अग्निरोधन : एखाद्या जळू शकणाऱ्या वस्तूवर रासायनिक प्रक्रिया करून ती पेट घेऊ शकणार नाही, असे करण्याच्या क्रियेला ‘अग्निरोधक’ म्हणतात. परंतु अशा वस्तू पूर्णपणे अज्वालाग्राही करण्याचा उपाय सापडलेला नाही. म्हणून अग्निरोधन ही संज्ञा वस्तुत: चूक आहे. कापूस, कापड, लाकूड, कागद इत्यादींवर काही प्रक्रिया करून, ते ज्वालेचा संपर्क झाला तर तिला काही अंशी प्रतिरोध करतील व सहज पेट घेणार नाहीत असे मात्र करता येते व यालाच अग्निरोधन ही संज्ञा किंचित सैल अर्थाने लाविली जाते.

अंग्निरोधनाच्या पदार्थाचे स्वरूप : ज्यांचे अग्निरोधन करावयाचे असेल, त्यांच्या पृष्ठांवर योग्य अशा रसायनाची पुटे देतात किंवा ते रसायन त्या पदार्थांत मुरवून घालतात. यासाठी कधी कधी अशी रसायने वापरली जातात की, जी तापविली गेल्यावर त्यांच्यापासून अज्वालाग्राही वायू तयार होऊन ते बाहेर पडतात. त्यांचा परिणाम जणू गुदमरविण्यासारखा किंवा कोंडमारा करण्यासारखा होऊन, त्या वस्तूला स्पर्श करणाऱ्या ज्वालेला प्रतिरोध होतो. काही रासायनिक द्रव्यांपासून वस्तूंच्या पृष्ठावर असे अभेद्य पुट तयार होते की, त्याच्यातून ज्वाला वस्तूत शिरू शकत नाही. काही रसायने अशी असतात की, ज्यांच्यामुळे तंतुमय वस्तूंच्या धाग्यात अज्वालाग्राही पदार्थाचे पुरण पुरेपुर भरले जाते.

अग्निरोधन-द्रव्यांची निवड: अग्निरोधनासाठी उपयुक्त अशी द्रव्ये शोधून काढण्यासाठी शेकडो रासायनिक द्रव्यांवर प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. बोरॅक्स (टाकणखार), बोरिक अम्ल, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम कार्बोनेट, अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड (नवसागर), सोडियम टंगस्टेट, लेड ॲसिटेट, पोटॅशियम किंवा अमोनियम-युक्त तुरट्या ही संयुगे अतिशय उपयुक्त आहेत, असे दिसून आलेले आहे.

नाट्यगृहातील देखावे, कागद, सजावटीच्या ज्वालाग्राही वस्तू, रेयॉन व सुती कापड किंवा त्यांचे गठ्ठे यांच्या अग्निरोधनासाठी १०० भाग पाण्यात ६ भाग टाकणखार व ५ भाग बोरिक अम्ल असलेला विद्राव अतिशय उपयुक्त असा अग्निरोधक असल्याचे आढळून आले आहे. कोरड्या कापडाच्या अग्निरोधनासाठी ८ ते १२% विद्राव पुरेसा होतो. कापड न धुता कोरडे ठेवलेले असेल तर ६ किंवा १२ महिन्यांच्या अंतराने वरील विद्रावाने केलेले संस्करण पुरेसे असते. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ स्टँडर्डस’ या संस्थेने पुढील पर्याय सुचविलेला आहे. १०० भाग पाण्यात २४ भाग सोडियम टंगस्टेट व ६ भाग डाय-अमोनियम फॉस्फेट असलेल्या विद्रावात कापड भिजवून हाताने पिळल्यावर, कापडाच्या ३० % भाराइतकी रासायनिक द्रव्ये कापडात अडकून राहतात. विद्रावाचे तापमान २० से. ठेवतात. भिजविलेल्या कापडातील विद्राव निघून गेल्यावर ते वाळवितात. या प्रक्रियेमुळे कापडाचा मूळचा नरमपणा बदलत नाही, कापड ओलसर किंवा मळकट होत नाही. या मिश्रणातील रसायने विषारी नाहीत आणि ती बुरशीच्या वाढीस मदत करीत नाहीत.

