अलकनंदा : उत्तरप्रदेश राज्याच्या गढवाल-हिमालय प्रदेशातील गंगा नदीची उपनदी किंवा गंगेचा आद्यप्रवाह. कामेट शिखरावरून वाहत येणाऱ्‍या विष्णुगंगा (धौली) आणि सरस्वती या दोन नद्यांच्या जोशीमठ या ठिकाणी झालेल्या संगमास आणि नंतरच्या प्रवाहास ‘अलकनंदा’ म्हणतात. या नदीला कर्णप्रयाग गावानजीक पिंडर नदी येऊन मिळते. तेथून तेहरी-गढवाल प्रदेशातून पश्चिमेकडे वाहत जात असता रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग गावानजीक तिला अनुक्रमे मंदाकिनी (कालिगंगा) आणि भागीरथी नद्या येऊन मिळतात. अलकनंदा-भागीरथी यांचा संयुक्त प्रवाह ‘गंगा-भागीरथी’ अथवा ‘गंगा’ नावाने ओळखला जातो.

 

सु. १२० किमी. वाहणारी ही नदी प्राचीन साहित्यात अत्यंत पवित्र मानली गेली असून या नदीकाठी बद्रीनाथ, भीमशिला, मानसोद्भव, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग इ. अनेक तीर्थस्थाने आहेत.

 

हिमालयात आज ३,९०० मी. वरील प्रदेशात हिमनद्या उत्पन्न होत असल्या, तरी अलकनंदेजवळ २,१०० मी. उंचीवर काही हिमोढ आढळतात.

 

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास