आंडाळ : (सु. ८ वे शतक). एक तमिळ कवयित्री. ‘आळवार’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बारा वैष्णव संतांपैकी ती एक होय. आंडाळचे वडील पॅरियाळवार हेही बारा आळवारांपैकी एक होते. त्यांना बागेतील तुळशीजवळ ती सापडली. त्यांनी तिचे गोदा नाव ठेवून तिला स्वत:च्या मुलीप्रमाणे वाढविले. मदुरेजवळील श्रीविल्लिपुत्तूर येथे श्रीकृष्णावर (श्रीरंगनाथावर) निस्सीम प्रेम करीत ती वाढली. आपण कृष्णाची पत्नी आहोत, अशा श्रद्धेने ती आजन्म अविवाहित राहिली. श्रीरंगनाथमूर्तीशी तिचे लग्न होताच ती त्या मूर्तीत विलीन झाली, अशी पारंपरिक कथा आहे. देवालयातील कृष्णमूर्तीसाठी तयार केलेल्या पुष्पमाला ती प्रथम स्वतःच्या गळ्यात घाली. एकदा हे पॅरियाळवारांनी पाहिले परंतु कृष्णाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, की आंडाळचे कृत्या त्याला आवडते व ती त्याची पत्नी आहे. तेव्हापासून ते तिला ‘आंडाळ’(म्हणजे जगाला तारणारी) म्हणू लागले. तिच्याबाबत अनेक अद्भुतकथा व आख्यायिका प्रचलित आहेत. ⇨ आळवार संतांनी विष्णूस उद्देशून रचिलेल्या चार हजार पद्यांचा संग्रह नालायिर-दिव्यप्रबंधम् नावाने प्रसिद्ध आहे. त्यात आंडाळचे ‘तिरुप्पावै’ आणि ‘नाच्चियार-तिरुमोळि’ हे दोन प्रबंध आहेत. भक्तीची उत्कटता आणि उच्च प्रतीचे काव्य तिने रचिलेल्या प्रबंधांत आढळते. स्त्रीहृदयातील उत्कट प्रेम अत्यंत हळूवार स्वरूपात तिच्या प्रबंधांत व्यक्त झाले आहे. ‘तिरुप्पावै’ हे तीस पद्यांचे लघुकाव्य आहे. त्यात आंडाळने स्वत:ला एक गोपी, श्रीविल्लिपुत्तरला गोकुळ, तेथील देवळातील भगवंताला साक्षात कृष्ण आणि आपल्या मैत्रिणींना गवळणी मानले. मार्गशीर्ष महिन्यात कठीण व्रत आचरून कृष्ण पतिरूपात पावल्याची तिने त्यात कल्पना केली आहे. मार्गशीर्ष महिन्यात तमिळनाडूमधील अविवाहित वैष्णवकन्या आजही पहाटे आंघोळ करून मोठ्या श्रद्धेने या काव्याचा पाठ करतात. या लघुकाव्यावर प्राचीन वैष्णव आचार्यांची पुष्कळ विवरणेही उपलब्ध आहेत.
‘नाच्चियार-तिरुमोळी’या काव्यात सखीभावाने लिहिलेली १४३ गूढगुंजनपर पद्ये आहेत. गूढ प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अंत:करणातून उत्स्फूर्तपणे ती आविष्कृत झालेली असून त्यांचे स्वरूप भावगीतात्मक आहे. यांतील एका पद्यात आंडाळ श्रीकृष्णाच्या शंखास विचारते. ‘समुद्रात उत्पन्न झालेल्या शुभ्रशंखा, मी तुला विचारते, की कुवलयापीडदैत्याच्या दंतांना मोडणाऱ्या माधवाच्या श्रीमुखाचा रस व सुगंध कसे आहेत? त्याच्या मुखाला कापुराचा गंध येतो का? की कलमपुष्पांचा गंध येतो? प्रवाळाप्रमाणे आरक्त असलेले ते ओठदेखील गोड आहेत काय?’ दक्षिणेकडील मीरा म्हणून तिचा गौरव केला जातो. वैष्णवांच्या देवालयांतील तसेच घरांतील नित्य-उपासनेत तिच्या ‘तिरुप्पावै’मधील पद्यांना मानाचे स्थान आहे. ‘नाच्चियार-तिरुमोळि’मधील ‘वारणम-आइरम्’ नावाच्या दशकाचा पाठ वैष्णव कुटुंबांत विवाहप्रसंगी आवडीने म्हटला जातो.
वरदराजन्, मु. (इं.) शिरोडकर, द. स. (म.)