धाग्यावर अवक्षेपांचे पुट बसविणे ही अग्निरोधनाची एक पद्धती आहे. अग्निरोधनाचा आणखी एक प्रकार म्हणजे कापडाच्या धाग्यावर अग्निरोधक द्रव्याचा अवक्षेप बसवून कापड ज्वालारोधी करणे. यांपैकी अगदी साधी कृती पुढील होय. १०% कॅल्शियम क्लोराइड असलेल्या कोमट विद्रावात कापड चिंब भिजवून नंतर ते पिळून, त्याच्यातील विद्राव काढून टाकतात. नंतर ते कापड १०%  सोडियम फॉस्फेटाच्या गरम विद्रावातून हळूहळू सरकत जाऊ दिले जाते व नंतर ते पिळून वाळविले जाते. या प्रक्रियेत कापडाच्या धाग्यात कॅल्शियम फॉस्फेट अवक्षेपित होते. या प्रक्रियेला ‘ग्रोव्ह-पामर-प्रक्रिया’ म्हणतात.

लाकडाला अग्निरोधक बनविण्यासाठी त्याच्या धाग्यांत योग्य अशा लवणाचा विद्राव मुरवितात. असे लवण मुरलेल्या लाकडात बरीच अग्निरोधकता असते. उष्णतेपासून लाकडाचे रक्षण करण्यासाठी अनेक लेप उपलब्ध झालेले आहेत. त्याच्या पृष्ठावर भाजलेल्या जिप्समाचा किंवा सल्फेट ऑफ लाइमाचा ३ ते ५ मिमी. जाडीचा लेप दिला, तर ५०० ते ७०० से. इतक्या तापमानातही ते टिकून राहू शकते. लाकडी चौकटीवर १ सेंमी. जाडीचा प्लॅस्टराचा थर रिव्हेट मारून बसविला असता ती चौकट ८००से. तापमानातही ३० मिनिटे चांगली टिकू शकते, असे प्रत्यक्ष प्रयोगावरून दिसून आले आहे. प्लॅस्टरात पाणी घालून व सिलिकामय पदार्थ मिसळून केलेल्या विद्रावाचा फवारा लाकडावर मारला असताही त्याचे आगीपासून रक्षण होऊ शकते. प्लॅस्टराऐवजी ॲस्बेस्टस तंतू वापरता येतात. लेप किंवा फवाऱ्‍यासाठी त्याचा उपयोग होतो. काचलोकर, तंतुमय सिमेंट इ. पदार्थांच्या वेष्टनात गुंडाळून मोठ्या आकारमानाच्या इमारती लाकडांचे रक्षण करता येते. अशा वेष्टनांनी उष्णतेच्या क्रियेला विरोध होतोच शिवाय काही आकस्मिक कारणांनी आगीच्या ज्वाला यांच्याशी येऊन पोचल्या किंवा भोवतालून गेल्या, तरी वायू निर्माण होणे आणि धूर होणे या गोष्टी टळतात.

सेल्युलोज व कागद यांच्या अग्निरोधनासाठी पुष्कळ प्रयोग झाल्यावर कापडाच्या संबंधात वर उल्लेख केलेली सोडियम टंगस्टेट, सोडियम सिलिकेट, सोडियम फॉस्फेट, अमोनियम क्लोराइड, अमोनियम फॉस्फेट, मॅग्नेशियम क्लोराइड, टाकणखार, झिंक क्लोराइड, तुरट्या इ. द्रव्येच उपयुक्त असल्याचे आढळून आले. कागदाच्या लगद्यात इतर काही भर घालण्यापूर्वीच पुढील मिश्रणे अग्निरोधनासाठी त्याच्यात मिसळतात: (१) अमोनिया फॉस्फेट, अमोनियम क्लोराइड, सोडियम फॉस्फेट आणि टाकणखार. (२) झिंक क्लोराइडाच्या पाण्यातील विद्रावात अतिरिक्त अमोनियम हायड्रॉक्साइड व नंतर अमोनियम क्लोराइड घालून केलेले मिश्रण.

नकाशे, चित्र, लाख यांच्या अग्निरोधनासाठी, प्लॅस्टिकीकृत सेल्युलोज ॲसिटेट, व्हिनिलाइट रेझिने किंवा ॲक्रिलेट रेझिने ही ब्रशाने लावून किंवा फवारा मारून वापरली जातात.


