ॲमरँटेसी : (आघाडा कुल). या वनस्पतिकुलाचा समावेश द्विदलिकित वर्गातील फुलझाडांपैकी कॅरिओफायलेलीझ (सेंट्रोस्पर्मेलीझ) नावाच्या गणात होतो ह्या गणात याशिवाय आणखी सात कुलांचा (⇨ कॅरिओफायलेसी, ⇨निक्टॅजिनेसी, ⇨चिनोपोडिएसी, पोर्चुलॅकॅसी, फायटोलोकेसी, ऐझोएसी व बॅसेलेसी) अंतर्भाव करतात. ॲमरँटेसीकुलात सु. ६० वंश व ८०० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत, मुख्यतः अमेरिकेत व भारतात, आहे. बहुतेक वनस्पती वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधी किंवा क्षुपे (झुडपे) आहेत. पाने साधी समोरासमोर किंवा एकाआड एक, अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली), खोडे केसाळ फुलोरा कणिश किंवा स्तबकासारखा अथवा कुंठित परिमंजरीसारखा [→पुष्पबंध] फुले लहान, नियमित एकवृत, द्विलिंगी कधी एकलिंगी (ॲमरँथस वंश), अवकिंज पातळ छदकांची एक जोडी व एक राठ छद सतत राहणारे असतात. परिदले पाच, पातळ किंवा जाड, सुटी किंवा तळाशी जुळलेली, परिहित केसरदले पाच, परिदलासमोर, बहुधा खाली जुळलेली, क्वचित (आघाडा) त्यामध्ये खवले किंजदले बहुधा दोन, जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ, एक कप्प्याचा [→फूल] व त्यात बहुधा एक क्वचित अनेक (कुरडू) वक्रमुख बीजके कृत्स्नफळ कपालिका किंवा क्लोम [→फळ]. बीजावरण चकचकीत व कठीण असते. कॉक्सकोंब, जाफरी गेंद व कुरडूचे प्रकार बागेत लावतात माठ, पोकळा, तांदुळजा, राजगिरा इ. जाती भाजीकरिता उपयुक्त आहेत तर कुरडू, आघाडा, काटेमाठ ही तणासारखी उगवून येतात या कुलातील वनस्पतींच्या खोडात असंगत प्रकारची द्वितीयक वाढ आढळते. [→शारीर, वनस्पतींचे]. या कुलाला ‘मारिषादि-कुल’ असेही म्हणतात.
जमदाडे, ज. वि.