अडवाणी, भेरूमल मेहरचंद : (१८७६—१९५३). सिंधी भाषाशास्त्रज्ञ व साहित्यिक. हैदराबाद (सिंध) येथे त्याचा जन्म झाला. तो बहुभाषाकोविद होता. अरबी, फार्सी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि सिंधी ह्या भाषा त्याला चांगल्या अवगत होत्या. त्याने भाषाशास्त्र, इतिहास, व्याकरणादी विषयांवर ग्रंथ लिहिले तसेच कादंबरी, नाटक, निबंधादी साहित्यप्रकारही हाताळले. सिंधी साहित्यात त्याने चाळिसावर ग्रंथांची भर घातलेली आहे.

 

त्याच्या सर्वग्रंथांत सिंधी भाषेचा इतिहास (१९४१) आणि कादीम सिंद (१९५७) हे दोन ग्रंथ सर्वांत महत्त्वाचे होते. पहिल्या ग्रंथात सिंधी भाषेतील रूपविचार, ध्वनिविचार आणि शब्दसंग्रह यांबाबतची महत्त्वाची माहिती आलेली आहे. सिंधीतील ग्रामीण शब्दभांडाराचेही त्याला सखोल ज्ञान होते. कादीम सिंद ह्या ग्रंथात सिंधमधील लोकजीवनाचा त्याने सिंधुसंस्कृतीपासून तो आधुनिक काळापर्यंतचा आढावा घेतला आहे. सिंधीतील म्हणी व वाक्प्रचारांचे संकलन करून ते दोन खंडांत (गुलकंद, भाग पहिला १९३४ व भाग दुसरा १९४०) प्रसिद्ध केले. काही म्हणींचे मूळ शोधून त्यांच्या स्पष्टीकरणार्थ त्याने समानार्थक इंग्रजी म्हणीही दिलेल्या आहेत. नंदो ग्रामर (१९२५) व वडो ग्रामर (१९२८) हे दोन व्याकरणग्रंथही त्याने लिहिले आहेत. त्याने सबंध सिंध प्रांताचा प्रवास करून रीतियुन रसमुनि जो बुनियादु (१९३६), सिंधी हिंदूंचा इतिहास (१९४६, दोन खंडांत) आणि अमिलन-जो-अहिवाल (१९१९) हे ग्रंथ लिहिले.

 

वरील वैचारिक साहित्याव्यतिरिक्त त्याने पाच नाटके, चार कादंबऱ्‍या आणि काही स्फुट निबंध लिहिले. हॅरिएट स्टोची अंकल टॉम्स कॅबिन व स्कॉटची द टॅलिस्मन ह्या कादंबऱ्‍या त्याने सिंधीत भाषांतरित केल्या. सर्वस्वी साहित्यास वाहिलेल्या महरन मासिकाचा तो संपादक होता. त्याने त्या मासिकात चांगली प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

हिरानंदाणी, पोपटी रा. (इं.) शिरोडकर, द. स. (म.)