ॲमेझॉन स्टोन : (ॲमेझोनाइट). खनिज.मायक्रोक्लीन या खनिजाचा हिरवा, निळसर हिरवा किंवा पिवळसर हिरवा रंग असणारा प्रकार. याचे रंगाखेरीज इतर भौतिक गुणधर्म व रासायनिक संघटन ही मायक्रोक्लिनासारखीच असतात. याला चांगली झिलाई देता येते व शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी त्याचा वापर होतो. उरल पर्वतापैकी इल्मेन पर्वत असलेल्या व इतर भागांत, इटलीत, नॉर्वेत,मॅलॅगॅसीत व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कोलोरॅडोत तसेच भारतातील नेलोरच्या व बिहारातील अभ्रकाच्या काही खाणींत आणि काश्मिरात ॲमेझोनाइट सापडते.

केळकर, क. वा.