अभिव्यक्तिवाद : (एक्सप्रेशनिझम). कोणत्याही विषयाचा कलावंताला जो अंतःप्रत्यय येतो, त्याची प्रामाणिकपणे केलेली सारमय अभिव्यक्ती. एकाच कलाविषयाचा अंतःप्रत्यय भिन्नभिन्न कलावंतांना भिन्नभिन्न प्रकारे येऊ शकतो. तो अंतःप्रत्यय कलाविषयाच्या इंद्रियगोचर वास्तविक स्वरूपाहून वेगळा असू शकतो. हे वेगळेपण व्यक्त करण्याकरिता वास्तविक विषयाचे चित्रण वा आविष्कार वास्तविकापासून दूर गेलेला असतो. या आविष्कारात मूळ स्वरूप अंशतः असते, किंवा बदललेले असते, वा त्यात भर पडलेली असते, किंवा तो आविष्कार पुष्कळदा विपरीतही असतो. हा भेद वा दूरत्व वा अधिक भर वा वैपरीत्य किंवा वैलक्षण्य कलावंताच्या अंतःप्रत्ययाला मूर्तिमंत करतो. कलाविषयाच्या वास्तविक स्वरूपाला तो पूर्णतः बाजूला सारत नाही.  वास्तविक विषयाचा उत्कट भावनात्मक प्रत्यय कलारसिकाला येऊन तो कलाविष्कार त्यास पटतो. अशा प्रकारची अभिव्यक्तिवादी आविष्करणे चित्रकलेप्रमाणेच मूर्तिकला, वास्तुकला, संगीत व ललित साहित्य यांतही आढळून येतात. 

अभिव्यक्तिवाद हा ðदृक्प्रत्येयावादानंतरचा एक महत्त्वाचा कलासंप्रदाय होय. त्याचा उदय विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाला. ‘एक्सप्रेशनिझम’ ही संज्ञा प्रथम झ्यूल्यँ एर्व्हे या फ्रेंच चित्रकाराने १९०१ मध्ये वापरली. अभिव्यक्तिवादी कलाविशेषांची पूर्वपरंपरा ज्याप्रमाणे ग्र्यूनेव्हाल्ट (सु. १४७०-१५२८) व एल ग्रेको (१५४१-१६१४) यांच्या काही चित्राकृतींतील रूपविकृतीत दिसते, त्याप्रमाणे दृक्प्रत्ययवादाच्या कक्षेबाहेर जाणाऱ्या सेझान (१८३९-१९०६), रदाँ (१८४०-१९१६), गोगँ (१८४८-१९०३), व्हिन्सेंट व्हान गॉख (१८५३-९०), होड्लर (१८५३-१९१८), आँसॉर (१८६०-१९४९), एडव्हार्ट मुंक (१८६३-१९४४) व तूलूझ-लोत्रेक (१८६४-१९०१) यांच्या काही चित्रकलांविशेषांतही आढळते. या पूर्वपरंपरेचे स्वरूप ज्याप्रमाणे एकजिनसी नाही, त्याप्रमाणेच व कदाचित त्यामुळेच अभिव्यक्तिवादाचे स्वरूपही एकजिनसी नाही. आत्मनिष्ठ अभिव्यक्तिवादात कलावंत स्वतःच्या भावना, वस्तुसंबद्ध जाणिवा, व्यक्तिगत प्रतीके व वस्तुनिदर्शक प्रतिमा इत्यादींचा आविष्कार करतो. वस्तुनिष्ठ अभिव्यक्तीवादात, आत्मप्रत्ययाशी प्रामाणिक राहून वस्तूचे जाणवलेले सारव्यंजक स्वरूपच अभिव्यक्त करण्याचे धोरण असते. चित्रातील रेखादी घटकांपेक्षा पृष्ठघटकालाच (‘प्‍लेन’) महत्त्व देऊन रंग व आकार (‘फॉर्म’) यांचे केवलस्वरूपी किंवा अप्रतिरूप (‘ॲब्स्ट्रॅक्ट’) संयोजन करणारा व वस्तूच्या भौमितिक सारस्वरूपाला व्यक्त करू पाहणारा अप्रतिरूप अभिव्यक्तिवाद हा तिसरा प्रकारविशेष होय. विशेषतः  अमेरिकेत विकसित झालेल्या या वादाचे विवेचन पुढे विस्ताराने केले आहे. अभिव्यक्तिवादाच्या उपर्युंक्त वैशिष्ट्यांपैकी काहींची परिणती पुढे ðघनवादात वðअतिवास्तववादात झाली. या सर्व वादांवर फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचा परिणाम झालेला आहे.

