आइसलँडिक साहित्य : आइसलँडिक साहित्याचा प्रारंभ नवव्या-दहाव्या शतकात झाला. भाषिक द्दष्टीने प्राचीन आइसलँडिक साहित्य नॉर्वेजियन साहित्याशी अतूटपणे निगडित आहे. आरंभीच्या आइसलँडिक साहित्यात ‘एड्डा’ आणि ‘स्कॉल्डिक’ काव्यप्रकार व त्यानंतर रचिलेल्या ‘सागा’ या साहित्यप्रकारांचा अंतर्भाव होतो. एड्डा हा काव्यप्रकार अँग्लो-सॅक्सन तसेच आरंभीच्या जर्मानिक काव्यप्रकारांशी मिळताजुळता आहे. स्कॉल्डिक काव्यप्रकाराचे स्वरूप आयरिश काव्यप्रकाराला जवळचे आहे.
आइसलँडिक साहित्याचे कालखंड स्थूलमानाने पुढीलप्रमाणे पडतात : (१) एड्डा, स्कॉल्डिक आणि सागा ह्या साहित्यप्रकारांचा कालखंड (१२ वे ते १४ वे शतक), (२) धार्मिक साहित्याचा कालखंड (१४ वे ते १६ वे शतक), (३) स्वच्छंदतावादी साहित्याचा कालखंड (१८ वे ते १९ वे शतक) आणि (४) वास्तववादी साहित्याचा कालखंड (१९ वे ते २० वे शतक). एड्डा काव्यप्रकारातील कविता निश्चितपणे दहाव्या शतकाच्या आगेमागे रचिलेल्या असून त्या मौखिक परंपरेने जतन केल्या गेल्या. बाराव्या शतकात त्या लेखनबद्ध करण्यात आल्या. सागाप्रकारचे साहित्यही ह्याच सुमारास लेखनबद्ध केलेले असले. तरी ते त्यापूर्वी कित्येक शतके आधी रचलेले असावे. स्कॉल्डिक काव्य प्रगल्भ व आलंकारिक आहे. चौदाव्या शतकानंतरच्या आइसलँडिक साहित्यास अवनतीच्या अवस्थेतून जावे लागले. प्राचीन आइसलँडिक साहित्यातील सागासाहित्यात तसेच काव्यप्रकारांत एकप्रकारची वास्तववादी प्रवृत्ती व्यक्त झालेली आढळून येते. तथापि चौदाव्या शतकापासून मात्र ही प्रवृत्ती कल्पनारम्यतेचा आणि शृंगाराच्या हव्यासामुळे मागे पडली. आइसलँडमध्ये डॅनिश राजवट आली (१२६२). त्यामुळेच काही अंशी आइसलँडिक साहित्याची अवनती घडून आली. ह्या अवनतीचे आणखी एक कारण म्हणजे सर्व यूरोपात चौदाव्या शतकात प्लेगची साथ पसरली आणि त्यापाठोपाठ दुष्काळही पडला. त्यामुळे तेथील जीवन उद्ध्वस्त झाले. सोळाव्या शतकापर्यंत निर्माण झालेले धार्मिक साहित्य मात्र त्यातल्या त्यात चांगल्या प्रतीचे होते. सोळाव्या शतकात डॅनिश राज्यकर्त्यांनी आइसलँडवर धर्मसुधारणेची चळवळ लादली. ह्या काळापर्यंत आइसलँडमध्ये संपूर्णपणे कॅथलिक पंथ प्रचलित होता. धर्मसुधारणेची चळवळ व राजकीय पारतंत्र्य यांचा परिणाम होऊन आइसलँडिक साहित्य आणखीच निकृष्टावस्थेस पोहोचले. काव्यगुण आणि भावनेची सखोलता यांच्या बाबतीत कॅथलिक पंथाचे धार्मिक काव्य समृद्ध होते. ह्या काव्यावर धर्मसुधारणेमुळे संपूर्णतया बंदी घालण्यात आली आणि त्याऐवजी कट्टर ल्यूथरपंथीयांचे काव्य प्रसृत होऊ लागले. अर्थातच हे काव्य, शैली आणि इतर काव्य गुण यांच्या अभावामुळे नीरस ठरले. अठराव्या शतकाच्या मध्यावधीत ब्जार्नी थोरारेन्सन (१७८६–१८४१) याने स्वच्छंदतावादी प्रवाह आइसलँडिक साहित्यात आणला तथापि त्याचा ह्या साहित्यावर विशेष प्रभाव पडलेला दिसून येत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी वास्तववाद नव्या व वेगळ्या स्वरूपात आइसलँडिक साहित्यात पुन्हा अवतीर्ण झाला आणि त्याचा प्रभाव विसाव्या शतकातही टिकून राहिलेला दिसतो.
