अतिसार : वारंवार सत्वर व पातळ मलोत्सर्ग होणे म्हणजे अतिसार होय. आतड्याच्या विकारांचे ते एक लक्षण आहे. अशी विकृती अनेक रोगांत होते. उदा., आमांश, पटकी, आंत्रज्वर (टायफॉइड), कृमि-बाधा. काही रासायनिक पदार्थांमुळेही अतिसार होतो. गुदामध्ये घट्ट मल बसून राहिल्यासही वारंवार मलोत्सर्ग होतो.

प्रकार : (१) आशुकारी (तीव्र), (२) चिरकारी (कायम स्वरूपाचा). लक्षणे : (१) आशुकारी : एकाएकी पोटात गुरगुरू लागून पातळ मलोत्सर्ग होतो. पोटात कळ येते, बेंबीभोवताली गुरगूर व अस्वस्थपणा, ज्वर, अन्नद्वेष, वांती, मळमळ वगैरे लक्षणेही तीव्रपणावर अवलंबून असतात. अतितीव्र अतिसारात रक्तातील द्रव विसर्जित होऊन निर्जलीभवन झाल्यामुळे (शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे) उत्पन्न होणारी कासाविशी, कोरडी जीभ, शक्तिपात वगैरे लक्षणे दिसतात. हा प्रकार बहुधा अन्नविषबाधा किंवा संसर्ग (जंतू व विषाणू, →व्हायरस) यांमुळे दिसतो. (२)चिरकारी : या प्रकारात अधूनमधून अतिसार, बाकीच्या वेळी नेहमीप्रमाणे मलोत्सर्ग, अशी लक्षणे दिसतात. हा चिरकारी प्रकार कित्येक महिन्यांपर्यंत टिकतो. तो आतड्यांच्या चिरकारी रोगांचे एक लक्षणच आहे. विशेषत: आतड्यांचा क्षय, अर्बुदे (नवीन कोशिकांच्या प्रमाणाबाहेरील वाढीमुळे तयार झालेल्या व शरीरास निरुपयोगी असलेल्या गाठी), आमांश वगैरे. अन्नातील स्निग्ध पदार्थ पचवून शोषण्याची क्रिया बिघडली असता वारंवार चिकट, तेलकट, दुर्गंधियुक्त अतिसार दिसून येतो तसेच संग्रहणीसारख्या रोगाचेही ते एक लक्षण असते. 

भावनात्मक व मानासिक क्षोभामुळेही कित्येक वेळा अतिसार होतो. 

चिकित्सा : मूळ कारण शोधून त्यावर उपचार करतात. अन्नातील अनियमितपणामुळे होणारा अतिसार दोनतीन दिवसांत आपोआप बरा होतो. तीव्र अतिसारात निर्जलीभवन झाल्यास नीलेतून लवण-शर्करा-विद्राव देतात. आतड्यांना शामक अशी बिस्मथासारखी व प्रतिजैव औषधेही [→प्रतिजैव पदार्थ] उपयुक्त असतात. 

बालकांचा अतिसार

लहान मुलांमध्ये वारंवार पातळ, हिरवट रंगाचा व दुर्गंधियुक्त असा मल पडणे याला बालकांचा अतिसार असे म्हणतात.

कारणे : मोठ्या माणसांप्रमाणेच आहारातील अनियमितपणा, पचण्यास कठीण असे पदार्थ खाणे, एका वेळेला जास्त खाणे, दूषित अन्न, मानसिक क्षोभ वगैरे कारणांनी बालकांना अतिसार होतो. जंतुदूषित अन्न पोटात गेल्यामुळे आतड्याला सूज येऊन साथीसारख्या पसरणाऱ्या विकाराचाही ‘अतिसार’ या संज्ञेत अंतर्भाव होतो. 

लक्षणे : अतिसाराचे मुख्य लक्षण म्हणजे वारंवार होणारे जुलाब. मुलाला हिरवट, चोथापाणी असलेले, पांढरट असे जुलाब वारंवार होतात. त्यामुळे पोटात गेलेले अन्न अंगी न लागल्यामुळे मूल अशक्त होते. जुलाबावाटे शरीरातील पाणी बाहेर पडल्यामुळे मुलाला ग्लानी येते. फार तीव्र अतिसारात पाणी व लवण यांचा रक्तातील समतोल बिघडल्यामुळे अम्लरक्तता (रक्त अम्लधर्मी होणे) व निर्जलीभवन होते. मुलाचे डोळे व तालू खोल जातात. मूत्राचे प्रमाणही कमी होते. वेळीच उपचार न झाल्यास जीवाला धोका उत्पन्न होतो.

चिकित्सा : अतिसाराच्या चिकित्सेमध्ये सर्वांत जास्त महत्त्व पाणी व लवण यांचा समतोल परत प्रस्थापित करण्याला असून त्याकरिता नीलेतून लवणविद्राव व द्राक्षशर्करा (ग्लुकोज) देतात. जास्त किंवा अनियमित, पचण्यास कठीण असे अन्न खाल्ल्यामुळे अतिसार झाला असल्यास तो आपोआप बरा होतो पण फार तीव्र लक्षणे झाल्यास वर लिहिलेले उपचार करावे लागतात. जंतुजन्य अतिसाराकरिता प्रतिजैव औषधांचा उपयोग करतात.