जर्मनी हे अभिव्यक्तीवादाचे सर्वांत प्रभावी असे केंद्र होते. तेथील ड्रेझ्डेनचा ‘डि ब्रुक'(१९०३) व म्यूनिकचा ‘डेर ब्लो रायटर'(१९११) असे अभिव्यक्तिवादी चित्रकारांचे दोन संघ प्रसिद्ध आहेत. पहिल्या संघात एमील नोल्डे (१८६७-१९५६), किर्खनर (१८८०-१९३८), मॅक्स पेखस्टाइन (१८८१-१९५५), हेकेल (१८८३-    ) व श्मिट-रोटलुफ (१८८४-    ), हे प्रमुख चित्रकार होते. दुसर्‍या संघात याउलीन्स्की (१८६४-१९४१), कंड्यीन्‌स्कई (१८६६-१९४४), पॉल क्ले (१८७९-१९४०), फ्रांट्स मार्क (१८८०-१९१६) व शगाल (१८८९-    ) हे कलावंत प्रमुख होते.

अभिव्यक्तिवादाची तात्त्विक चर्चा जर्मन संघातील कलावंतांनी अधिक प्रमाणात केली. व्यक्तिगत कलावैशिष्ट्यांची विविधता आणि रूपभंजन व रूपविकृती या बाबतींत क्रांतिकारकता हे जर्मन अभिव्यक्तिवादाचे विशेष होत. जर्मन कलावंतांनी अभिव्यक्तिवादाला दृक्प्रत्ययवादाचा प्रतियोगी ठरवून, ‘प्रचलित आकारांची व संयोजनांची बंधने टाळून केलेला कलावंताच्या आत्म्याचा आविष्कार म्हणजे अभिव्यक्तिवाद’ असे मानले. फ्रेंच कलावंतांनी आकारविषयक प्रश्नांना महत्त्व दिले.

समाजवादी राष्ट्रांतील सर्व ललित कलांच्या ऐक्यावर भर देणारा पण अभिव्यक्तिवादी कलावंतांनी बर्लिन येथे स्थापन केलेला ‘नोव्हेंबर ग्रूप’ (१९१८) हा संघ उल्लेखनीय आहे. मॅक्स पेखस्टाइन व सीझर क्लाइन हे या संघाचे प्रवर्तक होते.

