ॲलॅबॅस्टर : खनिज. ⇨जिप्समाचा सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म कणी संपुंजित प्रकार. नियमित किंवा अनियमित थरांच्या किंवा गुठळ्यांच्या स्वरूपात आढळते. कठिनता १·५-२. वि.गु. २·३. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, फिकट गुलाबी, पिवळसर, निळसर इत्यादी. रा. सं. CaSO4·2H2O. पुष्कळदा याच्यात माती, कॅल्शियम कार्बोनेट, सिलिका इ. मूलद्रव्ये असतात. उत्पत्ती व आढळण्याची पद्धती जिप्समाप्रमाणे असून ते मूर्ती, पुतळे, शोभेच्या वस्तू करण्यासाठी वापरतात. मऊ असल्यामुळे व पाण्यात किंचित विद्राव्य (विरघळणारे) असल्यामुळे उघड्यावर टिकत नाही. पण इमारतीच्या आतले कलाकुसरीचे भाग करण्यासाठी वापरतात. नाव ईजिप्तातील ‘ॲलॅबॅस्ट्रॉन’ या प्राचीन शहरावरून पडले.
ठाकूर, अ. ना.