आरंभीचे साहित्य : आइसलँडचे आरंभीचे गद्य-पद्य साहित्य सु. दहाव्या शतकापासून प्रसिद्ध आहे. प्राचीन आइसलँडिक कवितांचा बराचसा भाग सतराव्या शतकाच्या मध्यास हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध झाला असून तो द पोएटिक एड्डा किंवा एल्डर एड्डा ह्या नावाने ओळखला जातो. दुसऱ्या प्रकारच्या एड्डा गद्य असून त्या गद्य–एड्डा किंवा यंगर एड्डा म्हणून ओळखल्या जातात. एके काळी परस्परांशी निगडित असलेल्या नॉर्वेजियन व आइसलँडिक भाषांतील अभिजात साहित्यात यातील कवितांना महत्त्वाचे स्थान आहे. एल्डर एड्डातील बहुतेक काव्यरचना आइसलँडमध्ये झालेली असली, तरी ती मूळच्या नॉर्वेजियन लोकांनीच केलेली आहे.
यातील कवितांचे दोन भाग पडतात. पहिल्यात वीरगीते असून दुसऱ्यात पौराणिक कविता आहेत. ही वीरगीते विविध शैलीत लिहिलेली असून त्यांच्या रचनेचा कालही वेगवेगळा आहे. मौखिक परंपरेने ती चालत आली आहेत. बहुसंख्य गीतांचा कल वीरांचे शौर्यवर्णन करण्याकडे आहे. त्यातील अनेक गीतांचे मूळ जर्मानिक काव्यात आहे. कारण ती गीते ज्या विषयांच्या आधारे रचिलेली आहेत, त्या विषयांचा कालखंड चौथे ते सहावे शतक हा असून ह्या काळातच काही विशिष्ट जर्मानिक जमाती आइसलँडमध्ये येऊन स्थायिक झाल्या होत्या. त्यामुळे या एल्डर एड्डातील अनेक वीरनायक आणि त्यांच्यासंबंधीच्या कथावस्तू यांचे मध्ययुगीन जर्मन काव्यातील वीरांशी आणि कथावस्तूंशी साम्य आढळते. तसेच ख्रिस्तपूर्व काळातील नॉर्डिक वंशाच्या लोकांचे यूरोपमधील इतर देशांतील लोकांशी घनिष्ठ संबंध असावेत हेही त्यांवरून समजते. आइसलँडिकमधील वीरगीतांचा फक्त काही भागच एल्डर एड्डामध्ये संगृहीत झालेला आहे. इतर काही वीरगीतांच्या अपूर्णतेवरून त्यांचा बराच मोठा भाग नष्ट झाला असावा असे वाटते.