चित्रकला : अभिव्यक्तिवादी चित्रकलेत चित्रकाराची आंतरिक ऊर्मी कोणत्याही प्रचलित संकेतांनी नियंत्रित केली जात नाही. रंग, रचना, आकृतिबंध यांच्या उपयोजनेत स्वयंसिद्धता आढळते. चित्रकाराचा विमुक्त आत्मप्रत्यय, चित्रातील रंगीत पृष्ठभागाचे साकल्यात्मक स्वरूप व चित्राचा भावनात्मक परिणाम वाढविणारे रंग व विक्षिप्त आकार हे अशा चित्रकलेचे विशेष होत. शहरातील गर्दीचे देखावे व इमारती, आदिम मानव, शोषित मानव, पादचारी, विदूषक, नट व पशू यांसारखेही विषय  अभिव्यक्तिवादी चित्रकारांनी हाताळले. कोरीव काष्ठमूर्तीप्रमाणे केलेले मानवी चित्रण (किर्खनरचे फाइव्ह विमेन ऑन द स्ट्रीट हे चित्र,१९१३), धार्मिक विषयांची अस्वस्थ करणारी रूपविकृती (एमील नोल्डेच्या मारिया इजिप्तिका या त्रिपुटचित्राची डावी बाजू, १९१२) आणि नाजूक पण विक्षिप्त व स्वैर रचना (पॉल क्लेचे ट्विटरिंग मशीन,१९२२) हेही अभिव्यक्तिवादी चित्रकलेचे विशेष आहेत. फ्रान्समधील मातीस (१८६९-१९५४), र्‌वो (१८७१-१९५८), व्ह्‌लामँक (१८७६-१९५८), दरँ (१८८०-१९५४),ð पिकासो (१८८१-१९७३), ग्रोमेअर (१८९२-    ), सूटीन (१८९४-१९४३), ग्रूबर (१९१२-४८) व ब्यूफे (१९२८-    ) हे जर्मनीतील बेकमान (१८८४-१९५०), डिक्स (१८९१-    ) व ग्रोस (१८९३-१९५९) अमेरिकेतील मॅक्स वेबर (१८८१-१९६१) व पास्कँ (१८८५-१९३०), आणि बेल्जममधील गुस्ताव्ह दे श्मेट (१८७७-१९४३), फ्रिट्स बर्ग (१८८३-१९३९), मासेरेल (१८८९-    ) इ. अभिव्यक्तिवादी चित्रकार प्रसिद्ध आहेत. व्हिएन्ना येथील ऑस्कर कोकोश्का (१८८६-    ) हा विख्यात चित्रकार याच संप्रदायातील होय. भारतातील शैलोज मुखर्जी (१९०७-६०), राम कुमार (१९२४-    ), सतीश गुजराल (१९२५-    ) व मोहन सामंत (१९२६-    ) या चित्रकारांवर काही काळ अभिव्यक्तिवादाची छाया पडली होती.

मूर्तिकला: अभिव्यक्तिवादी मूर्तिकलेत शारीर देहरचना अमान्य असून, वास्तुसदृश किंवा वनस्पतिसदृश आकृतिबंधांच्या (‘पॅटर्न्स’) आधारे मानवी देहाचे शिल्पांकन करण्यात येते. अवयवांच्या अभिव्यक्तीत दैहिक शक्तीचा प्रत्यय येतो. देहाकृतीच्या साकल्यात्मक स्वरूपावर अभिव्यक्तिवादी मूर्तिकलेचा भर आहे. अवकाशाच्या घटकाला या संप्रदायात नवे व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. अवकाशघटक शिल्पाकृतीच्या समग्र पोताचाच एक अविभाज्य घटक बनतो. घनता व पोकळ अवकाश परस्परपूरक अंगे बनतात. या दृष्टीने मातीसची ला सेर्पांतीन (१९०९) व जर्मन शिल्पकार लेमब्रुक (१८८१-१९१९) याची द फॉलन (१९१५-१६) या शिल्पाकृती उल्लेखनीय आहेत. वस्तूच्या गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाश-परिवर्तनामुळे अवकाशाचे जे प्रवाह उमटतात, त्यांचे सुंदर दर्शन  ब्रांकूशच्या (१८७६-१९५७) मायस्त्रा (१९१२) या ब्राँझच्या शिल्पाकृतीत घडते. झाडकीनची (१८९०-    ) व्हान गॉख ड्रॉइंग ही शिल्पाकृती अभिव्यक्तिवादी मानली जाते. मायॉल (१८६१-१९४४) हा फ्रेंच व एर्न्स्ट बारलाक (१८७०-१९३८) हा जर्मन अभिव्यक्तिवादी शिल्पकार होय.