 अग्निरोधन-संस्कार केलेल्या कापडाच्या कसोट्या: कापडाचे अग्निरोधन समाधानकारक झाले की नाही, हे पाहण्याच्या अनेक कसोट्या शोधून काढण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या देशांत किंवा मानक संस्थांत निरनिराळ्या पद्धती वापरल्या जातात. काहींत अग्निरोधक कापडाची इष्ट आकारमानाची पट्टी उभी, काहींत तिरपी व काहींत आडवी ठेवून ती विशिष्ट कालात किती जळते याचे मापन केले जाते. ठराविक प्रकारच्या मेणबत्तीची किंवा इतर प्रकारच्या दिव्याची ज्योत वापरली जाते. उदा., एखाद्या ज्योतीत वातीच्या माथ्यापासून विशिष्ट अंतरावर ठेवलेली उभी कापडाची पट्टी १० सेकंदांत किती जळते, तिचा किती भाग काळसर होतो व ज्योत काढून घेतल्यावर कापडाची पट्टी किती सेकंद जळते हे पाहण्यात येते. चांगले अग्निरोधन झालेले कापड ज्योत काढून घेतल्यानंतर २ सेकंदांपेक्षा अधिक काळ जळत नाही. जळून काळ्या झालेल्या भागाचे क्षेत्रही एकंदरीत अल्प असते व ते प्रत्यक्ष प्रयोगांवरून ठरविले जाते. कापूस, ज्यूट, रेयॉन इ. निरनिराळ्या प्रकारच्या कापडांची, वर उल्लेख केलेल्या कसोट्यांची फले निरनिराळी असतात. विशिष्ट कालात ज्वलन किती वेगाने पसरते व ज्योत काढून घेतल्यावर काळपट झालेल्या भागात अंधुक ठिणगीसारखा प्रकाश किती पसरतो, याचीही नोंद केली जाते. या कसोट्यांवरून कापडाची अग्निरोधनक्षमता व ज्वलनाचा वेग ही कळून येतात.

बांधकाम-सामग्रीचे अग्निरोधन: इमारती लाकडाच्या व प्लायवुडच्या वस्तू काही अंशी स्वभावत: अग्निरोधक असतात व त्यांच्या अधिक मोठ्या वस्तू अधिक अग्निरोधक असतात. लाकडाची उष्णता-वाहकता मंद असते व उष्णतेमुळे लोखंडाचे जितके विरूपण होते, तितके लाकडाचे होत नाही. उष्णतेमुळे धातूच्या चौकटी प्रसरण पावून कोसळतात. त्यामुळे त्यांच्यावर आधारलेल्या भिंतीही कोसळतात. तसे लाकडी वस्तूंचे होत नाही. अज्वलनशील पदार्थांचा लेप देऊन किंवा त्यांचे थर रिव्हेटने बसवून लाकडी वस्तूंचे आगीपासून रक्षण करता येते. बांधकामाच्या लाकडाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्था करावी लागते: (१) शक्य तितक्या घट्ट विणीचे व अधिक जाडीचे लाकूड वापरावे. प्लायवुडच्या किंवा पातळ लाकडाच्या वस्तू भिंतींना घट्ट चिटकवून बसवाव्या. भितींला घट्ट चिकटवून बसविलेले प्लायवुड जाड असेल, तर ते सहज जळणार नाही. (२) जिने, तुळ्या इत्यादींच्या पृष्ठांवर अग्निरोधनासाठी संरक्षक लेप देताना किंवा रिव्हेट मारून थर बसविताना ते लेप किंवा थर लाकडाच्या पृष्ठाला चिकटून बसविले पाहिजेत. त्यांच्यात व लाकडाच्या पृष्ठात मध्ये फट नसली पाहिजे. (३) दारे कठीण लाकडाची व ५ सेंमी. जाडीची असली व त्यांच्या दोन्ही बाजूंवर १ सेंमी. जाडीचा सिमेंट ॲस्बेस्टसाचा थर असेल, तर कमीत कमी एक तास तरी त्यांचा आगीपासून बचाव होतो.

कागदी पुठ्ठ्याचे तक्ते, तावदाने किंवा विभाजक यांना उष्णतारोधक कसे करावे, याचे संक्षिप्त वर्णन वर आलेले आहे. तथापि बांधकामात अशा वस्तू वापरावयाच्या असतील, तर केवळ त्यांच्या अग्निरोधनक्षमतेवर अवलंबून राहता येत नाही. दोन जाड कागदांच्यामध्ये जिप्समाचा पातळ थर घालून तयार केलेले प्लॅस्टरचे तक्ते त्यांच्यामधला जिप्समाचा थर अखंड असेपर्यंतच म्हणजे त्यांच्या बाहेरील कागद जळून जाईपर्यंत काहीसे अग्निरोधक असतात. पण बाहेरचा कागद जळून गेल्यास जिप्समाच्या थराचे तुकडे पडणे शक्य असते म्हणून अशा तक्त्यांच्या अंगी कितीही उत्कृष्ट अग्निरोधकता असली, तरी विभाजक म्हणून ते वापरण्याऐवजी २५ सेंमी. जाडीची व दोन्ही पृष्ठांवर २ सेंमी. जाडीचा चुना व सिमेंट यांचा गिलावा असलेली भिंत बांधण्याने अधिक संरक्षण मिळते.

गुप्ता, रामस्वरूप (इं.) देशपांडे, ज. र. (म.)