एल्डर एड्डातील पद्यमय मिथ्यकथा नॉर्डिक देवतांविषयीच्या आहेत. त्यांतील काही देवता ‘ओडिन’ नावाच्या युद्धदेवतेसारख्या प्रलयंकर आहेत, तर ‘बाल्डर द गुड’सारख्या देवता येशू ख्रिस्ताच्या प्रतीक ठरतात. ह्या सर्वच मिथ्यकथांमध्ये व्हायकिंग कालखंडातील (९ वे ते ११ वे शतक) युद्धसद्दश आणि अस्थिर वातावरणाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. याचे कारण त्यांतील बऱ्याच मिथ्यकथांचा उगम नॉर्वे, आइसलँड आणि नॉर्स लोकांच्या वसाहतींत झालेला आहे. यातील अत्यंत प्रसिद्ध मिथ्यकथा म्हणजे ‘Voluspa’ (इं. शी. सिबिल्स प्रॉफेसी) ही असून तीत जगाच्या उत्पत्तीपासून तो देवाचे पतन होऊन जग नष्ट होईपर्यंतचा इतिहास सिबिलच्या तोंडून वदविला आहे. ही काव्ये प्रामुख्याने कथात्मक असून त्यांतून तत्कालीन जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञान यांचे दर्शन घडते.
नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात नॉर्वे-आइसलँडमध्ये सर्वस्वी भिन्न स्वरूपाची काव्यरचनाही करण्यात आली. ज्याला ‘स्कॉल्डिक काव्य’ म्हणण्यात येते ते आइसलँडमधील स्कॉल्डकवींनी रचिलेले असून ते एड्डाकाव्याहून केवळ साहित्यप्रकार म्हणूनच नव्हे, तर शब्दकळेच्या द्दष्टीनेही भिन्न आहे. एड्डाकाव्य तसे सुबोध आणि स्पष्ट आहे, तर स्कॉल्डिक काव्य गुंतागुंतीचे व आलंकारिक आहे. एड्डा रचणाऱ्या बहुतेक कवींची नावे अज्ञात आहेत, तर बहुतांश स्कॉल्डकवींची नावे ज्ञात आहेत. यातील आरंभीचे काही कवी जरी नॉर्वेतील असले, तरी ह्या काव्यप्रकाराचा खराखुरा कलात्मक विकास आइसलँडमधील कवींनीच घडवून आणला. इजील स्कालग्रीमसन हा सर्वश्रेष्ठ स्कॉल्डकवी (सु. ९१०–९९०) असून त्याने रचिलेले Hofuolausn (इं. शी. हेड रॅन्सम) हे काव्य अतिशय प्रसिद्ध आहे. हे काव्य त्याने आपल्या जीवनरक्षणार्थ, शत्रूची प्रशंसा करण्यासाठी लिहिलेले आहे.बहुतांश स्कॉल्डिक कविता नॉर्वेतील राजांच्या प्रशंसेसाठी लिहिलेली आहे. त्यांतील जवळजवळ सर्वच राजांनी ह्या कवींना आश्रय दिलेला होता. ह्या काव्यांत राजांच्या कर्तृत्वाची वर्णने आलेली आहेत. पुष्कळ वेळा ती दुर्बोधही झालेली आहेत. तथापी इतिहासकारांना ती इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून फार मोलाची वाटतात.
ह्या आरंभीच्या साहित्याची आणखी एक महत्त्वपूर्ण शाखा म्हणजे गद्य सागांची होय. ह्या सागा नॉर्वे व आइसलँडमधील राजांच्यासंबंधी अथवा जर्मानिक आख्यायिकांतील वीरपुरुषांवर रचिलेल्या आहेत. ह्या सागांचे अनेक प्रकार असले, तरी त्यांतील ‘आइसलँडर्स सागा’ अथवा ‘क्लॅन सागा’ म्हणजे कुल अथवा घराण्याबाबतच्या सागा अत्यंत महत्त्वाच्या होत. तत्कालीन गोंधळाच्या व अस्थिर परिस्थितीत कुल अथवा घराणे हाच काय तो एकमेव स्थिर घटक होता आणि व्यक्तीपेक्षा कुलाचे किंवा घराण्याचे महत्त्व व अधिकार मोठे मानले जात होते. म्हणूनच कुल-सागांमधून व्यक्तीचे सविस्तर इतिवृत्त वर्णिलेले असले, तरी त्याचा केंद्रबिंदू कुल अथवा घराणे हाच असल्याचे आढळून येते.
ह्या सागा रचणाऱ्यात स्नॉरी स्टर्लसन (११७९–१२४१) हा विशेष प्रसिद्ध आहे. तो आइसलँडमधील एका सेनाप्रमुखाचा मुलगा होता. त्याने नॉर्वेतील राजांवर आपल्या सागा रचिलेल्या आहेत. त्याने सर्वप्रथम रचिलेली ‘द सागा ऑफ सेंट ओलाफ’ या इंग्रजी शीर्षकार्थाची सागा त्याच्या Heimskringla (इं. शी. सर्कल ऑफ द वर्ल्ड) ह्या सर्वोत्कृष्ट सागासंग्रहात समाविष्ट केली गेली आहे. ह्या संग्रहात नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत होऊन गेलेल्या नॉर्स राजांची कथा वर्णिलेली आहे.
आइसलँडर्स सागा दहाव्या आणि अकराव्या शतकांमधील आइसलँडिक आख्यायिकांत आलेल्या वीरपुरुषांच्या जीवनावर रचलेल्या आहेत. त्यांच्या रचनेचा काळ तेरावेचौदावे शतक असावा, असे मानतात. तथापि तत्पूर्वीही त्या रचण्यात आल्या नाहीत, असे म्हणण्यास निश्चित पुरावा उपलब्ध नाही. ठसठशीत व्यक्तिचित्रण आणि मानवी जीवनाची शोकात्मकता यांची अतिशय मार्मिक जाणीव ह्या सागांत आढळून येते. यांतील सर्वांत प्राचीन सागा कदाचित Fostbroeora (इं. शी. सागा ऑफ द फॉस्टर ब्रदर्स) ही असावी. तिची रचना जरी विस्कळित असली, तरी तीत आइसलँडच्या उत्तरेकडील भागातील लोकांच्या स्वामिनिष्ठेचे आणि शौर्याचे आदर्श स्पष्टपणे व्यक्त झालेले आहेत.
नाटक : आइसलँडिक साहित्यात नाटक ह्या साहित्यप्रकारास काही वैशिष्ट्यपूर्ण स्थान असल्याचे दिसत नाही. नॉर्वेतील इब्सेनच्या तोडीचा एकही नाटककार तेथे झालेला नाही. त्यातल्यात्यात योहान सिगरयोन्सॉन (१८८०–१९१९) हा प्रसिद्ध नाटककार होय. त्याचे Fjalla Evindur (१९११, इं. इव्हिंड ऑफ द हिल्स) हे प्रभावी नाटक असून त्याचे यूरोपातील अनेक देशांत प्रयोग झाले.
कादंबरी : एकोणिसाव्या शतकात आइसलँडिक साहित्यात परिवर्तन घडून आले आणि त्याबरोबर कादंबरीचा प्रवेश त्या साहित्यात झाला. ह्या शतकातील मोठा कादंबरीकार योन थोरॉडसेन (१८१९–१८६८) हा होय. ह्या काळात वास्तववादी प्रवाह विशेष प्रभावी असल्याचे दिसून येते. ह्या वास्तववादाचा ख्यातनाम पुरस्कर्ता म्हणजे योनास यौनास्सॉन (१८५६–१९१८) हा होय. तो उत्तरेकडच्या भागातील एक पाद्री होता आणि त्याने आइसलँडमधील ग्रामीण जीवनाची अवकळा व अलगपणा यांसंबंधी अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या. याच कालखंडातील आणखी काही उल्लेखनीय कादंबरीकार म्हणजे आयनर एच्. क्वारन, गन्नार गन्नारसॉन (१८८९–), योन ट्रौस्टी (१८७३–१९१८) आणि जी. जी. हॅगलिन (१८९८–) हे होत.