वास्तुकला : वास्तुकलेतील अभिव्यक्तिवाद परिणामकारक नसला, तरी एरिक मेंडेलसन (१८८७-१९५३) या जर्मन वास्तुविशारदाने पॉट्सडॅम येथे बांधलेली ऑइन्स्टाइन ऑब्झर्व्हेटरी (१९२०) अभिव्यक्तिवादी विशेषांची निदर्शक मानली जाते. पीटर बेरेन्स (१८६९-१९४०) व रूडॉल्फ स्टायनर (१८६१-१९२५) यांनाही पुष्कळदा या संप्रदायातील वास्तुकार मानतात.

दृश्य कलांतील अभिव्यक्तिवादाच्या प्रभावाने विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात, विशेषतः ऑस्ट्रियन व जर्मन संगीतात, अभिव्यक्तिवादी वळण प्रकट झाले. त्यातून स्वच्छंदतावादी संगीतरचनेतील व्यक्तिगत भावनाविष्काराची अंतिम व ऐकांतिक अवस्था सूचित होते. विमुक्त ताल, ऐकांतिक उच्च स्वरात्मकता,सुसंवादी संगीतरचनेतील (‘मेलडी’) शीघ्र परिवर्तने व स्वरविकृती, वाद्यसंगीतातील भडक विरोध व त्यातून निष्पन्न होणारा स्वरमेलातील (‘हार्मनी’) विसंवाद आणि विस्कळीत पदरचना ही अभिव्यक्तिवादी संगीताची वैशिष्ट्ये होत. आर्नल्ड शन्‌बेर्क (१८७४-१९५१) व त्याचे अनुयायी अंटोन व्हेबर्न (१८८३-१९४५), आलबान वेर्ख (१८८५-१९३५) आणि अर्न्स्ट  कर्झेनेक (१९००-    ) हे या संप्रदायातील संगीतकार होत. हिंडेमिट (१८९५-१९६३) याचीही आरंभीची (१९२०-२५) संगीतरचना अभिव्यक्तिवादी होती.

अभिव्यक्तिवादाच्या प्रभावाने आरेख्यक कलेत आणि मुद्रणतंत्रामध्ये नवे प्रयोग करण्यात आले. अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती जरी आधुनिक काळातील नवकलेत प्रभावी असली, तरी ती एक शाश्वत प्रवृत्ती आहे. आदिमानवापासून आजच्या कलावंतापर्यंत सर्वांनाच तिचा प्रभाव कमी-अधिक अंशांनी जाणवलेला आहे. कलावंतांच्या अशा जाणिवेला अर्थात सामाजिक जीवनाचा संदर्भही असतो. असा संदर्भ १९२५ नंतर क्षीण झाल्याने, त्या सुमारास अभिव्यक्तिवादाचा प्रभावही क्षीण झाला.

भारतीय परंपरेतील पुराणोक्त गणेश, अष्टभुजादेवी, तुंबुरू, नरसिंह, गरुड, चतुर्मुख ब्रह्मा, षडानन स्कंद, दशानन रावण यांसारख्यांच्या मूर्ती, चित्रे व वर्णने अभिव्यक्तिवादाच्या आधारे अधिक सुस्पष्टपणे कळू शकतात. त्या सर्वांतून संबंधित कलावंतांनी आपापल्या धार्मिक अंतःप्रत्ययानुसार कलाविषयाची सारव्यंजक अभिव्यक्ती रूपास आणली आहे, असे म्हणता येईल. रस्किनसारख्या पाश्चात्त्या कलासमीक्षकांना हा दृष्टिकोन न उमगल्याने उपर्युक्त कलाविष्करणे त्यांस बेढब व हिडीस वाटली असावीत.

साहित्य: जीवनविषयक अनुभवांच्या दृश्य व बुद्धिगम्य स्वरूपाखाली जी सारदर्शक पण अनपेक्षित व चमत्कृतिपूर्ण अशी भावनात्मक सत्ये व अवस्था प्रतीत होतात, त्यांची आवेगपूर्ण, उत्कट व यथार्थ अभिव्यक्ती करणारा साहित्यातील एक संप्रदाय. साहित्याच्या बाबतीत ‘एक्सप्रेशनिस्मस’ अशी जर्मन संज्ञा त्याच शीर्षकाच्या पुस्तकात (१९१४) हेर्मान बार (१८६३-१९३४) या ऑस्ट्रियन लेखकाने प्रथम वापरली. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातच वाङ्मयीन अभिव्यक्तिवादास वेगळे स्वरूप प्राप्त झाले. अन्य ललित कलांप्रमाणेच साहित्याच्या बाबतीतही जर्मनी हेच या वादाचे केंद्र होते.


