ॲलाबॅमा-प्रकरण : अमेरिकेच्या यादवी युद्धातून उद्भवलेले युद्धनौकांबाबतचे प्रसिद्ध प्रकरण. यादवी युद्धाच्या काळात इंग्‍लंडने बांधलेल्या ‘ॲलाबॅमा’, ‘फ्लॉरेडा’, ‘शेनँडोआ’ वगैरे युद्धनौका अमेरिकेतील बंडखोर घटक-राज्यांच्या गटाने खेरदी करून, त्या संघराज्याविरुद्ध वापरण्यास सुरुवात केली. राष्ट्राध्यक्ष लिंकनने ह्याबाबत इंग्‍लंडला इशारा दिला. तथापि ह्या युद्धनौकांचा संचार थांबला नाही. तेव्हा अमेरिकेच्या कीर्‌सार्ज ह्या नौकेने ॲलाबॅमाविरुद्ध युद्ध पुकारून तीस १९ जून १८६४ रोजी जलसमाधी दिली. मात्र सदर नौकांनी दिलेला उपसर्ग व केलेले नुकसान, हा विषय पुढे बरीच वर्षे धुमसत राहिला. साहजिकच इंग्‍लंड-अमेरिका ह्या देशांच्या संबंधात त्यामुळे कटुता निर्माण झाली.

यादवी युद्ध संपताच अमेरिकेने इंग्‍लंडला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे जाहीर केले आणि याच तत्त्वावर तत्काळ ॲलाबॅमा वगैरे नौकांनी केलेल्या नुकसानभरपाईची मागणी इंग्‍लंडकडे केली. क्लॅरंडन व जॉन्सन ह्या इंग्‍लंड व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एका करारानुसार ही मागणी लवादाकडे सोपविण्याचे ठरविले. ह्या वेळी सीनेटने इंग्‍लंडवर युद्ध लांबविण्याचा गंभीर आरोप करून सर्व नुकसान इंग्‍लंडनेच भरून द्यावे अशी मागणी केली. ह्याच मागण्या अमेरिकेने पुन्हा १८७१ च्या वॉशिंग्टन तहाच्या वेळी केल्या. त्या वेळी लवाद नेमण्यात येऊन त्यावर अमेरिका-इंग्‍लंड-व्यतिरिक्त इटली, स्वित्झर्लंड व ब्राझील ह्यांचे प्रतिनिधीही घेण्यात आले. लवादाच्या जिनीव्हा येथे अनेक बैठका होऊन १४ सप्टेंबर १८७२ रोजी सर्वानुमते अमेरिकेस नुकसानभरपाई म्हणून इंग्‍लंडने १,५५,००,००० डॉलर द्यावे असे ठरले. त्यांपैकी केवळ ॲलाबॅमासाठी म्हणून साठ लाख डॉलर ठरविण्यात आले. दोन्ही देशांनी लवादाने दिलेला निर्णय मान्य केला व त्याची अंमलबजावणीही केली. अशा रीतीने इंग्‍लंड व अमेरिका ह्या देशांतील वाद सलोख्याने मिटविण्याचा पायंडा पडला. आंतरराष्ट्रीय वादांस ह्या वेळेपासून एक निराळे वळण मिळाले.

पहा : अमेरिकेचे यादवी युद्ध.

देशपांडे, सु. र.