हाल्डोर किल्यान लाक्सनेस (१९०२–) हा विसाव्या शतकातील थोर कादंबरीकार असून त्याला १९५५ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. Pu vinviour hreini (१९३१, इं. भा. सल्का व्हल्का, १९३६), Sjalfstae folk (१९३४–३५, इं. भा. इंडिपेंडंट पीपल, १९४५) आणि Atomstooin (१९४८, इं. भा. द ॲटम स्टेशन) ह्या त्याच्या अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या असून त्यांची अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झालेली आहेत.
⇨लाक्सनेसची अनेक कथानके आइसलँडमधील कुळवाडी आणि कोळी लोकांच्या जीवनावर आधारलेली आहेत. त्याच्या कथानकांचा दुसरा आधार म्हणजे आइसलँडचा इतिहास. Islandsklukkan (१९४३, इं. शी. द बेल ऑफ आइसलँड), Hio ly3wuoa man (१९४४, इं. शी. ब्राइट मेडन) आणि Eldur i kaupinhafn (१९४६, इं. शी. फायर इन कोपनहेगन) ह्या अठराव्या शतकातील आइसलँडच्या जीवनावर आधारलेल्या त्याच्या साहित्यकृती म्हणजे एकाच दीर्घ कादंबरीचे तीन भाग होत. Gerpla (१९५२, इं. शी. हिरोइका) ही त्याची एक अत्यंत प्रभावी आणि तुच्छतावादी मनोवृत्तीची साहित्यकृती असून ती अकराव्या शतकातील आख्यायिकांवर आधारलेली आहे.
लघुकथा : फार मोठे साहित्यगुण असलेले लघुकथालेखक आइसलँडिक साहित्यात निर्माण झालेले नाहीत. एकोणिसाव्या शतकात गेस्टूर पाल्सन (१८५२–१८९१) याने उपरोधपर कथा लिहिल्या. आइसलँडिक गद्यावर त्याच्या ह्या औपरोधिक शैलीचा कायमचा ठसा उमटलेला आहे. योनास योनास्सॉन यानेही लघुकथालेखन केलेले आहे तथापि तो कादंबरीकार म्हणून विशेष प्रसिद्ध आहे.
काव्य : काव्याच्या क्षेत्रात आइसलँडिक साहित्य अनेक शतके आघाडीवर असून ते विशेष समृद्धही आहे. आरंभीच्या एड्डा आणि स्कॉल्डिक काव्याव्यतिरिक्त आइसलँडिक कवींनी इतरही विविध काव्यप्रकार विकसित केले. तेरावे शतक आणि धर्मसुधारणेची चळवळ ह्या दरम्यानच्या काळात धार्मिक स्वरूपाच्या अनेक कविता रचिला गेल्या. त्यांतील काही कुमारी मेरी, धर्मप्रेषित आणि ख्रिस्ती संत यांच्या स्तुतिपर होत्या. त्यांतील विख्यात कविता म्हणजे ‘Lilja’ (इं. शी. लिपी) ही असून ती चौदाव्या शतकात एइस्टेइन आस्ग्रीमसन (मृ. १३६१) ह्या दक्षिण विभागातील ख्रिस्ती संताने रचिली आहे. कुमारी मेरीला उद्देशून लिहिलेल्या उत्कृष्ट कविता म्हणजे योन पाल्सन (सु. १३९०–१४७१) याची ‘Mariulykill’ (इं. शी. काव्हिस मारिआ) आणि कुणा एका अज्ञात कवीने लिहिलेली ‘Mariugratr’ (इं. शी. वीपिंग ऑफ मेरी) ह्या होत. सोळाव्या शतकात आइसलँडवर धर्मसुधारणेची चळवळ लादली गेली आणि त्यामुळे कॅथलिक पंथाचे काव्य संपुष्टात आले. ह्या काळात योन आरासन हा होलार येथील केंद्राचा कॅतलिक पंथीय शेवटचा बिशप होता. त्याचा १५५० मध्ये शिरच्छेद करण्यात आला. तो केवळ एक प्रमुख राजकीय पुढारी नव्हता, तर एक उत्कृष्ट कवीही होता. त्याची उपलब्ध कविता प्रामुख्याने धार्मिक स्वरूपाची असली, तरी ती दर्जेदार आहे. आरंभीच्या ल्यूथरपंथीय बिशपांनी ल्यूथरप्रणीत डॅनिश व जर्मन स्तोत्रे आइसलँडिकमध्ये भाषांतरित करण्याचा प्रयत्न केला. आधीच्या धार्मिक काव्याच्या तुलनेने ही कविता अगदीच मामुली दर्जाची आहे.