 साहित्यातील अभिव्यक्तिवाद म्हणजे निसर्गवाद, स्वच्छंदतावाद व दृक्प्रत्ययवाद यांविरुद्ध केलेली केवळ एक बंडखोरी नसून, त्यामागे तत्कालीन संस्कृतिविषयक सर्वंकष असंतोषही होता. ह्या असंतोषाचे स्वरूप स्वच्छ व सर्वांगांनी विशद होण्यास बेर्गसाँचे (१८५९-१९४१) तत्त्वज्ञान, फ्रॉइडचे (१८५६-१९३९) मनोविश्लेषण, हुसर्लचा (१८५९-१९३८) अंतःप्रज्ञावादी रूपविवेचनवाद, स्ट्रिंडबर्गची (१८४९-१९१२) द स्पूक सोनाटा (१९०७) यासारखी नाटके आणि डॉस्टोव्हस्कीच्या (१८२१-८१) कादंबऱ्या यांचे साहाय्य झाले. अशा प्रकारच्या सांस्कृतिक संदर्भामुळेच अभिव्यक्तिवाद्यांत क्रियाशील बुद्धिवादी, सामाजिक व राजकीय सुधारणावादी आणि ईश्वर-मानव संबंधाचा शोध घेणारे तत्त्वचिंतक, असे तीन वर्ग निर्माण झाले.

नाट्यलेखन व रंगभूमीचे तंत्र या बाबतींत अभिव्यक्तिवाद विशेष परिणामकारक ठरला. स्ट्रिंडबर्गच्या नाटकांप्रमाणेच, व्हेदेकिंट (१८६४-१९१८) याची द अवेकनिंग ऑफ स्प्रिंग (१८९१, इं. भा.) यासारखी नाटके अभिव्यक्तिवादी नाटकांचे अग्रदूत होत. स्वप्नसदृश अशी आशयाची विकृती व विचित्रता, अवचितपणे घडणाऱ्या, अवास्तव वाटणाऱ्या व विविध स्तरांतून सतत बदलत जाणाऱ्या कृती व भावनोद्रेकाचे प्रसंग,अस्पष्ट वाटणाऱ्या व्यक्तिरेखा,तुटक,त्रोटक व पुष्कळदा दुर्बोध व गूढ वाटणारी संवादयोजना, चमत्कृतिपूर्ण नाट्यक्‍लृप्त्या आणि या सर्वांतून साधलेला चमत्कारिक परिणाम हे अभिव्यक्तिवादी नाटकाचे विशेष होत. जर्मन नाट्यसाहित्यात झॉर्ज (१८९२-१९१६) याचे Bettler (१९१२, इं. भा. द बेगर), हाझेनक्लेव्हरचे (१८९०-१९४०) Der Sohn(१९१४, इं. भा. द सन), उनरूचे (१८८५-१९७०) ऑफिसर्स (इं. भा. १९१३) व कायझरचे (१८७८-१९४५) Die Burger von Calais (१९१४, इं. भा. बर्गर ऑफ कॅले) ही अभिव्यक्तिवादी नाटके प्रसिद्ध आहेत. जर्मन नाटककार ब्रेक्ट (१८९८-१९५६), आयरिश नाटककार ओकेसी (१८८०-१९६४) व अमेरिकन नाटककार यूजीन ओनील (१८८८-१९५३) व एल्मर राइस (१८९२-१९६७) यांच्या नाटकांतही अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती व नाट्यविशेष आढळून येतात.

