आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा : मानवी जीवनाची विविध क्षेत्रे अधिक समृद्ध व्हावीत आणि आधुनिक जगातील तांत्रिक विकासाचा लाभ भूतलावरील सर्व मानवजातीस व्हावा, या उद्देशाने अनेक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन झाल्या आहेत. व्यापार, उद्योग, अर्थप्रबंध, वाहतूक व संदेशवहन, कृषी आणि अन्य आनुषंगिक क्षेत्रांतील खाजगी आंतरराष्ट्रीय संघटनांची वाढ एकोणिसाव्या शतकात झपाट्याने झाली आणि विसाव्या शतकात तर तिची गती अधिक वाढली. १९०७ मध्ये अशा संघटना १८५ होत्या, त्या १९६० मध्ये १,२५४ पर्यंत वाढल्या.
लंडनमध्ये १८५१ साली भरलेल्या जागतिक औद्योगिक प्रदर्शनातून पहिल्या आंतरराष्ट्रीय व्यापार-संस्थेचा उगम झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या सरकारी संघटनांच्या योगे खाजगी संस्था स्थापन होत गेल्या. उदा., आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या योगे आंतरराष्ट्रीय मालकसंघटनेचा उगम झाला. आंतरराष्ट्रीय मानक संघटना (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) ही अशीच एक संस्था होय. जागतिक युद्धे व राजकीय तणातणी ह्यांसारख्या अडचणींतून अशा संस्था व परिषदा तावूनसुलाखून बाहेर पडलेल्या आढळतात. १९६० मध्ये अशा ३३४ खाजगी संस्थांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘इकॉनॉमिक व सोशल कौन्सिल’च्या सल्लागारपदाचा दर्जा मिळविला होता. काही उदाहरणे द्यावयाची तर ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘द इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स’ आणि ‘द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसर्स’ या तिन्ही संस्थांनी संयुक्त राष्ट्रांच्या ‘अन्न व शेती संघटने’ चा सल्लागार-दर्जा मिळविला आहे. ‘द इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन’ने खाजगी आंतरराष्ट्रीय विमान-वाहतूक संस्थांशी करार केले आहेत. ‘यूरोपीय कोळसा व पोलाद–समूह’ या क्षेत्रातील अन्य खाजगी संस्थांशी सल्लामसलत करतो. या खाजगी संस्थांच्या विविध ठिकाणी परिषदा भरतात व अनेक संबंधित विषयांचा ऊहापोह होतो.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर कृषिविषयक संस्थांची संख्या खूप मोठी असल्याने, कृषिविषयक खाजगी संस्था मोठ्या प्रमाणावर स्थापन झाल्या नाहीत. १८८९ मध्ये स्थापन झालेली ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर ॲग्रिकल्चर’ ही या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था. १९४६ मध्ये या संस्थेची पुनर्रचना करण्यात येऊन तिचे ‘यूरोपियन कॉन्फेडरेशन ऑफ ॲग्रिकल्चर’ असे नामकरण करण्यात आले. ही संस्था यूरोपातील देशांच्या कृषिविषयक संघटनांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते. यांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषि-पदार्थागणिक संस्था बनविण्यात आल्या आहेत. उदा., ‘वर्ल्डस पोल्ट्री सायन्स असोसिएशन’, ‘द इंटरनॅशनल ऑलिव्ह-ग्रोअर्स फेडरेशन’ वगैरे.
व्यापार व उद्योग यांसाठी १९२० मध्ये स्थापन झालेली ‘इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’ ही सर्वांत मोठी संघटना होय. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय चलन निधी यांच्या स्थापनेमागील प्रेरकशक्ती म्हणून या संस्थेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सहकारक्षेत्रात महत्त्वाचे कार्य बजावणारी ‘इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स’ ही प्रमुख संस्था होय. १९६० मध्ये या संस्थेची सभासद-संख्या पंधरा कोटींवर होती. यांव्यतिरिक्त व्यवसाय-उद्योगांत अनेक छोट्या संघटना कार्य करतात. आंतरराष्ट्रीय प्रदर्शने व जत्रा भरविण्याच्या कामात साहाय्य करणारी ‘युनियन ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’, व्यवस्थापन व वितरण ह्या विषयांत संशोधन करणारी ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ डिपार्टमेंट स्टोअर्स’, मोटरगाड्यांची विक्री, दुरुस्ती व तत्संबंधीच्या इतर माहितीचा प्रसार करणारी ‘इंटरनॅशनल ऑफिस फॉर मोटर ट्रेडर्स अँड रिपेअर्स’ या काही प्रमुख संघटना होत. कापड-उद्योग-क्षेत्रात अनेक आंतराष्ट्रीय संस्था कार्य करतात. ‘इंटरनॅशनल वूल सेक्रेटरिएट’ (१९३७) ही संस्था लोकर-उत्पादक व लोकर-उद्योगाच्या हितसंबंधांचे संवर्धन करते. ‘इंटरनॅशनल वूल टेक्स्टाइल ऑर्गनायझेशन’ ही संस्था लोकर-वस्त्र-उत्पादन व व्यापार ह्यांच्या संबंधात कार्य करते. सुती कापड व रेशीम यांच्या विकासाकरिता