अबू हनीफा : ( ६९९-७६७). धर्मचिकित्सक व हनाफी नावाने प्रसिद्ध असलेल्या सुन्नी कायद्याच्या पहिल्या शाखेचा संस्थापक. मुसलमानी विधीचा आद्य भाष्यकार म्हणून सर्वश्रेष्ठ इमाम या अर्थी ‘अल्-इमाम-अल्-आझम’ ही पदवी त्याला होती. विरक्तपणा व विनयशीलता यांबद्दल त्याची ख्याती होती. असे म्हणतात, की काजीपद नाकारल्यामुळे त्यास कारावास भोगावा लागला.
उपलब्ध माहितीनुसार त्याचा कूफा शहरी रेशमाचा मोठा धंदा होता कूफा येथे हामद बिन अबि सुलेमान यांच्या सभांना उपस्थित राहून त्यांच्या धर्मविषयक कायद्यावरील व्याख्यानांचा त्याने फायदा घेतला. हामदच्या मृत्यूनंतर त्यालाच धार्मिक कायद्यावरील अग्रगण्य अधिकारी व्यक्ती व कायद्याच्या कुफी शाखेचा प्रतिनिधी मानण्यात आले.
त्याने इस्लामची शिस्त प्रगत संस्कृतीला आवश्यक अशा रीतीने वृद्धिंगत केली. योग्य व न्याय्य म्हणजे काय हे बुद्धिवंतांना अंत:प्रेरणेने समजते, या विचारसरणीवर आधारलेल्या मतवादाला त्याने आळा घातला. त्याच्या पद्धतीप्रमाणे कुराणातील स्पष्ट कथनाला महत्त्व असे, सादृश्य किंवा पूर्व दाखला यांचा उपयोग केला जाई व उघड अन्याय टाळण्यासाठी समन्याय स्वीकारला जाई.
धार्मिक कायद्यावर त्याने प्रत्यक्ष कोणतेही पुस्तक लिहिले नाही परंतु स्वत:च्या विचारसरणीबद्दल शिष्यांशी चर्चा केली व लेखन सांगितले. त्याच्या नावावर मोडणाऱ्या विपुल ग्रंथांपैकी फक्त फिख अकबर (१) हा एकमात्र ग्रंथ त्याचा स्वत:चा असावा.
त्याच्या जुन्या समकालीनांपेक्षा त्याचा विधी-विचार अधिक प्रगत, अधिक पर्यवधानी व परिष्कृत होता. उच्च दर्जाचा व तर्ककठोर युक्तिवाद हे त्याच्या विधिविचाराचे वैशिष्ट्य होय.
फैजी, अ. अ. अ. (इं.) श्रीखंडे, ना. स. (म.)