ॲरिस्टोफेनीस : (सु. ४४८–३८० इ.स.पू.). एक ग्रीक सुखात्मिकाकार. जन्म अथेन्स येथे. त्याच्या पित्याचे नाव फिलिपॉस आणि आईचे नाव झेनोडोरा असे होते. ॲरिस्टोफेनीसच्या बालपणीच हे कुटुंब ईजायना बेटावरील त्यांच्या मालमत्तेच्या ठिकाणी राहावयास गेले. त्यामुळेच त्याचा प्रतिस्पर्धी क्लीऑन ह्याने ॲरिस्टोफेनीस हा अथेन्सचा नागरिक नसल्याचा दावा केला. द बँक्विटर्स, द बॅबिलोनियन्स आणि द आकार्नीअन्स ही ॲरिस्टोफेनीसची पहिली तीन नाटके. यांपैकी पहिली दोन अनुपलब्ध आहेत. ही तिन्ही नाटके त्याने टोपणनावाने लिहिली. त्यांतून त्याने क्लीऑनवर टीका केली होती. क्लीऑन हा अथेन्समधील युद्धपक्षाचा नेता होता. स्पार्टावर संपूर्ण विजय मिळविणे हा त्या पक्षाचा मुख्य हेतू. द नाइट्स (४२४ इ.स.पू.) हे नाटक मात्र त्याने स्वतःच्या नावावर प्रसिद्ध केले आणि क्लीऑनवर उघडपणे टीका केली. त्या वेळी क्लीऑन सत्ताधीश होता आणि स्पार्टावर विजय मिळवून तेथल्या शिपायांना युद्धकैदी म्हणून त्याने अथेन्समध्ये आणले होते परंतु या युद्धामुळे राज्याचे आधारस्तंभ असलेले शेतकरी आणि जमीनमालक ह्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले होते. या नाटकानंतर द क्लाउड्स (इ.स.पू. ४२३), द वास्प्स (इ.स.पू. ४२२) आणिद पीस (इ.स.पू. ४२१) ह्या त्याच्या राजकीय सुखात्मिका त्याने लिहिल्या. त्यानंतरच्या सहा वर्षांत त्याने लिहिलेली नाटके आज उपलब्ध नाहीत. द बर्ड्‌स (इ.स.पू. ४१४) ही त्याची पहिली समाजशास्त्रीय सुखात्मिका. त्यानंतर लिसिस्ट्राटा आणि थेस्मोफोरियात्सुझे ही नाटके त्याने रचिली. फ्रॉग्ज (इ.स.पू. ४०५),एक्लेत्सियात्सुझे (इ.स.पू. ३९२) आणि प्‍लूटूस (इ.स.पू. ३८८) ही नाटके यानंतरची आहेत. याशिवाय त्याने दोन नाटके लिहिली असावीत व ती आपला मुलगा आरारॉस ह्यास रंगभूमीवर आणण्यासाठी दिली असावीत, असे मानले जाते. त्यांपैकी कोकालुस  ह्या नाटकाने सुखात्मिकांना एक नवे वळण लावले, असे समजले जाते.

संदर्भ : Norwood, Gilbert, Greek Comedy, London, 1964.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)