अनुक्रमे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कॉटन अँड अलाइड टेक्स्टाइल इंडस्ट्रीज’ व ‘इंटरनॅशनल सिल्क असोसिएशन’ या संस्था स्थापन झाल्या आहेत. अन्नोद्योगासाठी ‘इंटरनॅशनल ऑफिस ऑफ कोको अँड चॉकलेट’ ‘द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ मीट ट्रेडर्स असोसिएशन’, ‘यूरोपियन कॉफी ब्यूरो’ वगैरे संघटना कार्य करतात. ‘द इंटरनॅशनल हॉटेल असोसिएशन’ ही हॉटेल उद्योगाची संघटना म्हणून कार्य करते. ‘वर्ल्ड पॉवर कॉन्फरन्स’ ही संस्था जगातील जवळजवळ पन्नास देशांमधील वीज, कोळसा, तेल, इतर इंधने व खनिजे ह्यांची साधनसामग्री, पुरवठा व कार्यक्षम उपयोग ह्यांबाबत कार्यशील आहे. अर्थप्रबंधाच्या क्षेत्रात खासगी संघटनांचे फारच लहान प्रमाणावर कार्य चालते. यांतील ‘इंटरनॅशनल क्रेडिट इन्शुरन्स असोसिएशन’ ही झुरिक (स्वित्झर्लंड) येथे स्थापन झालेली सर्वात महत्त्वाची संघटना होय. ती यूरोपीय देश, मेक्सिको, व्हेनेझ्वेला व दक्षिण आफ्रिका ह्या देशांमधील प्रमुख विमाकंपन्यांचे समाशोधन-केंद्र म्हणून कार्य पाहते. अशीच दुसरी संस्था म्हणजे ‘इंटरनॅशनल थ्रिफ्ट इन्स्टिटयूट’ ही होय. यूरोप-आशिया-व अमेरिका-खंडांतर्गत देशांमधील बचत-बँकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा व प्रभाव वाढविण्याच्या उद्देशाने त्यांना साहाय्य करणे, हे तिचे ध्येय आहे. संदेशवहन-क्षेत्रात ‘यूरोपियन ब्रॉडकास्टिंग युनियन’ ही १९५० मध्ये स्थापन झालेली संघटना कार्य करते. १९६० मध्ये तिचे सदस्यत्व व सहसदस्यत्व अनुक्रमे २५ व १४ देशांतील नभोवाणी-संघटनांना मिळालेले होते. नभोवाणी-संघटनांच्या सर्व हितसंबधांचे रक्षण करणे हे तिचे ध्येय आहे.
वाहतूक-क्षेत्रात रेल्वे, मोटार, जहाज व हवाई-वाहतूक ह्यांच्या निरनिराळ्या संघटना आहेत. यूरोपमधील बहुतेक देशांची रेल्वे-वाहतूक शासकीय व्यवस्थापनाखाली असल्याने रेल्वे-वाहतुकीच्या खाजगी आंतरराष्ट्रीय संघटना फारशा आढळत नाहीत. ‘द इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज्’ (१९२२) ही संघटना यूरोपातील व यूरोपाबाहेरील रेल्वेमार्गांची व्यवस्था पाहणे, रेल्वे कंपन्यांच्या विविध समस्यांचे निरसन करणे, आंतरराष्ट्रीय वेळापत्रके तयार करणे वगैरे कार्ये करते. अशाच प्रकारची कार्ये ‘इंटरनॅशनल रेल्वे काँग्रेस असोसिएशन’ (१८८४) ही संस्था करते. तिचे सदस्यत्व साठांहूनही अधिक देशांतील खाजगी रेल्वे कंपन्यांनी स्वीकारलेले आहे. जहाज-वाहतूक क्षेत्रात, ‘द बाल्टिक अँड इंटरनॅशनल मॅरिटाइम कॉन्फरन्स’ ही १९०५ मध्ये स्थापन झालेली संघटना जहाज-वाहतूक उद्योगातील समस्यांच्या निरसनाबाबत कार्यशील आहे. ‘इंटरनॅशनल शिपिंग फेडरेशन लिमिटेड’ ह्या संघटनेतर्फे सागरी वाहतुकीमधील कामगारांची कामाची स्थिती व मजुरी ह्यांसंबंधीच्या समस्यांचा विचार होत असतो. मोटारवाहतूक–क्षेत्रात ‘इंटरनॅशनल ऑटोमोबाइल फेडरेशन’ ही संस्था जगातील बहुतेक देशांमधील मोटरक्लबांसाठी आपल्या सेवा उपलब्ध करते. ‘इंटरनॅशनल टूरिंग अलायन्स’ ही संघटना विविध देशांतील राष्ट्रीय पर्यटन-मंडळांशी संपर्क ठेवते. हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात ‘इंटरनॅशनल एअर ट्रॅन्स्पोर्ट असोशिएशन’ ही संस्था जगातील बहुतेक विमान-कंपन्यांपुढील समस्यांचे निराकरण करते व तांत्रिक सल्लाही देते. सात यूरोपीय राष्ट्रे व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्यांच्या प्रयत्नातून १९०५ मध्ये स्थापन झालेली ‘इंटरनॅशनल एरॉनॉटिकल फेडरेशन’ ही संस्था जागतिक वैमानिकीचे संवर्धन करण्याच्या उद्देशानुसार कार्य करते. व्यापार व उद्योग ह्यांसाठी आपल्या सेवा उपलब्ध करणाऱ्या व्यवसायांच्या अनेक संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या आहेत. ‘इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ ह्या संस्थेचे सदस्यत्व अनेक राष्ट्रांतील सांख्यिकी संघटनांनी स्वीकारलेले असून ही संस्था सांख्यिकीय पद्धतींचा विकास करण्यामध्ये गुंतलेली आहे. ‘द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट्स’ ही संस्था कृषि-अर्थशास्त्रासंबंधीची अद्ययावत माहिती प्रसिद्ध करते. अभियांत्रिकीकरिता ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ब्रिज अँड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग’ ही संस्था कार्य करते. उद्योग व व्यापार ह्यांच्या सौकर्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणे वा मानके ठरविण्याच्या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय मानक संघटना’ ही संस्था अतिशय महlत्त्वाचे कार्य करीत आहे.
गद्रे, वि. रा.