ॲस्परजिन : एक ॲमिनो अम्‍ल. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दाखविणारे सूत्र) C4H8O3N2. दुसरे नाव ॲमिनोसक्सिनामिक अम्‍ल. प्रकाशीय सक्रियतेनुसार (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या कंपनाचे प्रतल फिरविण्याच्या क्षमतेनुसार) याचे एल-ॲस्परजिन (प्रतल डाव्या बाजूस फिरविणारे) व डी-ॲस्परजिन(प्रतल उजव्या बाजूस फिरविणारे) असे दोन प्रकार आढळतात. त्यांपैकी एल-ॲस्परजिन हे अम्‍ल शतावरी (ॲस्परगॅस) या वनस्पतीच्या रसापासून व शिंबी (लेग्युमिनोजी) कुलातील वनस्पतींच्या मोड आलेल्या बियांपासून व्होक्लँ व रॉबीके यांनी शोधून काढले (१८०६). ते वनस्पतिजन्य प्रथिनांत आढळते. एडस्टीन या प्रथिनापासून जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे घटक सुटे करण्याने) मिळणाऱ्या पदार्थांपासून दामोदरन यांनी ॲस्परजिन वेगळे केले (१९३२). मॅलिक अम्‍ल व अमोनिया यांच्यापासून ॲस्परजिन संश्लेषित (घटक अणू किंवा रेणू अकत्र आणून रासायनिक संयोगाने तयार) करतात. त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन बॅरीमान यांच्या कार्बोबेंझॉक्सी पद्धतीने करतात. त्याची रासायनिक संरचना (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) पुढीलप्रमाणे आहे.

NH2

C=O

CH2

H2N –    C – COOH

H

एल-ॲस्परजिन

२५से. ला त्याचे भौतिकीय स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत :

pK1(COOH) :२.०२pK2(NH3+) : ८.८०

समविद्युत् भार बिंदू : ५.४१

प्रकाशीय वलन :

[α]Dपाण्यात -५.३

[α]D३ सममूल्य हायड्रोक्लोरिकअम्‍लात (१ लिटर पाण्यात१०९.५ ग्रॅ. हायड्रोक्लोरिक अम्‍ल असलेल्या विद्रावात)+३३.२विद्राव्यता (विरघळण्याचे वजनी प्रमाण) :

(ग्रॅ./१०० मिलि. पाण्यात) ३.११ (२८से. ला.).

वरील भौतिकीय स्थिरांकांच्या स्पष्टीकरणार्थ ‘ॲमिनो अम्‍ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा. 

ॲस्पार्टिक अम्‍लापासून ॲस्परजिनाचे जैव संश्लेषण होते हे माहीत आहे, पण हे संश्लेषण होताना होणारी संपूर्ण विक्रिया अद्यापि ज्ञात झालेली नाही. ॲस्परजिनाच्या रेणूतील –CO·NH2ऐवजी COOH गट आला म्हणजे ॲस्पार्टिक अम्‍ल बनते. त्यांची निनहायड्रिनाबरोबर विक्रिया केल्यास त्यापासून इतर ॲमिनो अम्‍लांपासून मिळणाऱ्या रंगापेक्षा निराळा असा तपकिरी रंग मिळतो. या अम्‍लाच्या अमाइड (–CO·NH2) गटापासून मुख्यतः वनस्पतींना नायट्रोजन उपलब्ध होतो.

२ॲमिनो–२ कॉर्बाक्सि–एथेन–सल्फॉनामाइड हे संयुग ॲस्परजिनप्रतिरोधक असून त्यामुळे शरीरात विपरीत विक्रिया घडू शकते.

डी-ॲस्परजिन हे प्युट्टी यांनी १८८६ मध्येव्हिक्सिया सटिव्हा  या वनस्पतीच्या मोडांपासून तयार केले. याची चव एल–ॲस्परजिनापेक्षा वेगळी असते. एल–प्रकारापेक्षा ते पाण्यात जास्त प्रमाणात विद्राव्य आहे. [α]Dक्षारीय (अल्कलीय) किंवा उदासीन (अम्‍लधर्मी वा क्षारधर्मी नसलेल्या) विद्रावात +५.४१.

पहा : ॲमिनो अम्‍ले. 

शिंगटे, रा. धों.