सतराव्या शतकात हॉलग्रींम पीटरसन (१६१४–१६७४) नावाच्या एका गरीब व रुग्णावस्थेतील पाद्र्याने आइसलँडिक भाषेत अत्यंत लोकप्रिय झालेला एक काव्यग्रंथ लिहिला. ह्या काव्यग्रंथाचे नाव Passiusalmar (इं. शी. हिम्स ऑन द पॅशन ऑफ क्राइस्ट) हे होय. याशिवाय इगर्ट ओलाफसन (१७२६–१७६८) आणि योन थोरलाकसन (१७४४–१८१९) हे अठराव्या शतकातील उल्लेखनीय कवी होत.
एकोणिसाव्या शतकातील पहिला थोर कवी म्हणजे ब्जार्नी थोरारेन्सन हा होय. तो न्यायाधीश व शेरीफ होता. आइसलँडिक साहित्यात स्वच्छंदतावाद आणण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते. योनास हॉलग्रीमसन (१८०७–१८४५) आणि स्टेनग्रीमुर थोर्स्टाईनसन (१८३१–१९१३) हे दोन कवी निसर्गाच्या भावपूर्ण वर्णनांसाठी प्रसिद्ध होते. हॉलग्रीमसनचा प्रभाव विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत टिकून होता. थोर्टाईनसनची निसर्गवर्णने, प्रेमगीते आणि उपरोधपूर्ण लघुकाव्ये विशेष प्रसिद्ध आहेत. माट्टीयास योक्कमस्सॉन (१८३५–१९२०) ह्या कवीने ऐतिहासिक विषय आणि प्राचीन छंदप्रकार यांची आपल्या कवितांसाठी निवड केली. व्हाल्डिमीर ब्रिएम (१८४८–१९३०) हा धार्मिक स्वरूपाची कविता लिहिणारा कवी होता. त्याच्या ‘साँग्ज ऑफ द बायबल’ या शीर्षकार्थाच्या काव्याला अतिशय लोकप्रयता लाभली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पाउल ओलाफसन (१९२७-१९०५) आणि आओरस्टेइन इरलिंगसन (१८५८–१९१४) हे कवी विशेष पुढे आले. हे दोघेही विनोदी व उपरोधपूर्ण गीते लिहिण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते. ह्या दोघांची शैली वेगवेगळी असली, तरी ती अस्सल आइसलँडिक असून, ते त्यांच्या शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यानंतरच्या काळातील भावकविता लिहिणारे उल्लेखनीय कवी म्हणजे स्टीफन फ्रा व्हिटाडेल आणि योन हेगाल्सन हे होत. यानंतरच्या अनेक भावकवींपैकी आयनर बेनेडिक्टसन (१८६४–१९४०) आणि स्टीफन जी. स्टीफनसन (१८५३–१९२७) हे कवी शैलीच्या द्दष्टीने बोजड असले, तरी कल्पनाविलास आणि आशयघनता या द्दष्टीने उल्लेखनीय ठरतात.
संदर्भ : 1. Beck, R. History of Icelandic Poets 1800–1940, Ithaca (N.Y.), 1950.
2. Einarsson, B. A History of Icelandic Literature, New York, 1957.
3. Einarsson, S. History of Icelandic Prose Writers 1800-1940, Ithaca (N.Y.). 1948.
राघवन्, वीणा (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)
“