जर्मन काव्यक्षेत्रात फ्रांट्स व्हेर्फेल (१८९०-१९४५) हा श्रेष्ठ अभिव्यक्तिवादी कवी असून Gedichte aus den Jahren (१९०८-४५) ह्या संग्रहात त्याची कविता प्रसिद्ध झाली आहे. त्याने नाटके व कादंबर्‍याही लिहिल्या आहेत. ऑस्ट्रियन कवी ट्राक्ल व सायलीशियन कवी हाइम यांचे अभिव्यक्तिवादी काव्य नैराश्यसूचक आहे, तर स्टॅडलर व लोट्स यांची कविता क्रांतीचा आशावाद प्रकट करणारी आहे. काफ्का (१८८३-१९२४) व शिंकल (१८८५-१९४०) हे जर्मन कादंबरीच्या क्षेत्रातील महत्त्वाचे अभिव्यक्तिवादी लेखक होत. Der Process (१९२५, इं. भा. द ट्रायल),Das Schloss(१९२६, इं. भा. द कॅसल) व Amerika(१९२७) या काफ्काच्या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. एट्‌श्मिट (१८९०-१९६६) याच्या लघुकथांत अभिव्यक्तिवादी प्रवृत्ती व्यक्त झाली आहे.

साहित्यातील अभिव्यक्तिवादाचा जोम १९२५ नंतर क्षीण झाला. त्याचा प्रभाव अल्पसा व अल्पकालीन असला, तरी त्यातून जी जीवनविषयक दृष्टी आधुनिक लेखककवींना लाभली, ती कालोचित होती. अनुभवांच्या रूपविकृतीत प्रतीत होणाऱ्या सत्यांच्या अभिव्यक्तीवर या संप्रदायाचा भर होता. जीवनाचा अनर्थकारक पण अर्थपूर्ण आशय विचित्र वाटणाऱ्या अभिव्यक्तीतून प्रत्ययक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न अभिव्यक्तिवाद करतो. या दृष्टीने या वादाची उपयुक्तता व महत्त्व टिकाऊ आहेत. विसाव्या शतकातील सगळेच विश्वसाहित्य कमी-अधिक स्वरूपात व प्रकटपणे वा प्रच्छन्नपणे या वादाने प्रभावित झाले आहे.

जाधव, रा. ग.

अप्रतिरूप अभिव्यक्तिवाद: प्रामुख्याने अमेरिकन चित्रकलेच्या क्षेत्रात १९४० नंतर उदयास आलेली एक अभिव्यक्तिवादी शाखा. हॅरॉल्ड रोझेनबर्गने जॅक्सन पॉलकच्या चित्रणतंत्राच्या संदर्भात या शाखेस ‘ॲक्शन पेंटिंग’ (क्रियाचित्रण) ही संज्ञा दिलेली आहे (१९५२). ऑस्कर डॉमिंग्युज (१९०५-    ), झां फॉत्रिअर (१८९८-१९६१) व व्होल्फगांग शूल्ट्से (१९१३-५१) या चित्रकारांच्या प्रयोगांतून आकृतिबंधाची पारंपारिक संकल्पना बदलून अणूच्या चलनवलनासारखा तसेच शरीरातील पेशींच्या  बांधणीसारखा आकृतिबंध पुढे आला. या नव्या संकल्पनेचा, तसेच काही पुरोगामी फ्रेंच कलावंतांच्या अमेरिकेतील वास्तव्याचा व आद्रें मासाँसारख्या अतिवास्तववादी चित्रकारांचा प्रभाव या शाखेवर पडला. अर्शील गॉर्कीने (१९०४-४८) या शाखेस विशेष चालना दिली.

