अर्व्हिंग, सर हेन्री : (६ फेब्रुवारी १८३८–१३ ऑक्टोबर १९०५ ). प्रख्यात इंग्रज अभिनेते. मूळ नाव जॉन हेन्री ब्रॉड्रिब. कींटन, सॉमरसेट येथे जन्म. लंडन येथे शिक्षण. प्रारंभी कारकुनाची नोकरी केली. १८५६ मध्ये रंगभूमीवर प्रथम पदार्पण. १८७१ मध्ये द बेल्स नाटकातील मॅथीयासच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड यश लाभले. १८७८ ते १९०३ या कालावधीत ‘लायसिअम’ नाट्यगृहाचे ते व्यवस्थापक होते. त्यांनी एलेन टेरी या अभिनेत्रीसमवेत केलेल्या भूमिकांनी इंग्रजी रंगभूमी गाजवली. हॅम्लेट, शायलॉक, ऑथेल्लो, आयागो, बेकेट, मेफिस्टोफेलिस इ. त्यांच्या गाजलेल्या भूमिका. आकर्षक व्यक्तिमत्त्व, भूमिकांच्या आकलनाबाबतचा स्वतंत्र व नावीन्यपूर्ण दृष्टिकोन व अद्भुतरम्य, ठाशीव अभिनयशैली ही त्यांची वैशिष्ट्ये. आवाज व हालचाली यांच्या ठराविक लकबी असूनही ते तत्कालीन अभिनेत्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जात. अर्व्हिंगनी रंगमंचावरील नेपथ्य व प्रकाशयोजना यांत क्रांतिकारी बदल घडविले व शेक्सपिअरचीनाटके नव्या धर्तीने, नेपथ्यासह सादर केली. त्यांच्या नाट्यसंस्थेने अमेरिकेचे आठ दौरे केले. ‘सर’ हा किताब मिळवणारे ते पहिलेच इंग्रज अभिनेते होत (१८९५). वेस्टमिन्स्टर ॲबे येथे दफन.
इनामदार, श्री. दे.
“