 साथी : अगदी लहान मुलांच्या संगोपनगृहात कित्येक वेळा अतिसाराची साथ येते. तिचे कारण म्हणजे एश्चेरिकिया कोलाय या जंतूंचा संपर्क मुलांच्या अन्नाशी येणे हे होय. संगोपनगृहातील एखाद्या मुलास या जंतूंची बाधा झाली तर गृहातील परिचारिका व इतर सेवकवर्ग यांच्यामार्फत या जंतूंचा इतर मुलांच्या अन्नाशी संपर्क येतो. म्हणून या संगोपनगृहात असा रोग झालेल्या बालकाला स्वतंत्र खोलीत ठेवून त्याची शुश्रुषा करणाऱ्या व्यक्तींना इतर मुलांजवळ येऊ देत नाहीत. मुलाचे कपडे, भांडी वगैरे स्वतंत्र ठेवून त्यांचा कसलाही संपर्क इतर मुलांना होऊ देत नाहीत. निरोगी मुलांना देण्याचे दूध काळजीने उकळतात किंवा पाश्चरीकरण करतात. सर्वांत उत्तम म्हणजे या साथीच्या काळात मुलाला आईच्या अंगावरच पाजतात. संगोपनगृहात माश्या असल्यास त्यांचा बदोबस्त त्वरित करतात कारण माश्यांमुळे अन्नाला संपर्क होण्याचा मोठा धोका असतो. 

आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : आतुरचिकित्सा (अतिसार). 

कापडी, रा. सी.


 पशूंतील अतिसार 

हा स्वतंत्र रोग नसून पुष्कळ रोगांत आढळणारे एक लक्षण आहे. अतिसारात विष्ठा पातळ होते व हगवण लागते. हे लक्षण सौम्य स्वरूपात बहुतेक प्राण्यांत नेहमीच दिसून येते. पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आल्यामुळे किंवा क्षोभक पदार्थ आतड्यात गेल्यामुळे तो बाहेर फेकण्यासाठी जी नैसर्गिक क्रिया सुरू होते, त्यामुळे अतिसार होतो. रोग पुष्कळ दिवस चालू राहिल्यास आतड्यातून अन्नरस शोषून घेण्याच्या कार्यात अडथळा उत्पन्न होऊन शरीरपोषणात व्यत्यय येतो व शरीर कृश दिसू लागते. शरीरातील अत्यधिक जलांश उत्सर्जित होत राहिल्यामुळे तीव्र प्रकारच्या अतिसारात रक्तातील पाण्याचा अंश कमी होतो, रक्तपरिवहनात अडथळा उत्पन्न होतो व योग्य इलाज न केल्यास जनावर मृत्युमुखी पडते. 

कारणे : अतिसार पुष्कळ रोगांत व निरनिराळ्या कारणांमुळे होतो. पौष्टिक पदार्थ विशेष खाण्यामुळे, पावसाळ्याच्या सुरुवातीस पुष्कळ हिरवा चारा खाण्यामुळे गुरे व मेंढ्या ढेंढाळतात. दुभत्या गाई-म्हशींत व डुकरांत चाऱ्यातील बदलामुळे पचनक्रियेवर ताण पडल्यामुळे पशूंच्या आहारात क्षोभक पदार्थ, रेचक पदार्थ वा विषारी पदार्थ गेल्यामुळे खाद्यांतील मिठाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सडलेले गवत किंवा खराब झालेला मुरलेला चारा खाल्ल्यामुळे चरताना विषारी वनस्पती खाण्यामुळे अतिसार होतो. विषारी वनस्पतींमुळे झालेला अतिसार तीव्र प्रकारचा असतो. थंडी, वारा, पाऊस, अती थंड पाणी पिणे यांमुळेही अतिसार होतो. टेरामायसीन, ऑरिओमायसीन यांसारखी प्रतिजैव जंतुनाशके किंवा सल्फॉनामाइडासारखी रसायने पशूंना आहारातून दिल्यास त्यामुळेही पोटातील हितकर जंतूंचा नाश होऊन अन्नपचनास मदत करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्रियेत व्यत्यय येतो व अपचन होऊन त्यामुळे अतिसार होतो. आतड्याचा शोथ, आतड्यावर आलेली क्षयाची गाठ, जुनाट अतिसार, वासरांतील पांढरी हगवण व कोकरांचा आमांश या रोगांत अतिसार हे लक्षण दिसते. याशिवाय पोटातील नाना प्रकारच्या कृमींमुळे व बदराणूंमुळे (कॉक्सिडियामुळे) अतिसार होतो. अशा वेळी विष्ठेची परीक्षा करून निदान करता येते. अतिसार चिरकारी प्रकारचा असला तर जनावर दिवसेंदिवस कृश होत जाते. 