जॅक्सन पॉलक (१९१२-५६) हा या संप्रदायातील जागतिक दर्जाचा प्रमुख कलावंत होय. त्याच्या चित्रकलेतील प्रारंभीच्या प्रखर रूपविकृती पिकासो, मीरो व मासाँ यांचे संस्कार दर्शवितात. पुढे त्याने स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.  आकस्मिक वा यादृच्छिक प्रक्रिया असे त्याच्या शैलीचे स्वरूप होते. रंगद्रव्यांमध्ये वालुका, नखे व काचांचे तुकडे यांचे स्वैर मिश्रण करणे, जमिनीवर पसरलेल्या भल्यामोठ्या चित्रफलकावर यदृच्छ्या रंग ओतणे किंवा कुंचला वा रंगनलिका यांचा त्यासाठी स्वैर उपयोग करणे आणि तो रंग काठ्या,थाप्या, सुऱ्या वगैरे साधनांनी ढवळून त्यांतून मुक्त व स्वयंचलित आकार निर्माण करणे, अशा स्वरूपाची ही प्रक्रिया होती. चकाकीचा परिणाम साधण्यासाठी तो अल्युमिनियमचेही रंग वापरी. चित्रफलकावरील अशी अभिव्यक्ती जोषपूर्ण व आक्रमक असे. कलादृष्टीने रंग स्वभावतः सर्जनशील असून, ती सर्जनशीलता (कला) कृतिरूपाने अभिव्यक्त होऊ देणे या विचारसरणीवर पॉलकची निष्ठा होती. त्यामुळेच जर्मन अभिव्यक्तिवादातील आत्माविष्काराची कल्पना त्यास मान्य नव्हती.

अप्रतिरूप अभिव्यक्तिवादाच्या अप्रातिनिधिक, विस्तृत व विमुक्त स्वरूपामुळे, त्यात व्यक्तिगत शैलीविशेषांना विशेष स्थान आहे. व्हिलेम दे कूनिंग (१९०४-    ) चित्रफलकांवरील जबरदस्त आक्रमक अभिव्यक्तिद्वारे पूर्वानपेक्षित व आकस्मिक अशी रंगाकारांची स्वैर आविष्कारणे साधतो. मार्क टोबेने (१८९०-    ) या संप्रदायात पौर्वात्य कलावैशिष्ट्यांनी, तत्त्वप्रणालींनी व चिनी सुलेखन-तंत्राने संस्कारित असा नवा विशेष आणला. त्याचे व्हाइट रायटिंग हे चित्र म्हणजे शब्द वा अर्थ नसलेले, पण भावना संक्रांत करणारे पत्रच वाटते. ॲडॉल्फ गॉटलीबने (१९०३- ) आपल्या चित्रांमधून सुलेखनाचे गुणधर्म अनुसरणारी चिन्हे व प्रतीके वापरली आहेत. मार्क रॉथ्कोची (१९०३-    ) विषम, आयताकृती, सूक्ष्मतः परस्परसंबंधित  असलेल्या रंगीत तुकड्यांची चित्र अप्रतिरूपतेचे साधेसुधे पण अंतिम स्वरूप दर्शवितात. फिलिप गुस्ताँने (१९१३- ) दृश्यवास्तवाशी संबंध नसणारी, पण बंदिस्त व एकसंघ वाटणारी रंग-रचना केली आहे. होफमानच्या (१८८०-१९६६) चित्रांमध्ये  उसळत्या स्वरूपाची सपाटी, मोठेमोठे आकार व रासवट पण आकर्षक रंग-रचना हे विशेष आढळतात. यांखेरीज फ्रॅन्झ क्लाइन (१९१०-६२), रॉबर्ट मदरवेल (१९१५-    ), क्लीफर्ड स्टील (१९०४-    ), जेम्स ब्रुक्स (१९०६-    ) इ. अप्रतिरूप अभिव्यक्तिवादी संप्रदायातील चित्रकार उल्लेखनीय आहेत.

इनामदार, श्री. दे.

पहा: अप्रतिरूप कला आधुनिक कला.

संदर्भ : 1. Arnason, H.H. AHistory of Modern Art, London, 1962.

           2. Coppleston, Trewin, Modern Art Movements, London, 1967.

           3. George, Waldmar,Expressionism, London, 1961.

           4. Langui, Emile Trans. Sainsbury, Geoffrey Oliver, James, Fifty Years of Modern Art, London,1959.