ॲलॅनीन : एक ॲमिनो अम्‍ल. सूत्र CH3·*CH·(NH2)·COOH. याला आल्फा ॲलॅनीन किंवा आल्फा ॲमिनो प्रोपिऑनिक अम्‍ल असेही म्हणतात.

या संयुगातील सूत्रात * अशा खुणेने दाखविलेला अणू असममित (चार वेगवेगळ्या अणूंना जोडलेला कार्बन अणू) असल्यामुळे ते प्रकाशतः सक्रिय (विशिष्ट प्रतलात कंपन पावणाऱ्या प्रकाशाचे म्हणजे ध्रुवित प्रकाशाचे प्रतल डावीकडे वा उजवीकडे वळवू शकणारे → प्रकाशकी) असून त्याचे दक्षिणवलनी (प्रतल उजवीकडे वळविणारा, +) व वामवलनी (डावीकडे वळविणारा, -) असे दोन प्रकाशीय समघटक (तेच घटक असलेले पण गुणधर्म व रेणूंची संरचना निराळी असलेले प्रकार) असतात.

दक्षिणवलनी समघटक १८८८ मध्ये व्हाइल यांनी रेशमातील प्रथिनाचे जलीय विच्छेदन करून (पाण्याच्या विक्रियेने घटक द्रव्ये वेगळी करून) मिळविला. फिशर आणि स्किटा यांनी १९०१ मध्ये त्याची संरचना व विन्यास (अणूंची मांडणी) ही निश्चित केली. विन्यासाच्या दृष्टीने ॲलॅनिनाचे L व D असे दोन-समघटक असून त्यांचे विन्यास खाली दिले आहेत.

L (+) ॲलॅनीन 

D (+) ॲलॅनीन 

    

ग्‍लायसिनाप्रमाणेच बहुतेक सर्व प्रथिनांमध्ये ते आढळते. जिलेटीन व झाइनामध्ये (मक्यामध्ये असणाऱ्या एका प्रथिनामध्ये) ते ९-१०% असते. याचे स्फटिक सुईसारखे व वर्णहीन असून ते तापविल्यास २९७से. तापमानास विघटन पावून (घटक द्रव्ये वेगळी होऊन) वितळतात.

२५से. तापमानाला L-ॲलनिनाचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत.

 

pK1(COOH) : २·३४ pK2(NH+) : ९·६९

 

समविद्युत् भार बिंदू : ६·००

 

प्रकाशीय वलन  

(α)Dपाण्यात १·८

     

(α)D५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्‍ल +१४·६

 

विद्राव्यता : (ग्रॅ./१०० मिलि. पाणी) १६·५१ 

वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्‍ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पाहावा.

ॲस्पार्टिक अम्‍लापासून [COOH-CH2·CH(NH2)·COOH] शरीरात ॲलॅनीन तयार होते. तसेच पायरूव्हिक अम्‍लापासून (CH3·CO·COOH) ॲमिनो सक्रमण (स्थानांतरण) होऊन त्याचे जैव संश्लेषण (सजीवांत घटक द्रव्यांपासून आवश्यक तो पदार्थ तयार करण्याची क्रिया) होते. त्यामुळे शरीरात प्रथिनांपासून कार्बोहायड्रेट व कार्बोहायड्रेटांपासून प्रथिने तयार होण्यास मदत होते.

आल्फा ॲमिनोइथेन सल्फॉनिक अम्‍ल, आल्फा ॲमिनो आयसोब्युटिरिक अम्‍ल, ग्‍लायसीन व सेरीन ही अम्‍ले आल्फा ॲलॅनिनाची प्रतिरोधक (परस्परास विरोध करणारी) आहेत.

या अम्‍लांच्या उत्पादनाकरिता स्ट्रेकर यांनी १८५० मध्ये सिद्ध केलेली सायनोहायड्रीन संश्लेषण पद्धत वापरतात.

CH3·CHO

HCN

→ 

NH2

ॲसिटाल्डिहाइड

     

ॲलॅनीन

या संयुगाचा दक्षिणविन्यासी (D) समघटक वामवलनी (-) आहे. त्याचे अस्तित्व काही सूक्ष्मजंतूंच्या कोशिकाभित्तींमध्ये (पेशींच्या भितींमध्ये) व पेप्टाइडांमध्ये आढळते. बीटा ॲलॅनीन या संयुगाचे सूत्र NH2·CH2·CH2·COOH असे असून त्यास बीटा ॲमिनो प्रोपिऑनिक अम्‍ल असेही म्हणतात. याचे अस्तित्व स्‍नायूंमधील कार्नोसीन व ॲनसेरीन या पेप्टाइडांमध्ये असते. को-एंझाइम-एयाचा [→ एंझाइमे] घटक असलेले पँटोथिनिक अम्‍ल हे बीटा ॲलॅनिनापासून संश्लेषित होते.

पहा : ॲमिनो अम्‍ले.

हेगिष्टे, म. द.