसते. त्याचप्रमाणे जबरदस्तीने जर एखाद्या मनुष्यास शारीरिक वास्तव्य एखाद्या ठिकाणी करावयास लावले, तर त्यायोगे खुषीने उपस्थितीची अट पूर्ण होऊ शकत नाही. या दृष्टीने कारागृह हे बंदिवान लोकांचा इच्छाधिवास होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे लष्करी हुकूमान्वये एखाद्यास कोठे वास्तव्य करावे लागले, तर ते ठिकाण इच्छाधिवास होऊ शकत नाही. दोन किंवा अधिक राज्यांत जर एखाद्याचे वास्तव्य व संबंध विभागले असतील, तर इच्छाधिवास ठरविणे कठीण जाते.

विधिप्रवर्तनानेही अधिवास ठरतो. त्यास विधिप्रवर्तनाधिवास म्हणतात. काही परावलंबी व्यक्तींचा अधिवास त्यांच्या वास्तव्याने किंवा इच्छेने न ठरता विधिप्रवर्तनाने ठरतो. उदा., अज्ञानाचा अधिवास हा त्याच्या पित्याचा अधिवास असतो. विवाहित स्त्रीचा अधिवास हा तिच्या नवऱ्याचा अधिवास असतो.

अधिवासाला सामाजिक व राजकीय तसेच कायद्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. जप्ती, विवाह-विच्छेद, शिक्षणाच्या सवलती, मतदानाचा अधिकार यांसारख्या कायद्याच्या प्रश्नांमध्ये निवासाचा किंवा अधिवासाचा मुद्दा नेहमीच निर्माण होतो. विवादात तर अधिवासाच्या योगानेच कोणत्या न्यायालयात दावा लावावा, हे ठरते. अधिवास बदलला आहे, असे जो प्रतिपादन करतो, त्याच्यावर ते सिद्ध करण्याचा कायद्याने भार असतो.

खोडवे, अच्युत