चिकित्सा : उपचार करताना प्रथम अतिसाराचे स्वरूप समजून घेतात. सौम्य स्वरूपातील अतिसार, क्षोभक पदार्थ बाहेर पडल्यावर व पौष्टिक पदार्थ जास्त खाण्यामुळे होणारा अतिसार काही दिवस दाणापाणी कमी देण्याने बरा होणे शक्य असते. अशा वेळी रोग चटकन थांबविणारी तीव्र औषधे घाईगर्दीने दिल्यामुळे आतड्यात क्षोभ करणारा पदार्थ तसाच आत रहातो व नैसर्गिक क्रियेस व्यत्यय येऊन रोग थांबून-थांबून पुन्हा जोर करतो. अशा प्रसंगी मोठ्या जनावरास थोडेसे गोडे तेल पाजतात व कुत्री-मांजरे यांना पॅरॅफीन पाजतात. यामुळे क्षोभक पदार्थ आतड्यातून बाहेर पडण्याच्या नैसर्गिक क्रियेस मदत होते. जनावराला चांगल्या उबदार जागेत ठेवतात व सहज पचणारा चारा देतात. कुत्र्यामांजरांना जवाचे पाणी किंवा अंड्याचा बलक देतात. मोठ्या जनावरांना पातळ कांजी व भरपूर पाणी देतात. अशक्तता जास्त आली असली तर उत्तेजक औषधे देतात. अतिसार सौम्य प्रकारचा नसेल व जनावरास तीव्र हगवण सुरू झाली तर त्वरेने औषधी इलाज करतात. प्रथमत: शरीरातील जलांश पातळ विष्ठेच्या रूपाने जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल, तर रक्तातील पाण्याचा अंश कमी होण्याचे टाळण्यासाठी त्वचेखाली किंवा नीलेत लवणविद्राव टोचतात. याशिवाय खावयाचा सोडा, बिस्मथ कार्बोनेट, अफूचा अर्क यांसारखी मलावरोध करणारी औषधे व सॅलोल, सल्फाग्वायनिडीन यांसारखी जंतुनाशक औषधे देतात. मोठ्या जनावरांस खडूची पूड व काताची पूड मिसळून कांजीतून पाजतात. पिकलेल्या बेलफळाचा गर पाण्यात शिजवून पाजतात. ताकही पाजतात. साधारण प्रकारचा अतिसार एकदोन दिवसांत बरा होतो. पण तेवढ्या मुदतीत थांबला नाही व जनावराला ताप चढला, तर तो तीव्र प्रकारचा समजून त्वरेने इतर उपचार करतात. 

लहान वयाच्या जनावरांत होणारा अतिसार : लहान वयाच्या जनावरांना, विशेषत: जन्मल्यानंतर काही दिवसांतच होणाऱ्या विकारांपैकी अतिसार हा एक महत्त्वाचा विकार आहे. त्याचे मुख्य कारण एश्चेरिकिया कोलाय नावाचा सूक्ष्मजंतू किंवा साध्या सूक्ष्मदर्शकातून न दिसणारे विषाणू हे होत. हा अतिसार संसर्गजन्य असतो. क्वचित कमीजास्त आहारामुळेही विकार संभवतो. गाईच्या व म्हशीच्या वासरांना पहिल्या दहा दिवसांत, विशेषत: चीक (पहिल्या दोन दिवसांचे दूध) न मिळाल्यामुळे, अतिसार होतो. उपचारासाठी स्ट्रेप्टोमायसीन उपयोगी पडते. टेरामायसीन किंवा ऑरिओमायसीन ही विशेष गुणकारी ठरतात. वासरू दुबळे झाले असले तर स्पिरिट अमोनिया ॲरोमॅटिका सारखी उत्तेजक औषधे देतात. घोड्याच्या शिंगरांनाही अशा प्रकारचा विकार होतो पण तो वासरांपेक्षा कमी तीव्र असतो. शिंगरांना दूषित गवत खाण्यामुळे अतिसार विशेषेकरून होतो, म्हणून अशा वेळी ते गवत बदलणे किंवा तोंडावर मुस्के बांधणे असे प्रतिबंधक इलाज करतात. इतर इलाज वासरांप्रमाणेच करतात. कोकरांत व डुकरांच्या पिलांत एश्चेरिकिया कोलाय-जंतूमुळे अतिसार होतो. त्यात लक्षणे व उपचार वासरांप्रमाणेच असतात. कुत्र्या-मांजरांसारख्या लहान जनावरांना वरील औषधांखेरीज जीवनसत्त्वाच्या गोळ्या देतात. 

गद्रे, य. त्र्यं. 

संदर्भ : 1. Harrison, T. R. Adams, R. D. Bennett, I. L. Resnik, W. H., Thorn, G. W. Wintrobe, M. M.Principles of Internal Medicine, Tokyo 1961.

           2. Hunter, D. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London.